मुलीचे स्टेजवर दोन तुकडे करून लंडनला हादरवणारे 'सरकार'

फोटो स्रोत, COLLECTION OF SAILESWAR MUKHERJEE
- Author, जॉन जुब्रिस्की
- Role, लेखक
एका रहस्यमयी दिसणाऱ्या पौर्वात्य जादूगारानं एका 17 वर्षांच्या मुलीला वश करून, तिला एका बाकावर झोपवलं आणि जणू काही ती म्हणजे खाटकासमोर असणारा मांसाचा तुकडा असावा अशा पद्धतीनं तिचे मोठ्या करवतीनं दोन तुकडे केले.
त्या दिवशीच्या, त्या कार्यक्रमाचा तो क्लायमॅक्स असणं अपेक्षित होतं. पण काहीतरी विपरीत घडलंय असं वाटत होतं. त्या जादूगारानं त्या सहायक मुलीच्या हातावर हात घासले आणि तिला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. तिनं काहीच प्रतिसाद दिला नाही. त्याने मान हलवत तिचा चेहरा एका काळ्या कापडानं झाकला.
इतक्यात कार्यक्रमाचे सूत्रधार रिचर्ड डिंबलबी यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन कार्यक्रम संपल्याची घोषणा केली.
9 एप्रिल 1956ची ही गोष्ट!
हा कार्यक्रम संपला आणि क्रेडिट्स म्हणजे श्रेयनामावली जशी सुरू झाली तसे लाईम ग्रोव्ह स्टुडिओमधले दूरध्वनी खणखणू लागले.
पाश्चिमात्य जादूई दुनियेत प्रवेश मिळवण्यासाठी सरकार यांना खूप संघर्ष करावा लागला. लंडनचं 'ड्यूक ऑफ यॉर्क' हे नाट्यगृह तीन आठवड्यांच्या काळासाठी आरक्षित केलं होतं, पण मोजकीच तिकिटं विकली गेली होती. पॅनोरामामध्ये येण्याच्या संधीचा काहीही करून पूर्ण फायदा उठवायचा असं सरकार यांनी ठरवलं होतं.

फोटो स्रोत, NEW YORK PUBLIC LIBRARY
वेळेबाहेर जात असल्याने सरकार यांचा कार्यक्रम असा अचानक संपला असं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं. पण त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेल्या कुणालाही ते पटणारं नव्हतं. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनीसुद्धा हे कबूल केलं होतं की वेळेच्या बाबतीत ते चोख होते. त्यांच्या सहकारी असणाऱ्या दीप्ती डे यांना त्या धारदार पोलादी पात्याने कापून तसंच सोडून जाणं हा तर हातचलाखीचा उच्चतम नमुना होता.
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात या बातमीनं धुमाकूळ घातला. "किंचाळणाऱ्या मुलीचे दोन तुकडे - टीव्हीवर मोठा धक्का" आणि "करवतीने तुकडे करणाऱ्या सरकार यांनी प्रेक्षकांना हादरवून सोडलं" अशा मथळ्यांखाली बातम्या छापून आल्या. ड्यूक ऑफ यॉर्क मधली त्यांच्या कार्यक्रमाची सगळी तिकीटं विकली गेली.
सरकार हे प्रोतूल चंद्र सरकार म्हणून, 23 फेब्रुवारी 1913 रोजी बंगालच्या, (आता बांगलादेशातल्या) तांगाईल जिल्ह्यातल्या आशेकपूर गावी जन्माला आले.
शाळेत गणितात ते अव्वल होते - काही लोक म्हणायचे की ते असामान्य आहेत - पण जादू - हातचलाखी यांच्यातच त्यांना खरी गती होती. त्यांनी त्यांचं नाव बदलून इंग्रजीतल्या 'sorcerer' म्हणजे जादूगार या शब्दाजवळ जाणारं 'सोरकार' असं केलं. ते सर्कशींमधून, नाट्यगृहांत आणि वेगवेगळ्या क्लब्समध्ये जादूचे प्रयोग करू लागले.
बंगालमधल्या गावांपलीकडे अन्य कुठेही माहिती नसतानाही त्यांनी स्वतःचा "The World's Greatest Magician" किंवा "TW'sGM" म्हणजेच "विश्वातील सर्वोत्तम जादूगार" असा प्रचार करायला सुरुवात केली. ही युक्ती कामी आली. देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून निमंत्रणांचा पाऊस पडायला लागला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणं हे अधिक कठीण काम होतं. कौशल्य नसलेले आणि कच्चे म्हणूनच भारतीय जादूगारांना पाश्चिमात्य जादूगार नेहमी हिणवत असत. सरकार यांनी काही अमेरिकन जादूगारांना प्रशिक्षण दिलं, त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारतात सैन्याच्या तुकड्यांचे मनोरंजन करण्यासाठी भारतभर दौरे केले. सरकार यांनी मासिकांमधून जादूबद्दल लेखही लिहिले.
1950 साली त्यांनी 'इंटरनॅशनल ब्रदरहूड ऑफ मॅजिशिअन्स' आणि 'सोसायटी ऑफ अमेरिकन मॅजिशिअन्स' यांच्या संयुक्त परिषदेत सादरीकरण करण्याचं निमंत्रण स्वीकारलं.
अरेबियन नाईट्समधल्या एखाद्या पात्रासारखे दिसणारे सरकार शर्मन हॉटेलच्या भव्य सभागृहात दाखल झाले आणि वर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांची या विलक्षण पौर्वात्त्य माणसाची फोटो टिपण्यासाठी एकच झुंबड उडाली. पण त्यांचा पहिला प्रयोग ज्यात ते डोळ्यांवर पट्टी बांधून समोर लिहिलेलं सर्व काही घडाघडा वाचून दाखवत असत तो अगदीच निराशाजनक ठरला.

