You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्वाटेमालाचा ज्वालामुखी : 'मला परत जायचंय माझ्या मुलांना शोधायला'
ग्वाटेमालामधल्या फ्युएगो ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघणाऱ्या लाव्हा रस, अतिउष्ण दगड, माती आणि चिखलाने आतापर्यंत अनेक गावांना वेढलं आहे. कालचा मृतांचा आकडा 25 वरून आज 62 वर गेल्याचं आणि शेकडो लोक जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मेक्सिकोच्या दक्षिणेत असलेल्या ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटीपासून 40 किमी अंतरावर असलेल्या या ज्वालामुखीतून काळा धूर आणि राख आकाशात फेकली जात आहे. ही राख आकाशात 10 किमी उंचीवर पोहोचली असून, आसपासच्या काही गावांवर त्याचा थर पसरला आहे.
ज्वालामुखीभोवतालच्या परिसरातून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून, राजधानीच्या ला ऑरोरा एअरपोर्टवरून उड्डाणं बंद ठेवण्यात आली आहेत.
राष्ट्राध्यक्ष जिम्मी मोराल्स यांनी आपत्कालीन मदत यंत्रणा आपलं काम करत असल्याचं सांगितलं आहे. या ज्वालामुखीचा हा 1974 नंतरचा हा सर्वांत मोठा उद्रेक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ग्वाटेमालाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सेवेचे प्रमुख सर्जिओ कबानास यांनी एका स्थानिक रेडिओ स्टेशनशी बोलताना सांगितलं की लाव्हा रसाचा एक प्रवाह एका लहान गावापर्यंत पोहोचला आहे.
"लोक जखमी झालेत, काही जळून ठार झालेत. आम्ही तातडीने हा परिसर रिकामा करतोय," असं ते पुढे म्हणाले.
या प्रलयातून जीव वाचवून बाहेर पडलेल्या युफेमिया गार्सिया यांना त्यांची दोन मुलं तर सापडली पण इतर दोन मुली, एक मुलगा आणि नातवाचा शोध त्या घेत आहेत. त्यांचे बरेच नातेवाईकही बेपत्ता होते.
"मला इथून जायचं नाही. मला परत जायचंय माझ्या मुलांना शोधायला, पण मी काहीच करू शकत नाही," त्यांनी सांगितलं.
अग्निशमन दलाच्या रुडी चावेझ हे परिसरात वाचलेल्यांना शोधून काढत होते.
"आम्ही हा परिसर रिकामा करतच होतो की आम्हाला एका घरात एक पूर्ण कुटुंब मृतावस्थेत आढळलं. आम्हाला त्यांचे मृतदेह काढण्यात खूप वेळ लागत होता, म्हणून आमच्या जीवालाही तितकाच धोका होता. पण देवाच्या कृपेने आम्ही आमचं काम पूर्ण करून सुरक्षित तिथून बाहेर पडू शकलो," असं त्यांनी सांगितलं.
हा व्हीडिओ पाहिलात का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)