जपान : 'जेम्स बाँड' ज्वालामुखीच्या उद्रेकाची शक्यता

फोटो स्रोत, Nippon hoso kyokai
जपानमध्ये क्युशू बेटांवर असलेला माउंट शिन्मोडेक ज्वालामुखी फुटण्याची शक्यता असल्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर 4 किमीच्या परिघात दगड उडून येऊ शकतात, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
जेम्स बाँडच्या 'यू ओन्ली लिव्ह ट्वाइस'मध्ये माउंट शिन्मोडेक या ज्वालामुखीचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. तेव्हापासून या ज्वालामुखीला 'जेम्स बाँड' ज्वालामुखी असं म्हटलं जातं.
या भागातील लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या ज्वालामुखीतून राख बाहेर पडत आहे, पण शनिवारी या ज्वालामुखीने रौद्र रूप धारण केलं होतं. या ज्वालामुखीचं हे रूप निदान काही महिने तरी असंच राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Nippon hoso kyokai
1967मध्ये जेम्स बाँडच्या 'यू ओन्ली लिव्ह ट्वाइस'मध्ये माउंट शिन्मोडेक दाखवला गेला होता. तेव्हापासून याला 'जेम्स बाँड' ज्वालामुखी असं म्हटलं जातं.
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सायंकाळी 5.00 वाजता आणि शनिवारी सकाळी 4.30 वाजता ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या उद्रेकानंतर 4,500 मीटर उंचीचा धूर निर्माण झाला, असं जपानच्या हवामान खात्यानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
या उद्रेकामुळं परिसरातल्या इमारती हलल्या आणि लाव्हादेखील बाहेर पडू लागला आहे. 2011मध्ये जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता तेव्हा शेकडो जणांना स्थलांतर करावं लागलं होतं.
जपानमध्ये 110 हून अधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








