You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोहली, धोनी, एबीडीची विकेट घेतल्याचं समाधान : अफगाणचा फिरकीपटू राशीद खान
- Author, सूर्यांशी पांडेय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने काही वेळापूर्वीच आपला पहिलावहिला कसोटी सामना बेंगळुरूत गमावला. पण कसोटीचा दर्जा मिळवून हा सामना खेळणंच त्यांच्यासाठी या क्षणाला मोठी गोष्ट होती. हा क्षण सहज नाही आला, तेही अफगाणिस्तानसारख्या संघर्षग्रस्त देशात तर नाहीच. आणि ही वाटचाल सोपी नक्कीच नव्हती.
भारताविरुद्ध जरी हा एकमेव सामना खेळायला अफगाण संघ आला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या IPLमध्ये त्यांचा फिरकीपटू राशीद खानने भल्याभल्या फलंदाजांना माघारी धाडून संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवलं होतं.
बंगळुरूत पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला बीबीसीशी केलेल्या खास बातचीतमध्ये राशीदने सांगितलं की 'रनमशीन' विराट कोहलीला बाद करणं खास क्षण होता.
"विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी तसंच एबी डी'व्हिलियर्स हे तिघंही दिग्गज खेळाडू आहेत. IPL दरम्यान या तिघांना बाद करता आलं, याचं समाधान आहे. तिघांनाही आउट करताना मजा आली. त्यांची विकेट मिळवणं प्रचंड मोठं यश आहे," असं तो सांगतो.
राशीद सांगतो की त्याने आपल्या खेळाची सुरुवात निर्वासितांच्या कॅम्पमधून केली. "ते वातावरण भीषण होतं. अभ्यास आवडत होता, पण क्रिकेटने त्याची जागा घेतली."
"सात भाऊ, चार बहिणी असा गोतावळा आहे. नोकरी व्यवसायामुळे भाऊ क्रिकेटमध्ये करिअर करू शकले नाहीत. मात्र त्यांच्यावेळी सोयीसुविधाही नव्हत्या," असं तो सांगतो.
गेल्या महिन्यात संपलेल्या IPLच्या हंगामात त्याने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 17 मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या. त्याची ही कामगिरी नक्कीच वा
"या फॉरमॅटमध्ये स्पिनर्सना विकेट मिळवणं कठीण असतं. तिन्ही खेळाडू स्पिनर्सविरुद्ध खोऱ्याने रन्स करतात. त्यांना त्रिफळाचीत करणं मोठं यश आहे. मोठ्या फलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करायची असं डोक्यात होतं. विकेट मिळेल, नाही मिळेल हा नंतरचा भाग होता. त्यांना अडचणीत टाकायचं होतं. त्यांना बोल्ड करणं आनंददायी होतं. माझी टीम जिंकली याचा आनंद जास्त आहे."
"रेकॉर्ड तोडण्याचं डोक्यात नसतं. चांगलं खेळणं हेच उद्दिष्ट आहे. प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा करणं, कौशल्यं अधिक घोटीव करणं महत्त्वाचं आहे, असं राशीद सांगतो.
पाहा राशीदची संपूर्ण मुलाखत
बेंगळुरूमधली टेस्ट मॅच दोनच दिवसात आटोपली असली तरी आता राशीद खान हे नाव भारतीय क्रिकेटप्रेमींना ओळखीतलं झालंय. या सामन्यात त्याने 34.5 षटकांमध्ये 154 धावा देत दोन बळी घेतले.
"भारतीय चाहत्यांची मने जिंकायची आहेत. एखाद्या विदेशी खेळाडूसाठी हे कठीण आहे. भारतात खेळायची मजाच अनोखी आहे. भारतीय चाहत्यांचं मिळणारं प्रेम भारावून टाकणारं असतं.
विकेट मिळाल्यानंतर पुतण्या इरफानच्या सांगण्यावरून विमानभरारी सारखं सेलिब्रेशन करत असल्याचं राशीदने स्पष्ट केलं.
दरम्यान, राशीदच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वारंवार दिसणारी लहान मुलगी कोण? याचा खुलासाही राशीदने केला. "ती माझ्या भावाची मुलगी आहे. तिच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)