लिओ वराडकर: आयर्लंडचे पंतप्रधान यांचं सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये असं झालं स्वागत

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे सिंधुदुर्गातल्या मालवण येथील वराड या त्यांच्या मूळ गावी भेटीवर आले आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे त्यांच्या मूळ गावी भेटीवर आले आहेत.

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे सिंधुदुर्गातल्या मालवण येथील वराड या त्यांच्या मूळ गावी भेटीवर आले आहेत.

जून 2017 साली पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे.

"हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. मी माझे आईवडील, माझ्या बहिणी आणि त्यांचे नवरे, काही नातवंडं आणि माझ्या पार्टनरबरोबर इथे आलोय. म्हणजे याला एक मोठ्ठा कौटुंबिक दौराच म्हणता येईल," असं त्यांनी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

"माझ्यासाठी हा दौरा खास आहे. हा माझा खासगी दौरा आहे, पण मला एक पंतप्रधान म्हणून औपचारिक दौरा करायला आवडेल," असंही ते म्हणाले.

त्यांचे वडील अशोक वराडकर हे पेशानं डॉक्टर होते. 1960साली ते भारतातून इंग्लंडला गेले. तिथेच त्यांनी आयरिश वंशाच्या आणि पेशानं नर्स असलेल्या मरियम यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर 70च्या दशकात हे जोडपं आयर्लंडला राहायला गेलं.

लिओ यांचा जन्म 18 जानेवारी 1979मध्ये आयर्लंडची राजधानी असलेल्या डब्लिन शहरात झाला. ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं.

त्यांचं असं स्वागत करण्यात आलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, त्यांचं असं स्वागत करण्यात आलं.

वैद्यकीय व्यवसायाकडून त्यांची वाटचाल राजकारणाकडे झाली. पण ते राजकारणात तरुण वयापासूनच रस घेत होते.

"डॉक्टर फक्त मोजक्याच प्रमाणात रुग्णांना मदत करू शकतात. पण आरोग्यमंत्री मात्र मोठ्या प्रमाणावर लोकांचं आयुष्य बदलवू शकतात," असं लिओ यांनी 1999मध्ये म्हटलं होतं.

आयर्लंडचे पहिले 'गे' पंतप्रधान

वयाच्या 20व्या वर्षी लिओ यांनी स्थानिक निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

डबलिन प्राईड परेडमध्ये लिओ वराडकर

फोटो स्रोत, Facebook / Leo Varadkar

फोटो कॅप्शन, डबलिन प्राईड परेडमध्ये लिओ वराडकर

यानंतर लिओ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 27व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. 2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपद भूषवलं. त्यानंतर 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री होते.

"विषाचा प्याला मी गोड वाईनमध्ये रुपांतरित करू शकेन की नाही, हे मी खात्रीनं सांगू शकत नसलो, तरी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न मी करणार आहे," असं लिओ वराडकर आरोग्य मंत्रिपद स्वीकारताना म्हणाले होते.

त्यानंतर 2017मध्ये फाइन गेल पक्षाच्या लिओ वराडकर यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला आणि आयर्लंडच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली. याबरोबरच 39 वर्षीय लिओ आयर्लंडचे आतापर्यंतचे सर्वांत तरुण पंतप्रधान ठरले. तसंच आयर्लंडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान म्हणूनही त्यांना ओळखलं गेलं.

पंतप्रधान झाल्यानंतर वराडकर यांच्या भारतातल्या नातेवाईकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान झाल्यानंतर वराडकर यांच्या भारतातल्या नातेवाईकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता.

2015मध्ये आयर्लंडच्या सरकारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण समलैंगिक असल्याचं जाहीर केलं होतं.

"मी एक समलिंगी मनुष्य आहे आणि माझ्यासाठी समलैंगिक असणं ही फार मोठी बाब नाही. मला आशा आहे की दुसऱ्या कुणासाठीही ही फार मोठी बाब नसेल. असायला पण नको," असं त्यावेळी लिओ यांनी म्हटलं होतं.

यानंतर काही महिन्यांनी आयर्लंडमध्ये समलैंगिक विवाहावर सार्वमत घेण्यात आलं. या सार्वमताचा कौल समलैंगिक विवाहाच्या बाजूने आला. यासाठी लिओ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यानंतर गर्भपातविरोधी कायद्यात बदल व्हावा म्हणून लिओ प्रयत्नशील होते आणि आता यासंदर्भातल्या सार्वमताचा निकालही त्यांच्या बाजूनं लागला आहे.

गर्भपाताविषयी सार्वमत

आयर्लंडच्या घटनेतील आठव्या कलमामध्ये कोणत्याही स्वरूपाचा गर्भपात न करण्यासंबंधीचा उल्लेख आहे. अनधिकृतरीत्या कोणत्याही महिलेनं गर्भपात केल्यास तिला 14 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यामुळे 2016 मध्येच एकूण 3,265 महिलांनी UKमध्ये जाऊन गर्भपात करवून घेतले होते.

सविता हलप्पनावार

फोटो स्रोत, Pravin Halappanavar

फोटो कॅप्शन, भारतीय वंशाच्या सविता हलप्पनावार या 31 वर्षीय महिलेला 2012मध्ये गर्भपाताला नकार देण्यात आला. सविता यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला.

यानंतर 2017मध्ये गर्भपाताशी निगडीत कायद्यातील बदलांसंबंधी आयर्लंड सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. घटनेतील आठवं कलम बदलण्यात यावं किंवा त्यात सुधारणा करण्यात यावी, अशी सूचना या समितीनं केली होती.

त्यामुळे हे आठवं कलम बदलण्यात यावं की भविष्यात गर्भपातासंबंधी नवा कायदा करण्यात यावा, याची विचारणा आयरिश जनतेला करण्यात आली. त्यासाठी सार्वमत घेण्यात आलं.

"गर्भपातावरील सध्याची बंदी कायम ठेवायची किंवा नाही हा निर्णय आता आयर्लंडच्या जनतेला घ्यायचा आहे," असं वराडकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.

सविता हलप्पनावारचे आई-वडील

फोटो स्रोत, Swati Patil Rajgolkar/BBC

फोटो कॅप्शन, सविता हलप्पनावारचे आई-वडील

26 मे 2018 रोजी आयर्लंडमध्ये घेतलेल्या सार्वमतात जवळपास 66.4 % आयरिश लोकांनी गर्भपातासंबंधीच्या कायद्यात बदल करावा, या बाजूनं मत दिलं तर 33.6 टक्के लोकांनी कायद्यात बदल होऊ नये, या मताचे होते.

"एका आधुनिक देशासाठी एका आधुनिक राज्यघटनेची गरज आहे, असं लोकांनी आज दिलेल्या कौलावरून स्पष्ट होतं," असं मत सार्वमतानंतर वराडकर यांनी व्यक्त केलं.

"गेल्या 20 वर्षांत आयर्लंडमध्ये होणाऱ्या सुप्त क्रांतीची परिणती आज आम्हाला दिसत आहे. तसंच आरोग्याशी निगडित योग्य निर्णय घेण्यासंदर्भात आयरिश मतदार स्त्रियांचा आदर करतात," असंही सुधारणांच्या बाजूनं असलेल्या वराडकर यांनी नमूद केलं.

या सार्वमतामुळे आता महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या 12 आठवड्यांत गर्भपात करता येईल. 12 आठवड्यांपुढे जर महिलेची तब्येत गंभीर होणार असेल तरच, गर्भपाताची परवानगी मिळेल. तसंच, गर्भामध्ये व्यंग आढळल्यासही गर्भपात करता येईल.

(संकलन - श्रीकांत बंगाळे)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)