ट्रंक कॉल ते मोबाईल : 'हॅलो... हॅलो...'च्या प्रवासातले 5 टप्पे

'हॅलो... हॅलो... बोलतंय कोण?'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'हॅलो... हॅलो... बोलतंय कोण?'

"हॅलो" हा शब्द आपल्या रोजच्या जीवनात असा काही स्थिरावलाय की तो इंग्लिशमधून पाहुणा आलाय हे कधीकधी लक्षात आणून द्यावं लागतं. आज प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन हे टेलिफोनच्या प्रवासातलं खूप पुढचं पाऊल आहे. या बोलक्या प्रवासातले पाच महत्त्वाचे टप्पे कोणते यावर एक नजर टाकू या.

1. ग्रॅहम बेल यांचा टेलिफोन

सर्वसाधारणपणे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना टेलिफोनचा जनक मानतात. पण याबाबत जरा वाद आहे. कारण बेल यांच्याप्रमाणेच इतरही काही लोक पहिला टेलिफोन बनवण्यासाठी धडपडत होते.

टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

इलिशा ग्रे या अमेरिकन तंत्रज्ञानेही पहिला टेलिफोन तयार केल्याचा दावा केला होता. बेल यांच्याप्रमाणेच ग्रे यांनीही आपल्या टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. पण अखेर बेल यांना टेलिफोनचं पेटंट मिळालं. ग्रे यांच्या यंत्राला सांगीतिक धून प्रक्षेपित करणारा इलेक्ट्रिक ट्रान्समीटर असं पेटंट मिळालं.

सुरुवातीचे टेलिफोन असे दिसायचे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरुवातीचे टेलिफोन असे दिसायचे.

बेल यांना पेटंट मिळाल्यानंतर त्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला पण सर्वसाधारणपणे या क्षेत्रात पायाभरणीचं काम करण्याचं श्रेय त्यांनाच जातं.

टेलिफोन येण्यापूर्वी टेलिग्राम म्हणजे 'तार' हा संपर्काचा सगळ्यात जलद मार्ग होता. अमेरिकेत टेलिफोन आल्यानंतर सुरुवातीला त्यालाही बाजारात खस्ता खाव्या लागल्या कारण टेलिग्रामच्या क्षेत्राचा या नव्या प्रतिस्पर्ध्याला विरोध होता.

नंबरची तबकडी असलेले रोटरी फोन्स.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नंबरची तबकडी असलेले रोटरी फोन्स.

2. लँडलाईन फोन

ग्रॅहम बेल यांच्या सुरुवातीच्या फोनमध्ये सुधारणा होत होत पुढे त्याची जागा घेतली लँडलाईन फोन्सनी. भारतात सुरुवातीचा बराच काळ टेलिफोन हे फक्त तार घरांपुरते किंवा पोस्ट ऑफिसपुरते मर्यादित होते.

लँडलाईन फोन आले त्यानंतरही सुरुवातीचा काळ ते फक्त श्रीमंत घरांपुरते मर्यादित होते. 1990 च्या दशकात हळूहळू लँडलाईन फोन्स घराघरात शिरताना दिसायला लागले.

कॉलनीत एक-दोन लोकांच्या घरीच फोन असणं, आसपासच्या प्रत्येकासाठी त्यांच्याच घरी कॉल येणं, मग त्यासाठी निरोप धाडले जाणं यासारख्या गोष्टी हळूहळू कमी झाल्या.

तबकड्या जाऊन बटणं असलेले फोन आले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तबकड्या जाऊन बटणं असलेले फोन आले.

सुरुवातीचे सगळे लँडलाईन फोन हे रोटरी मॉडेलचे होते, नंबर डायल करण्यासाठी यावर एक तबकडी असायची. लँडलाईनला असलेला श्रीमंतीचा टॅग जाऊन तो जसजसा घरोघरी पोचायला लागला तशी त्याच्या मॉडेल्समध्येही प्रगती होत गेली.

डायल करून करून बोटं दुखवणारे रोटरी फोन जाऊन त्यांच्या जागी पुश बटन फोन्स आले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मग कॉर्डलेस फोन्स, कॉलर ID यासारख्या सुविधा असणारे लँडलाईन फोन्स आले. मोबाईलने याला एक वेगळंच वळण दिलं पण त्याबद्दल थोडं पुढे जाऊन वाचा.

3. टेलिफोन बूथ

टेलिफोनला सार्वजनिक रूप देण्यात मोठा वाटा होता ते टेलिफोन बूथचा. शेजाऱ्यांच्या घरून फोनवर बोलताना संकोचून जाणाऱ्यांना यामुळे मोठाच आधार मिळाला.

लोकल कॉलसाठी पी.सी.ओ आले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोकल कॉलसाठी पी.सी.ओ आले.

या बूथमध्ये वेगवेगळ्या सुविधा होत्या. एस. टी. डी. कॉल करायचा झाला तर नंबर डायल करायचा, तो वर लावलेल्या बोर्डवर दिसायचा. कॉल कनेक्ट झाला की मिनिट आणि सेकंदांचा हिशोबही दिसायचा. कॉल संपल्यानंतर 'पल्स'प्रमाणे त्याचं बिल मिळायचं आणि पैसे वळते केले जायचे.

