किम-जोंग-उन यांचे कुटुंबीय का वापरायचे ब्राझीलचा बनावट पासपोर्ट?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बेकी ब्रॅनफोर्ड
- Role, बीबीसी न्यूज
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम-जोंग-उन आणि त्यांचे वडील किम-जोंग-इल यांनी १९९०मध्ये ब्राझीलचे खोटे पासपोर्ट बनवल्याचे पुरावे आढळून आले आहेत.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं या दोन्ही पासपोर्टच्या झेरॉक्स मिळवल्या आहेत. यात किम-जोंग-उन यांच्या बनावट पासपोर्टवर 'जोसेफ पॉग' (रिकार्डो आणि मार्सेला यांचा मुलगा) हे नाव आहे. तर, त्यांच्या वडिलांच्या पासपोर्टवर 'आयजोंग चोई' असं नाव आहे.
१९९६ मध्ये चेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागमधल्या ब्राझीलच्या दूतावासानं हे पासपोर्ट दिल्याचं ब्राझीलच्या सुरक्षा यंत्रणांनी रॉयटर्सला सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
पण, उत्तर कोरियाच्या सत्ताधारी कुटुंबाला खोट्या कागदपत्रांची आवश्यकता का भासली आणि ती पण, ब्राझीलची का? हे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.
खरंच असं घडलंय का?
पासपोर्टचे सध्या मिळालेले हे पुरावे ठोस पुरावे नसले तरी, ब्राझीलचे पासपोर्ट आणि किम कुटुंब यांचे संबंध काही नवे नाहीत.
1991 मध्ये किम-जोंग-उन आणि त्यांचे भाऊ जोंग-चुल हे टोकियोमधल्या डिस्नेलँडच्या भेटीला आले होते. तेव्हा त्यांनी जपानमध्ये प्रवेश करताना ब्राझीलच्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश केला होता असं वृत्त त्यानंतर २० वर्षांनी म्हणजे २०११मध्ये जपानच्या माध्यमांनी प्रसारीत केलं होतं.
किम-जोंग-उन यांचे मोठे सावत्र भाऊ किम-जोंग-नम यांनी २००१मध्ये डॉमनिकन पासपोर्ट वापरत जपानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. खोटे पासपोर्ट बाळगणं हे किम कुटुंबीयांना विशेष अडचणीचं वाटत नाही.
पण, त्यांना असे पासपोर्ट का लागतात?
1990 मध्ये उत्तर कोरियाला जगात विशेष किंमत नव्हती. उत्तर कोरियाचा एकमेव पाठीराखा असलेल्या सोव्हिएत युनियनचंही विभाजन झालं होतं. त्यावेळी देशात जीवनावश्यक वस्तूंचा आणि अन्नाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता.
आंतरराष्ट्रीय जगतात उत्तर कोरियाला अस्पृश्यांप्रमाणे वागणूक दिली जात होती. तसंच, त्यांच्या डोक्यावर हजारो कोटींचं कर्जही होतं. शीत युद्धानंतर उत्तर कोरियाच्या मित्र देशांची संख्या कमी होत होती. देशातलं सत्ताधारी कुटुंबही चर्चेबाहेर राहणं पसंत करत होतं.
दरम्यान, यूकेमधल्या सिक्युरिटी थिंक टँक 'चॅटम हाऊस'मधले उत्तर कोरियाविषयक जाणकार डॉ. जॉन निल्सन-राईट यांना उत्तर कोरियाबद्दल एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे, किम-जोंग-इल यांना सत्ता संपादन करून दोनच वर्षं झाली होती. तरीही इल हे खोट्या पासपोर्टच्या आधारे परदेशात गेले होते.

फोटो स्रोत, Reuters
याबद्दल डॉ. निल्सन-राईट बीबीसीशी बोलताना सांगतात की, "त्यांना असं का करावं लागलं असेल? किम-जोंग-इल यांना यापूर्वी अनेकदा धोका पत्करताना पाहिलं गेलं आहे. त्यांनी पूर्वी अनेकदा मॉस्को आणि बिजिंगला फेऱ्या केल्या आहेत. पण, त्यासाठी त्यांना पासपोर्ट वापरावा लागला नसेल. यातून एक अर्थ कळून येतो की, जर उत्तर कोरियातून त्यांना आणि त्यांच्या मुलाला पळून जायची वेळ आली तर खोट्या पासपोर्टचा पर्याय उपलब्ध असावा. ही गोष्टच आश्चर्यकारक आहे."
ते पुढे सांगतात की, "यावरून हे कळतं की, तेव्हा आपण विचार करत होतो त्यापेक्षा तो देश जास्त असुरक्षित होता."
पण, ब्राझीलचाच पासपोर्ट का? बोगस लोकांचं हे आवडतं ठिकाण आहे असं म्हणायचं का?
ब्राझीलबद्दलच्या एका सामान्य समजुतीनुसार, इथल्या संमिश्र लोकसंख्येमुळे जगातले बहुतेक जण ब्राझिलियन असल्याचा दावा करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या पासपोर्टला वाढती मागणीही असते. ब्राझीलच्या एका अधिकाऱ्यानं अल-झझिराच्या एका पत्रकाराकडे 2011मध्ये याची कबुलीही दिली होती.
पण, सध्या ही गोष्ट सिद्ध करणारी कोणतीही ठोस माहिती सध्या उपलब्ध नाही. उलट गुन्हेगारांचं आश्रयस्थान किंवा आवडत्या जागांच्या यादीत ब्राझील हा देश नसल्याचा दावा वोकॅटीव या संस्थेच्या 2015 मधल्या सर्वेक्षणात केला आहे.
पण, 1990मध्ये अशी परिस्थिती नव्हती. 2006मध्ये सुरक्षेचे उपाय विशेष कडक करण्यापूर्वी ब्राझीलचे बनावट पासपोर्ट सहज उपलब्ध होत असल्याचं ब्राझील सरकारनंही मान्य केलं आहे. ब्राझीलची मोठ्या प्रमाणातली लोकसंख्या पूर्व आशियातली असल्यानं किम कुटुंबीयांना तेव्हा हा पासपोर्ट मिळवणं सोपं झालं.
यातली आश्चर्यकारक बाब म्हणजे, ब्राझील देशातून नव्हे तर ब्राझीलच्या चेक प्रजासत्ताकमधल्या दुतावासानं हे पासपोर्ट दिले होते.
तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