फोटो स्रोत, COLLECTION OF SAILESWAR MUKHERJEE
पण ही तर सुरुवात होती. नंतर त्यांनी दोन प्रख्यात जादूगारांवर फसवणुकीचा आरोप केला. जीनीचे संपादक सॅम्युएल पॅट्रिक स्मिथ सांगतात की, या घटनांमुळे सगळेच हबकले होते.
"अमेरिकेत काम करण्याची ही पद्धत नव्हती. यामुळे एकीकडे सरकार आणि त्यांचे समर्थक आणि दुसरीकडे त्यांचे संतापलेले विरोधक अशी फूट पडली."
सरकार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अशा अनेक वादळांना तोंड दिलं. त्यांनी स्वतःला "विश्वातील सर्वोत्तम जादूगार" म्हणून संबोधणं याकडे अहंकाराचा कळस म्हणून पाहिलं गेलं. बॉक्स ऑफिस वरच्या त्यांच्या विजयाकडे संशयाच्या चष्म्यातून पाहिलं जाऊ लागलं.
त्यांच्या प्रसिद्धीची लाट मात्र अजिबात ओसरत नव्हती. जादूच्या मासिकांमधून त्यांच्याविषयी सकारात्मक समालोचन छापून येत होतं, त्याबरोबरच उठावदार रंगातली त्यांची चित्रं आणि छायाचित्रंसुद्धा छापून येत होती. जरी डोळे दिपवून टाकणारी प्रसिद्धी मिळाली असली तरी मुख्यत्वे अँग्लो-सॅक्सन लोकांचं प्रभुत्व असणाऱ्या भागात बाहेरून येऊन घुसखोरी करणारा म्हणूनच पाहिलं जात होतं.
1955 साली, 'कालानाग' म्हणून ओळख असणाऱ्या आणि एकेकाळी अॅडॉल्फ हिटलरचा आवडता जादूगार असणाऱ्या, हेलमट एवाल्ड श्रायबर, यांनी या बंगाली माणसावर, त्यांचे हातचलाखीचे खेळ चोरल्याचा आरोप केला. यावेळी मात्र सरकार यांच्या मदतीला अनेक जादूगार धावून आले आणि त्या जर्मन जादूगाराला याची जाणीव करून दिली की त्यानं त्याची खरी ओळख आणि राष्ट्रीयत्व लपवण्यासाठी पौर्वात्य नाव धारण केलं आहे. तसंच सरकार यांच्यावर जादूचे जे खेळ चोरल्याचा आरोप श्रायबर यांनी केले होते, खरंतर ते त्यांनी स्वतःच चोरले होते किंवा उसने घेतले होते.

