ग्वाटेमालात उद्रेक : ज्वालामुखी निद्रिस्त वाटतात खरे...

ग्वाटेमालामधला फ्युएगो ज्वालामुखी

फोटो स्रोत, Francois Boudrias / Getty Images

फोटो कॅप्शन, ग्वाटेमालामधला फ्युएगो ज्वालामुखी
    • Author, डॉ. सारा ब्राऊन
    • Role, युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टल

एकीकडे ग्वाटेमालामधल्या फ्युएगो ज्वालामुखीनं गेल्या काही दिवसांत 75हून अधिक बळी घेतले आहे. दुसरीकडे जवळपास महिन्याभरापासून हवाईतील किलुओया ज्वालामुखीतून लाव्हा रसाच्या नद्यांनी आणि राखेच्या ढगांनी कित्येक डझन गावं गिळंकृत केली आहेत.

वेळोवेळी अशा ज्वालामुखींच्या उद्रेकाच्या बातम्या येतच असतात. पण त्यापासून होणारं नुकसान कसं टाळावं, बचाव कसा करावा, हा नेहमीच एक पेच असतो. मग निदान हे तरी कळायला हवं की जगभरात असे किती जागृत ज्वालामुखी आहेत. आणि किती लोक ज्वालामुखीच्या धोक्यात जगत आहेत?

1. दरवर्षी किती ज्वालामुखींचा उद्रेक होतो?

जगात दरवर्षी सर्वसाधारणपणे 60 ज्वालामुखींचा उद्रेक होतो. यातील काही ज्वालामुखी जागृत आहेत, तर काहींचा उद्रेक हा अचानकपणे होतो.

जागृत ज्वालामुखी म्हणजे ज्यातून उद्रेक होत असतोच, असं नाही. नजीकच्या काळात सक्रिय असणारे आणि पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असणारे ज्वालामुखी जागृत गटात मोडतात.

2. सर्वांत जागृत ज्वालामुखी?

हवाई बेटांवरील किलुओया हा ज्वालामुखी सध्याचा सर्वांत जागृत ज्वालामुखी आहे. 35 वर्षांपूर्वी या ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला. पण गेल्या काही आठवड्यांत हा ज्वालामुखी अधिकच सक्रीय झाला आहे. अगदी लोकांच्या घरामागून लाव्हा घरांच्या मागून वाहत आहे.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : लाव्हा रसानं खाऊन टाकली अख्खी गाडी

सुदैवाने या ज्वालामुखीच्या उद्रेकात मनुष्यहानी झालेली नाही. एक व्यक्ती त्याच्या घराच्या गच्चीत बसलेली असताना या उद्रेकातून उडालेला एक दगड लागून जखमी होण्याच्या घटनेची नोंद आहे. या ज्वालामुखी उद्रेकात झालेली ही एकमेव गंभीर जखमीचं उदाहरण आहे.

यावरून त्या ठिकाणीची मॉनिटरिंग यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन किती चोख काम करत आहे हे दिसून येते.

3. ज्वालामुखीच्या उद्रेकात किती मृत्यू?

साधारण ज्वालामुखीपासून 100 किलोमीटरच्या परिसर धोकादायक मानला जातो. जगभरात जवळपास 80 कोटी लोक या परिसरात राहतात. यातील 20 कोटी लोक एकट्या इंडोनेशियात आहेत.

जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तसतशी अधिकाधिक लोकसंख्या ज्वालामुखींच्या जवळ राहील. जगभरात 81 देशांत असे 1,500 ज्वालामुखी आहेत.

ग्वाटेमालामधल्या फ्युएगो ज्वालामुखीच्या उद्रेकांत अनेकांन बेघर व्हावे लागले.

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, ग्वाटेमालामधल्या फ्युएगो ज्वालामुखीच्या उद्रेकांत अनेकांन बेघर व्हावे लागले.

इ.स. 1,500 पासून ज्वालामुखीच्या उद्रेकात 2 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 1 लाख 70 हजार मृत्यू हे फक्त सहा ज्वालामुखींच्या उद्रेकात झाले आहेत.

तर 2000पासून आतापर्यंत ज्वालामुखीच्या उद्रेकात दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक मृत्यू हे फिलिपिन्स, इंडोनेशिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक काँगो आणि जपानमध्ये झाले आहेत. तर गेल्या वर्षी इटलीमध्ये ज्वालामुखीच्या मुखात पडल्याने तीन पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

ग्वाटेमालामधल्या फ्युएगो ज्वालामुखीच्या उद्रेकाता अनेकांचा बळी गेला आहे.

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, ग्वाटेमालामधल्या फ्युएगो ज्वालामुखीच्या उद्रेकाता अनेकांचा बळी गेला आहे.

ज्वालामुखीच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनी विविध प्रकारचे धोके असतात. किलुओया या ज्वालामुखीच्या हाचलाची वाढल्याचे United States Geological Surveyला (USGS) एप्रिलमध्येच दिसून आलं. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथं पहिली फट दिसून आली. तिच्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाने पाच किलोमीटरचा प्रवास केला आहे. या मार्गावरील घरे नष्ट झाली. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

4. सर्वांत जास्त मृत्यू कशामुळे?

ज्वालामुखीतून बाहेर पडणारा पायरोक्लास्टिक प्रवाहांमुळे (वेगाने वाहणारे तप्त वायू आणि दगडांचे तुडके) आणि लाहर (वाहत्या चिखल आणि राळरोडा) यामुळे झालेले आहेत. गेल्या 500 वर्षांत 1 लाख 20 हजार लोकांचा बळी यामुळे गेला आहे.

अशा पायरोप्लास्टिक फ्लोचं तापमान 700 डिग्री सेल्सियस पर्यंत असतो तसंच त्याचा वेगही फार असतो. या प्रवाहात जे काही येईल, ते नष्ट होतं.