भारतात 1990च्या दशकात झालेल्या संपर्कक्रांतीसाठी पाया घालण्याचं काम राजीव गांधींचे सल्लागार सॅम पिट्रोडा यांना दिलं जातं. याच दशकात भारतात संगणक, इंटरनेट आणि टेलिफोन क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले. जागोजाग उभे राहणारे पी. सी.ओ हे त्याच्याच खुणांपैकी एक असं मानायला हरकत नाही.

मोबाईल येण्याआधी, घराबाहेर असताना फोनवरून बोलण्यासाठीचा सगळ्यात सोयीस्कर पर्याय होता तो म्हणजे पी.सी.ओ चा. केवळ लोकल कॉल करण्यासाठी पी.सी.ओ. चे लाल फोन जागोजाग होते. एक रुपयाचं नाणं टाकून लोकल कॉल करता यायचे.

दूरसंचार मंत्रालाच्या आकडेवारीनुसार मार्च 2014 मध्ये भारतात 7.85 लाख पी.सी.ओ बूथ होते, पण अवघ्या पंधरा महिन्यात म्हणजे जून 2015 मध्ये ही संख्या कमी होऊन 5.77 लाखावर आली. मोबाईल फोन्सच्या वाढत्या उपलब्धतेमुळे हा अतिपरिचित लाल डबा विस्मरणात गेला.

टेलिफोन बूथ आले आणि बाहेर असतानाही फोनवर बोलण्याची सोय झाली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टेलिफोन बूथ आले आणि बाहेर असतानाही फोनवर बोलण्याची सोय झाली.

4. ट्रंक कॉल आणि STD

गेल्या 15-20 वर्षांत जन्माला आलेल्या मुलांना ट्रंक कॉल ही काय भानगड आहे ते कळणार नाही. जुने हिंदी चित्रपट आठवून पाहा. दोन घरं पलीकडे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात बोलणारी पात्रं आठवताएत? ती बहुधा ट्रंक कॉलवर बोलत असायची.

घरोघरी लँडलाईन आले तरीही एका गावाहून दुसऱ्या गावाला कॉल करायचा झाला तर आधी तो टेलिफोन एक्सचेंजमधल्या ऑपरेटर मार्फत बुक करावा लागत असे. मग ऑपरेटर टेलिफोन एक्सचेंजमधून तो नंबर डायल करून आपला कॉल तिकडे जोडत असे. यालाच ट्रंक कॉल असं म्हणत.

ट्रंक कॉल पूर्वी फक्त ऑपरेटर मार्फत लागत असे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रंक कॉल पूर्वी फक्त ऑपरेटर मार्फत लागत असे.

STD म्हणजे सबस्क्रायबर्स ट्रंक डायलिंगची व्यवस्था आल्यावर ट्रंक कॉल्स बुक करण्याचा त्रास संपला. जगभरात टप्प्याटप्प्याने STD पद्धत येत गेली. देशांतर्गत कॉल्स करताना त्या-त्या गावाला देण्यात आलेला STD कोड लावून मग नंबर डायल केला की थेट बोलता येत असे.

5. मोबाईल फोन

मार्टिन कूपर यांना मोबाईल फोनचा जनक मानलं जातं. 3 एप्रिल 1973ला मोटोरोला कंपनीत सिनियर इंजिनिअर असणाऱ्या कूपर यांनी एका प्रतिस्पर्धी कंपनीतल्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की "मी एका अस्सल सेल फोन वरून बोलतो आहे" हाच पहिला मोबाईल फोन कॉल मानला जातो.

सुरुवातीचे मोबाईल फोन मोठे आणि महाग होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरुवातीचे मोबाईल फोन मोठे आणि महाग होते.

सुरुवातीचे मोबाईल फोन प्रचंड महागडे होते आणि अर्थात त्यातल्या सुविधा आत्ताच्या मानानं अगदीच तोकड्या होत्या. 31 जुलै 1995ला भारतात पहिला मोबाईल कॉल केला गेला.

1983साली 3500 डॉलर्स किंमत असलेला फोन आणि आज 4-5हजार रुपयात मिळणारा स्मार्टफोन या दोन्हीत केवढा अमूलाग्र बदल झाला आहे, हे तुम्हीच विचार करून पाहा ना!

स्मार्टफोन ही माबोईल विश्वातली क्रांती आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्मार्टफोन ही माबोईल विश्वातली क्रांती आहे.

एक आकड्यांची गंमत पाहा. 1973 साली जगातला पहिला मोबाईल कॉल केला गेला. त्यानंतर बावीस वर्षांनी म्हणजे 1995 मध्ये भारतातला पहिला मोबाईल कॉल केला गेला. त्यानंतर आणखी बावीस वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये भारतात एक अब्जापेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन झाली.

पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा फोन उचलाल तेव्हा तुमच्या साध्या 'हॅलो' मागे केवढा मोठा इतिहास आहे हे तुम्हाला नक्की आठवेल!

(संकलन : सिद्धनाथ गानू)

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)