You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉनचं हेलिकॉप्टरनं तुरुंगातून पलायन, हॉलीवुड स्टाईलनं पोलिसांना दिला चकवा
एका तुरुंगात भली मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे. या तुरुंगातल्या कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी एक गेस्ट रूम आहे.
या गेस्ट रूममध्ये एक खतरनाक कैदी भेटीसाठी आलेल्या भावाशी बोलत आहे. पण पुढच्या काही क्षणांतच दोन सशस्त्र व्यक्ती आत येतात. ते या कैद्याचे साथीदार आहेत.
ते या कैद्याला ताब्यात घेतात आणि बाहेरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसतात. तुरुंगातल्या सुरक्षा रक्षकांना काही कळण्याच्या आत हेलिकॉप्टर हवेत भरारी घेतं.
नाही! हा हॉलीवुड किंवा बॉलीवुडच्या सिनेमातला सीन नाही.
हे असं खरोखर घडलं आहे, तेही चक्क फ्रान्समध्ये. विशेष म्हणजे या कैद्यानं तुरुंगातून पलायन करण्याची ही दुसरी वेळ आहे.
या कैद्याचे नाव रेदुअन फैद असं असून त्याचं वय 46 वर्षं आहे.
फैद कुप्रसिद्ध गुन्हेगार असून त्याला गुन्हेगारीची प्रेरणाच मुळी सिनेमातून मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यानं गुन्हेगारीवर एक पुस्तकही लिहिलं आहे.
असं केलं पलायन!
रविवारी सकाळी हा प्रकार घडला. फैदला तुरुंगातून पळवून नेण्याचा कट अत्यंत सुनियोजितरीत्या रचण्यात आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
फैदच्या 3 साथीदारांनी हेलिकॉप्टर चालकाचं अपहरण केलं आणि हे हेलिकॉप्टर या तुरुंग परिसरातल्या एका मोकळ्या जागी उतरवलं.
एक साथीदार हेलिकॉप्टरजवळ थांबला. तर चेहऱ्यावर मास्क लावलेले दोन सशस्त्र साथीदार तुरुंगातल्या व्हिजीटर्स रूममध्ये घुसले.
त्यांच्याकडे रायफल्स आणि बाँब होते. इथंच फैद त्याच्या भावाशी बोलत उभा होता. फैदला घेऊन हे दोघे बाहेर आले. उड्डाणासाठी सज्ज असलेल्या हेलिकॉप्टरमधून ते फरार झाले. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.
हे हेलिकॉप्टर नंतर गोनेस या परिसरात सापडलं. अपहरण केलेल्या या हेलिकॉप्टर चालकाला नंतर त्यांनी सोडून दिलं आहे. या चालकाला मानसिक धक्का बसल्यानं त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर फैद कारमधून पसार झाला.
फैदला पकडण्यासाठी 3 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
2010मध्ये दरोड्याचा एक अपयशी प्रयत्न झाला होता. यात एक पोलीस अधिकारी ठार झाला होता. या प्रकरणात फैदला 25 वर्षांची शिक्षा झाली होती.
2013मध्येही फैद तुरुंगातून फरार झाला होता. त्यावेळी त्यानं डायनामाईटचा उपयोग करून तुरुंगाचे दरवाजे तोडून आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करून तुरुंगातून पलायन केलं होतं. पोलिसांनी नंतर त्याला 6 आठवड्यांत शोधून काढलं होतं.
सुनियोजित कट
फ्रान्सच्या कायदा मंत्री निकोल बेलूबेट यांनी तुरुंगाला भेट दिली. हा प्रकार अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, असं त्या म्हणाल्या.
फैदच्या साथीदारांनी ड्रोनच्या साहायानं काही आठवडे पाहणी करून मग हा प्रकार घडवून आणला. शिवाय फैदला पळवून नेणारे प्रशिक्षित असावेत, असंही त्या म्हणाल्या. तुरुंग परिसरातल्या ज्या भागात हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं तिथं अॅंटी एअरक्राफ्ट नेट लावण्यात आलेलं नाही.
सिनेमांचा प्रभाव
हॉलीवुडच्या गुन्हेगारी सिनेमांचा फैदवर मोठा प्रभाव आहे. 1972ला जन्म झालेल्या फैदनं पॅरिसमध्ये 1990च्या आसपास खंडण्या आणि अपहरण करणारी टोळी उभारली होती.
अल पचिनोच्या स्कारफेस या सिनेमाचा आपल्यावर प्रभाव असल्याचं त्यानं स्वतःच सांगितलं आहे. या शिवाय अमेरिकेतले दिग्दर्शक मायकेल मान यांचा 'हिट' हा सिनेमा त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. बँकावर दरोडा टाकण्यापूर्वी त्यानं हिट हा सिनेमा डझनभर वेळा पाहिला होता.
पुस्तकही लिहिलं!
फैद यानं 2009मध्ये पुस्तकही लिहिलं आहे. पॅरिसमधल्या उपनगरांतली गुन्हेगारी आणि तो गुन्हेगारीमध्ये कसा आला, यावर हे पुस्तक लिहिलं आहे. त्यानं गुन्हेगारी सोडल्याचा दावा केला असला तरी एक वर्षांनंतर तो एका दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांना सापडला.
पोलिसांनी फैदला 'लेखक' असं टोपणनाव दिलं आहे.
तुरुंग अधिकाऱ्यांच्या मते फैद तुरुंगात कधीही इतर कैद्यांशी वादावादीत भाग घेत नसे. पण तो सतत दक्ष आणि नम्र असे. बहुतेक तुरुंगातून कसं पळून जायचा याचा प्लॅन त्याच्या मनात सतत घोळत असावा, असं या अधिकाऱ्यानं म्हटलं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)