जिमला जायचा कंटाळा येतोय? आता आलीये आभासी जिम!

काल्पनिकदृष्ट्या व्यायाम करणारी महिला

फोटो स्रोत, BLACK BOX VR

काल्पनिक जिममध्ये व्यायाम करायला तुम्हाला आवडेल का? कारण असं जिम अस्तित्वात आलं आहे.

Black Box VR या नव्यानंच सुरू झालेल्या स्टार्ट-अप कंपनीने संपूर्ण शरीराचा "व्हर्च्युअल व्यायाम" 30 मिनिटांत पूर्ण करण्यासाठीची एक यंत्रणा विकसित केली आहे.

हे एक विशेष मशीन असून त्यासोबत HTC Vive चं VR हेडसेट लागतं. हे मशीन किंवा ही संपूर्ण यंत्रणा एका घरातल्या बाथरूमच्या आकाराची आहे.

लास वेगासमधल्या Consumer Electronic Show 2018 (CES) या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मोठ्या प्रदर्शनात हे मशीन मांडण्यात आलं आहे. पण या मशीनशी निगडीत सुरक्षेची घ्यायची काळजी या कंपनीनं सगळ्यांना सांगायला हवी, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

या अमेरिकन कंपनीचे संस्थापक रायन देलुका आणि प्रिस्टन लुईस यांनीच bodybuilding.com हे अमेरिकेतलं मोठं फिटनेस साम्राज्य उभं केलं आहे.

व्यायाम करा आणि करत राहा

Black Box VR कंपनीला संपूर्ण अमेरिकेत अशी बुटीक जिम सुरू करायची आहेत, ज्यात प्रत्येकाला या गेमफिल्ड व्यायामाच्या प्रकाराचा लाभ घेता येईल आणि आपली त्यातली प्रगतीही तपासता येईल. घरातही हे उपकरण वापरता येईल, असं याचं नवीन रूप लवकरच येणार आहे.

Black Box VRचे महाव्यवस्थापक जिम ब्रॅडबरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "काही आठवडे जिममध्ये व्यायामाला गेल्यानंतर लोक जिममध्ये जाणं बंद करतात. आम्हाला यावरच उपाय शोधून काढायचा आहे."

काल्पनिकदृष्ट्या व्यायाम करणारा माणूस

फोटो स्रोत, BLACK BOX VR

या उद्योग क्षेत्रातल्या एका व्यक्तीनं ही उत्तम संकल्पना असल्याचं सांगितलं. मात्र त्यानं याबाबत काही चिंताही व्यक्त केल्या आहेत.

"लोकांना सतत व्यायाम करत राहणं फार जिकीरीचं वाटतं. लोकांना जिम आवडेल यासाठी अनेक कल्पना मांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जिम लोकांना आवडावं यासाठी गेमफिल्डच्या माध्यमातून व्यायाम करण्याची संकल्पना अस्तित्वात येणं ही चांगली बाब आहे," असं फॉरेस्टर या कन्सल्टंसीचे जे. पी. गाऊंडर यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, "या मशीनची किंमत मात्र खूपच जास्त आहे. आणि लोकांना वापरण्यासाठी ते कितपत सुरक्षित आहे हा देखील प्रश्न आहे."

या मशीनच्या VR हेडसेटबद्दल बोलताना ते म्हणाले की, "मशीनवर काम करताना वापरण्यात येणाऱ्या हेडसेटची शरीरावर होणाऱ्या परिणामाची तपासणी झाली आहे का? हे Black Box VR कंपनीला सिद्ध करावं लागणार आहे."

वजन कमी होणार

गेम डेव्हलपर आणि सध्या Black Box VR सोबत काम करणाऱ्या जॉब स्टॉफर यांनी या मशीनमुळे आपल्याला व्यक्तीशः फायदा झाल्याचं सांगितलं. या मशीनवर काम केल्यामुळे त्यांचं 37 किलो वजन कमी झाल्याचा त्यांचा दावा आहे.