सार्येचेव ज्वालामुखी

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, कुरील बेटांवरील सार्येचेव ज्वालामुखीच्या उद्रेकाचा 2009मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने अंतराळातून टिपलेला फोटो

पायरोक्लास्टिक फ्लोने प्राचीन काळात रोमनमधील पाँपी हे शहर नष्ट केलं होतं. तसंच कॅरेबियन बेटावर 1902 साली 30 हजार लोकांचा बळी घेतला आहे.

पण ज्वालामुखी उद्रेकामुळे जीवितहानी आणि मोठी आपत्ती ओढवतेच, असं नाही.

5. ज्वालामुखीपासून कोणकोणते धोके?

या लाव्हाच्या प्रवाहाचं तापमान साधारण 1,200 डिग्री सेल्सियसपर्यंत असतं. पण त्याची गती इतकी कमी की लोक सहज चालत सुरक्षित स्थळी पोहोचू शकतात. पण जर लोक वेळेत सुरक्षित ठिकाणी नाही पोहोचले, तर मात्रा हा लाव्हा कुणालाही माफ करत नाही. त्याच्या मार्गात येणाऱ्या गाड्या, घरं, झाडं सगळंकाही गिळंकृत करतं.

पण जेव्हा लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात वेळ लागतो तेव्हा धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

इथिओपियातील इर्टा एल ज्वालामुखी
फोटो कॅप्शन, इथिओपियातील इर्टा एल ज्वालामुखी

लाव्हामुळे स्फोटही होऊ शकतात. मिथेन वायूच्या पॉकेट्सही पेट घेऊ शकतात. जेव्हा लाव्हा समुद्राला मिळतो, तेव्हा अस्थिर अशी नवी जमीन आणि लेझ तयार होते. लेझ म्हणजे वायू, हायड्रोक्लोरिक अॅसिड आदींचा थर होय.

हवाई बेटावरील आणखी एक धोका म्हणजे सल्फर डायऑक्साईड होय. ज्वालामुखीचा उद्रेक होत नसतानाही त्यातून अनेक वायू बाहेर पडत असतात त्यातीलच हा एक वायू आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वायूंमुळे मृत्यू होण्याची सर्वांत मोठी घटना कॅमेरूनमध्ये नोंद आहे. 1986 साली इथं 1,500 लोकांचा बळी गेला होता.

6. राखेचा धोका किती?

ज्वालामुखीतून प्रचंड प्रमाणावर राखेचा उद्रेक होतो. ही राख हजारो किलोमीटरवर जाऊ शकते. रस्ते तसंच हवाई वाहतूक आणि इतर सेवा विस्कळीत होतात, शिवाय बराच भाग या राखेखाली झाकला जातो. अशा घटनांनंतर नापिकी, रोगराई, दुष्काळ येणं आणि राख-वायू यांच्यामुळे पर्यावरणात बदल होणं, अशा घटना घडतात.

7. लाहर म्हणजे काय?

लाहरमध्ये खडक, झाडं, उद्ध्वस्त झालेली घरं यांचा समावेश असतो. पाऊस, विरघळलेला बर्फ आणि राख यातून हे ज्वालामुखीचा उतार आणि आजूबाजूच्या दऱ्या इथं वेगाने वाहत येऊन जमा होतात.

ज्वालामुखी

फोटो स्रोत, Getty Images

कोलंबियात 1985 साली लाहरमध्ये अडकून 25 हजार लोकांचा बळी गेला होता.

8. ज्वालामुखींवर लक्ष कसं ठेवतात?

मर्यादित साधनांमुळे जगातील फारच कमी ज्वालामुखींवर लक्ष ठेवणं शक्य आहे. उपग्रहांच्या माध्यमातून जगभरातील दुर्गम भागातील ज्वालामुखींवरही लक्ष ठेवणं शक्य झालं आहे. पण ज्वालामुखींचं प्रत्यक्षात निरीक्षण करण्याची सुविधा फक्त 20 टक्के ज्वालामुखींच्या नजीकच आहे.

सर्वसाधारणपणे दर दोन वर्षांनी यापूर्वी कसलीही नोंद नसलेल्या एक तरी ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. असे ज्वालामुखी जास्त धोकादायक असतात. कारण ज्वालामुखीची सुप्त अवस्था जितकी मोठी, तितका उद्रेक मोठा असतो. शिवाय परिसरातील लोक फारसे सतर्क नसतात.

किलुओया ज्वालामुखी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, किलुओया ज्वालामुखीच्या उद्रेकातून अशी राख बाहेर पडत आहे.

तरीही संशोधक, ज्वालामुखीसाठीच्या निरीक्षण यंत्रणा, आंतरराष्ट्रीय संस्था आपत्तीच्या काळात सतर्कपणे काम करत असतात. त्यामुळेच अनेकांचा प्राण वाचवण्यात यश येतं.

ज्वालामुखीमुळे होणार विध्वंस हा फक्त बळी जाणाऱ्यांच्या संख्येवरून ठरवता येत नाही. अनेकांना घरदार सोडावं लागतं, शेती आणि अर्थव्यवस्थेला होणाऱ्या नुकसानीचे आकडे कोट्यावधी रुपयांच्या घरात असतात. म्हणूनच जेव्हा ज्वालामुखी आपल्याया निद्रिस्त वाटतात तेव्हाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं.

डॉ. सारा ब्राऊन युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलमध्ये सिनिअर रिसर्च असोसिएट इन व्होल्कॅनोलॉजी आहेत.ज्वालामुखींच्या नोंदी, भूतकाळातील घटना, ज्वालामुखींचा लोकांवर होणारा परिणाम आदींवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)