You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियानंतर आता इराणच्या नेत्यांना भेटायला ट्रंप तयार, कारण...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांना भेटण्याची तयारी दर्शवली आहे.
अमेरिकेनं इराण अणु करारातून माघार घेतल्यानंतर या दोन्ही देशांचे संबंध दुरावले होते.
दरम्यान ट्रंप यांनी पुढाकार घेत कोणत्याही अटींशिवाय कोणत्याही क्षणी रुहानी यांना भेटण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
व्हाइट हाऊसमध्ये इटलीच्या पंतप्रधानांच्या बरोबरीनं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रंप म्हणाले, "बैठकीवर माझा भरवसा आहे. मी कोणालाही भेटू शकतो. रुहानी भेटीला तयार असतील तर आम्ही भेटू शकतो."
पूर्वीच्या अणुकराराऐवजी सोयीस्कर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. मात्र कोणत्याही चर्चेपूर्वी अमेरिकेनं अणुकराराचा भाग व्हायला हवं असं इराणचे राष्ट्राध्यक्ष रुहानी यांचे सल्लागार हामीद अबूतलेबी यांनी स्पष्ट केलं.
ट्रंप यांनी रुहानी यांच्या भेटीच्या तयारीचं सुतोवाच करण्याच्या काही तास आधी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरुपाच्या चर्चेचा इन्कार केला होता.
अमेरिका विश्वासू साथीदार नसल्याचं त्यांनी आधी म्हटलं होतं.
एकमेकांना धमक्या
या महिन्याच्या सुरुवातीला रुहानी यांनी अमेरिकेला धमकीवजा इशारा दिला होता. "अमेरिकेनं इराणबरोबर शांततापूर्ण संबंध राखले तर संपूर्ण जगात शांतता राहील. इराणविरुद्ध युद्ध छेडलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण पेटू शकतं," असं रुहानी म्हणाले होते.
त्यावर अमेरिकेला कधीही धमकावण्याची चूक करू नका, असं ट्रंप यांनी रुहानी यांना सुनावलं. आततायीपणे निर्णय घेतल्यास इराणला भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ट्रंप यांनी दिला होता.
2015 मध्ये करारावेळी इतर देशांनी आक्षेप घेतल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर तेल, विमानांची निर्यात आणि मौल्यवान धातूंच्या व्यापारावर प्रतिबंध लागू केला होता.
दोन्ही देशांदरम्यान वादाचं आणखी एक कारण आहे. आखाती परिसरात इराणकडून संदिग्ध हालचाली सुरू असल्याचा अमेरिकेला संशय आहे. म्हणून इराणचे शत्रू असलेल्या इस्रायल आणि सौदी अरेबियाशी अमेरिकेनं हातमिळवणी केली आहे.
दुसरीकडे इराणनं मात्र आमचा अणूकार्यक्रम शांततापूर्ण असल्याचा दावा केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)