लहान मुलाला वाचवणारा 'स्पायडरमॅन' होणार फ्रान्सचा नागरिक

फोटो स्रोत, Reuters
पॅरिसमध्ये एका उंच इमारतीतून पडलेल्या लहान मुलाला वाचवण्यासाठी मालीचा एक स्थलांतरित स्पायडरमनसारखा चढून आला. आणि त्याने त्या मुलाला वाचवलं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला फ्रान्सचं नागरिकत्व बहाल केलं आहे.
चार वर्षांचा तो लहान मुलगा पडला होता आणि बालकनीतून लटकत होता. तेवढ्यात त्याला वाचवण्यासाठी मालीच्या मामुदू गासामा यांनी जीवाची पर्वा न करता खालून वर बालकनीतून चढायला सुरुवात केली. त्यांच्या या साहसाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
हा प्रसंग याचि देही याचि डोळा अनुभवणाऱ्या उपस्थितांनी मामुदूंचे टाळ्या वाजवून कौतुक केलं.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मामुदू यांची एलसी पॅलेस येथे भेट घेतली आणि त्यांना फ्रेंच नागरिकत्व देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मॅक्रॉन यांनी मामुदू यांचे आभार मानले. त्यांच्या धैर्याची त्यांनी प्रशंसा केली. मामुदू यांना फ्रान्सच्या अग्निशमन दलात सामावून घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
गेल्या वर्षी मामुदू एक लांबलचक आणि धोकादायक प्रवास करून फ्रान्समध्ये दाखल झाले. युरोपपर्यंत येण्यासाठी त्यांनी भुमध्य समुद्रातून इटलीपर्यंत बोटीने प्रवास केला.
पॅरिस शहराच्या उत्तरेकडील भागात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.
"मी त्या भागातून जात होतो. एका बिल्डिंगसमोर गर्दी जमलेली दिसली. माझ्याकडे विचार करायला वेळ नव्हता. मला तेव्हा जे सुचलं ते मी केलं. मी भराभरा बिल्डिंगवर चढलो. देवाने मला बळ दिलं. मी जसजसा वर चढत गेलो तसतसं माझा विश्वास वाढत गेला," असं मामुदू यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP
ते पुढे म्हणाले, "मी बाळाजवळ गेलो तेव्हा ते रडत होतं. त्याच्या पायाला लागलं होतं. मी त्याला धरून वर बाल्कनीत सोडलं आणि सुरक्षित केलं."
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं तोपर्यंत त्यांनी त्या लहान मुलाला सुरक्षित केलं होतं.
"त्या मुलाचं नशीबच म्हणावं की इतक्या उंच बिल्डिंगवर चढून पटकन त्याच्यापर्यंत पोहोचू शकणारा असा धडधाकट माणूस त्यावेळी तिथे होता. मामुदू यांची खरंच कमाल आहे," असं प्रवक्त्याने सांगितलं.
हा प्रसंग घडला त्यावेळी बाळाचे आईबाबा घरी नव्हते. इतक्या लहान मुलाला एकट्याने सोडून गेल्याबद्दल पोलीस त्या मुलाच्या वडिलांची चौकशी करत आहेत. ही घटना घडली तेव्हा मुलाची आई पॅरिस शहरात नसल्याचं सांगितलं जात आहे.
पॅरिसचे महापौर अन-हिडाल्गो यांनीही यांनी 22 वर्षांच्या मामुदू यांचं कौतुक केलं. ही घटना पॅरिस 18 भागात घडली. म्हणून हिडाल्गो यांनी मामुदू यांना 'स्पायडरमॅन ऑफ द 18' असा मान दिला, मामुदू यांनी दाखवलेलं प्रसंगावधान अन्य नागरिकांसाठी आदर्श आहे, असं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








