'ब्राझीलचे ट्रंप' उतरले राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूक रिंगणात

फोटो स्रोत, AFP
ब्राझीलमध्ये कडव्या उजव्या विचारसरणीचे वादग्रस्त नेते जेर बोलसोनारो यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचं जाहीर केलं. ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार आहेत.
सोशल मीडियावर ब्राझीलचे हजारो नागरिक बोलसोनारो यांना फॉलो करतात. अनेकांना ते 'ब्राझीलचे ट्रंप' वाटतात.
माजी लष्करी अधिकारी असलेले जेर बोलसोनारो हे अनेक पोल्सनुसार माजी अध्यक्ष ल्युईझ इनासिओ लुला डीसिल्व्हा यांच्या मागे आहेत.
लुला हे भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात आहेत, त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे.
वर्णभेदी आणि समलिंगी व्यक्तींसंदर्भात बोलसोनारो यांच्या वक्तव्यांनी ब्राझीलमध्ये खळबळ उडाली होती. मात्र गुन्हेगारीने वेढलेल्या देशाला वाचवण्यासाठी बोलसोनारो यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता असल्याचं त्यांचे पाठीराखे सांगतात.
रिओ दी जानेरो शहरात झालेल्या एका सभेत 3,000 समर्थकांच्या साक्षीने बोलसोनारो यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी आपली दावेदारी जाहीर केली.
पण बोलसोनारो यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकता येणार नाही असं काही लोकांना वाटतं. त्यांच्या काही वर्णद्वेषी आणि समलैंगिकांविरोधी विधानांनी लोक चिडले आहेत.
बोलसोनारो निवडणुकीत सोशल लिबरल पार्टीचे उमेदवार असतील. यामुळे टीव्हीवर निवडणूक प्रचारासाठी त्यांना फक्त 10 सेकंद मिळतील.
"आमचा पक्ष मोठा नाही. आमच्या पक्षाला निवडणूक निधी मिळत नाही. आम्हाला टीव्हीवर प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र आमच्याकडे ब्राझीलच्या लोकांचा पाठिंबा आहे, जो अन्य पक्षांकडे नाही," असं बोलसोनारो यांनी सांगितलं.
गुन्हेगारी रोखण्यासाठी देशातला बंदुकींसंदर्भातला कायदा शिथिल करण्याचा बोलसोनारो यांचा मानस आहे. गर्भपातविरोधी कायद्यासंदर्भात त्यांच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना कट्टर ख्रिश्चनांचाही पाठिंबा आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