फोटो स्रोत, NEW YORK PUBLIC LIBRARY
'इंद्रजाल' किंवा 'मॅजिक ऑफ इंडिया' या 1955 साली नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये पहिल्यांदा सादर झालेल्या त्यांच्या कार्यक्रमासाठी सरकार आजही आपल्याला आठवतात. त्या काळी जादूचे प्रयोग सादर करण्यासाठी दौरे करणाऱ्या कुणाकडेही नसेल इतका मोठा सहकाऱ्यांचा संच घेऊन, अधिक उपकरणांसह आणि अधिक विविधतापूर्ण प्रयोग करत त्यांनी पाश्चिमात्यांचा भारतीय जादूगारांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.
नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारांवर ताजमहालाचा देखावा उभा केला जायचा आणि सर्कसमधून भाड्याने आणलेले हत्ती आपल्या रंगवलेल्या सोंडा उंचावून प्रेक्षकांचे स्वागत करायचे. कार्यक्रमाचं सादरीकरण अचूक केलं जायचं. त्यात रंगवलेले सुंदर पडदे असायचे. वेशभूषा अनेकदा बदलली जायची. उच्च दर्जाची प्रकाशयोजना असायची आणि कार्यक्रमाचा प्रचंड वेग सांभाळत प्रयोग सादर करणारे कसलेले कलाकार असायचे.
पॅनोरामा नावाच्या कार्यक्रमात सरकार झळकले आणि त्यांच्या कारकिर्दीला नवीनच दिशा मिळाली. टी. व्ही अजूनही बाल्यावस्थेत होता पण तरी सरकार यांनी चाणाक्षपणे त्याच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेतला. तोपर्यंत कुठल्याच जादूगाराने हे प्रसारमाध्यम कधी वापरलंच नव्हतं.

फोटो स्रोत, JOHN ZUBRZYCKI'S COLLECTIONS
त्यांच्या प्रयोगाच्या भव्यतेमुळे, रंगमंचावरच्या परिणामकारक सादरीकरणामुळे आणि त्यांच्या स्वतःवरच्या उत्तुंग विश्वासामुळे सरकार सर्वांपेक्षा वेगळे आणि वरचढ दिसू लागले. त्यांनी भारतीय जादू कलेला वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं. पाश्चिमात्य पद्धतीचे हातचलाखीचे प्रयोग अगदी विस्तृत अशा पौर्वात्य चौकटीत बसवत त्यांनी त्यांच्या स्पर्धकांना तोंडात बोटं घालायला लावली.
1970च्या डिसेंबरमध्ये, प्रवास न करण्याचा डॉक्टरचा सल्ला झुगारून, सरकार जपानच्या 4 महिन्यांच्या थकवणाऱ्या दौऱ्यावर गेले. 6 जानेवारी 1971 रोजी त्यांनी होक्काईडो बेटांवरच्या शिबेत्सू शहरात त्यांचा 'इंद्रजाल' हा प्रयोग केला. रंगमंचावरून खाली उतरताच त्यांना हृदयविकाराचा मोठा आणि जीवघेणा झटका आला.
सरकार यांच्या जाण्यानंतर त्यांच्याविषयी अनेकांनी स्तुतीपर लिहिलं. जादूच्या, हातचलाखीच्या इतिहासाचे प्रख्यात अभ्यासक डेव्हिड प्राईस सांगतात, जादूच्या दुनियेत पश्चिमेतल्या बलाढ्य कलाकारांशी बरोबरी करू शकेल अशा स्वतःच्या जादूगाराची भारताला जेव्हा गरज होती. तेव्हाच सरकार यांचं आगमन झालं. ते पुढे म्हणतात, "त्यांच्याच कामामुळे, जादूच्या भारतीय कलेला उभारी आली, आणि तीही अशी की साऱ्या जगातल्या जादूगारांना त्याची नोंद घावी लागावी."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