"2016मध्ये आरोग्याविषयी बेफिकीर असलेला माझ्याइतका कोणीच नसेल. माझं वजन जवळपास 150 किलो होतं. त्यानंतर मी या मशीनचा वापर सुरू केला आणि मला माझ्या शरीरात फरक जाणवू लागला," असं स्टॉफर म्हणाले.

वर्चुअल गेमिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्र

फोटो स्रोत, BLACK BOX VR

या मशीनमधला इंडी हा साऊंड बॉक्सिंगचा गेम खेळून त्यांचे दंड मजबूत झाले. तर स्पेस पायरेट ट्रेनर हा गेम खेळल्यानं त्यांना शरीरातल्या बऱ्याच कॅलरी कमी करता आल्या, असा दावा त्यांनी केला.

"गेम्सच्या व्यवसाय क्षेत्रातील लोक अनेक तास काम करतात. यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. गेम खेळण्यात वेळ जात असताना त्याला व्यायामाची जोड मिळावी, असा Black Box VR कंपनीचा हेतू आहे."

व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजेच आभासी विश्व आणि शारीरिक आरोग्य यांची सांगड घालून नवंच उद्योग विश्व उभं राहत आहे.

गेल्या वर्षीच्या CES मधल्या प्रदर्शनात लॅक्रोस नावाच्या कंपनीनं एक विशिष्ठ पाळणा आणला होता. त्यात बसल्यावर विमानात बसल्याचा अनुभूती यायची. तसंच आपण डोंगराळ रांगांमध्ये असल्याचा भासही त्यातून होणं शक्य होतं.

यावर्षीही चेक प्रजासत्ताक देशातून सेन्स अरेना यांनी देखील असंच एक मशीन बाजारात आणलं आहे. ज्याचा वापर करून आईस हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल यांसारख्या खेळांचं प्रशिक्षण घेता येतं. यामुळे सामन्यादरम्यान होणाऱ्या दुखापतीही टाळता येतात.

झो क्लाईनमेन, लास वेगास यांचं मत

मी दोन मिनिट या मशीनचा डेमो घेऊन काही गेम्स खेळून पाहिलं. आभासी विश्वातल्या गर्दीत गेम खेळताना माझा नकळत व्यायाम होत होता. माझ्या समोरच्या काल्पनिक जगातून माझ्यावर येणाऱ्या बॉल्सना मी पंच मारल्यासारखं करून दूर ढकलत होते.

मी मशीन वारंवार पुढं मागं ओढत असल्याचं मला जाणवत होतं. कारण गेम खेळताना अनेकदा मला असे अडथळे समोर येत होते की ज्यावर मात करण्यासाठी मला शरीराची तशी हालचाल करावी लागत होती.

काल्पनिकदृष्ट्या व्यायाम करणारी महिला

मी गेम चांगला खेळल्यामुळे मला काल्पनिक बक्षीसही मिळालं. पण पुढे संपूर्ण दुपारभर माझे दंड मात्र दुखत होते. पण खेळताना माझ्या प्रतिक्रिया आणि मशीनमधून त्याला येणारा प्रतिसाद यात विशेष अंतर नव्हतं.

हा डेमो तयार करताना त्याचा वापर पुरुष करतील हाच विचार मनात ठेऊन करण्यात आला आहे. पण भविष्यात इतर संगणकांसोबतही हा गेम खेळता येऊ शकेल, असं करण्याचा कंपनीचे सध्या प्रयत्न आहे.

दरम्यान, खेळ खेळून आरोग्य राखणं ही संकल्पना जुनीच आहे. मात्र हाच विचार मनात ठेऊन आता या कंपनीनं हे मशीन तयार केलं आहे. याचा अनुभव घेतल्यानंतर भविष्यातली सोय म्हणून मी याचा वापर करेन किंवा नाही, हे सांगता येणार नाही.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)