पाहा फोटो : इंडोनेशियातील ज्वालामुखीचं रहस्य समजून घेताना...

इंडोनेशियातील बालीमध्ये माउंट आगुंग ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर परिसरातील लाखभर नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

माउंट आगुंग

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, इंडोनेशियातील बाली बेटावरचा माउंट आगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं वातावरणात प्रचंड धूर आणि राखेचे ढग पसरले आहेत. बाली बेटावर सरकारनं अतिदक्षतेचा इशारा दिला आला आहे. या ज्वालामुखीची छायाचित्रं आता प्रसिद्ध होऊ लागली आहेत. या छायाचित्रांवरून ज्वालामुखीच्या आत नेमक्या कोणत्या घडामोडी घडत असतील याची माहिती ज्वालामुखीच्या अभ्यासक आणि भूगर्भशास्त्रज्ञ जनिन क्रिपनर यांनी दिली आहे. या ज्वालामुखीच्या आत गरम मॅग्मा खदखदत असतो. मॅग्मा म्हणजे खडकांचे वितळलेले तुकडे, गॅस, लाव्हा यांचं मिश्रण. उद्रेकामुळे आता हा आतला मॅग्मा वरच्या बाजूला येत आहे. ही सगळी घुसळण पृथ्वीच्या गर्भातून ज्वालामुखीच्या मुखापर्यंत होत आहे. त्या आगीमुळे राखेची निर्मिती होत असून ही राख आता ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर बाहेर पडत आहे.
माउंट आगुंग

फोटो स्रोत, BAY ISMOYO

फोटो कॅप्शन, दोन महिन्यांपूर्वी या ज्वालामुखीकडे पाहून यात काही हालचाली सुरू आहेत हे समजूही शकलं नसतं. मात्र, ज्वालामुखीच्या परिसरात हलके-हलके धक्के जाणवू लागल्यानंतर तिथे काही गडबड सुरू झाल्याचं जाणवू लागलं. या छायाचित्रात दिसत असलेले ढग म्हणजे पाण्याच्या वाफा आहेत. ज्वालामुखीच्या आत आगीचा भडका उडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ज्वालामुखीत पहिल्यापासूनच असलेली राख आणि लाव्हा याने तो एकप्रकारे स्पंजसारखा झाला होता. इंडोनेशियात वारंवार पाऊस पडत असल्याने हे पाणी या राख आणि लाव्हा यावर साठलं गेलं. परंतु, जेव्हा ज्वालामुखी भडकला तेव्हा या पाण्याची वाफ होऊन ती बाहेर येऊ लागली.
माउंट आगुंग

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, 50 वर्षांनंतर माउंट आगुंगमधून पुन्हा राख बाहेर येऊ लागली आहे. मॅग्मा आतून वर येण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यावरील पाण्याची वाफ होत आहे. या वाफेचा दाब आतल्या दगडांवर वाढत जाणार आहे. ते खडक या वाफेचा जोर थोपवू न शकल्यानं सध्या राख वाफेसह बाहेर पडत आहे. याचा अर्थ पूर्वी ज्वालामुखीत अशा दगडांची संख्या अधिक होती. या दगडांचं घर्षण होऊन आतल्या उष्णतेनं ते वितळले आणि मॅग्मा निर्मितीच्या प्रक्रियेमुळे त्यांची संख्या कमी झाली. आता यातले उरलेले लहान तुकडे राखेच्या रुपात बाहेर पडत आहेत. ज्या वेगात ही राख बाहेर पडत आहे याचा अर्थ त्याच वेगात ज्वालामुखीच्या आतील प्रक्रिया सुरू आहे.
माउंट आगुंग

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, 1963 साली माउंट आगुंगमधून उद्रेक झाला होता. समुद्र सपाटीपासून 26 किलोमीटर उंचीपर्यंत त्याची धग गेली होती. ज्वालामुखीचे तसे अनेक प्रकार असतात. माउंट आगुंग हा अशा प्रकारचा ज्वालामुखी आहे की, त्यातून बाहेर पडणारा मॅग्मा हा 5 ते 15 किलोमीटरपर्यंत बाहेर येऊ शकतो. मात्र, हा उद्रेक पृथ्वीच्या गर्भातून वर आलेला असतो.
माउंट आगुंग

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, रात्रीच्या वेळी माउंट आगुंगच्या मुखापाशी केशरी रंगाचा प्रकाश दिसतो. हा ज्वालामुखीच्या मुखापर्यंत आलेला प्रकाश आतील मॅग्माचा आहे. हा मॅग्मा जेव्हा ज्वालामुखीतून बाहेर पडेल तेव्हा त्याचे लाव्हामध्ये रुपांतर होईल. यासाठी स्थानिक प्रशासनानं चौथ्या पातळीचा सावधानतेचा इशारा नागरिकांसाठी जारी केला आहे. कारण यातून मॅग्मा कधीही बाहेर पडू शकेल, असं या ताज्या छायाचित्रांवरून स्पष्ट होत आहे.
माउंट आगुंग

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, हे माउंट आगुंगचे सकाळच्या प्रकाशात काढलेले छायाचित्र आहे. यात दिसणारा केशरी रंग मात्र मॅग्माचा नाही. उगवत्या सूर्याचे किरण राखेच्या ढगांवर पडल्यानं हा रंग केशरी दिसतो आहे.
माउंट आगुंग

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, माउंट आगुंगमधून बाहेर पडलेल्या राखेचे दोन वेगळे रंग दिसत आहेत. त्यामुळे ज्वालामुखीच्या आता दोन वेगळी मुखं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या रंगांवरून एका मुखातून पाण्याची वाफ आणि दुसऱ्या मुखातून राख बाहेर पडत असावी. 1963 साली झालेल्या उद्रेकावेळी देखील अशीच दोन मुखं तयार झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
माउंट आगुंग

फोटो स्रोत, BNPB

फोटो कॅप्शन, ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या राखेतून बालीमध्ये वेगळीच समस्या उद्धवली आहे. इंडोनेशियात सध्या पाऊस पडत असल्यानं ही राख आणि पाऊस मिसळून चिखल आणि गाळाच्या नद्याच बालीमध्ये वाहताना दिसत आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे नद्यांमध्ये गाळ वाढू लागला आहे. त्यामुळे पूरस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीबद्दल सध्या स्थानिक प्रशासन नागरिकांना जागृत करत आहे.