गर्भपाताची परवानगी असावी?– सविताच्या मृत्यूनंतर आयर्लंडमध्ये सार्वमत

गर्भपात कायद्याने मान्य असावं की नाही?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गर्भपात कायद्याने मान्य असावं की नाही?

मूळ कर्नाटकच्या सविता हलप्पनावार या आयर्लंडमध्ये डेंटिस्ट म्हणून काम करत होत्या. 2012 साली गरोदरपणात त्यांना त्रास सुरू झाला. पती प्रविण हलप्पनावार यांनी त्यांना इथल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल गॉलवेमध्ये नेलं.

"सविताचा गर्भपात घडवून आणण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, मात्र हॉस्पीटलने त्यासाठी नकार दिला अन् सविताची प्रकृती गंभीर झाली," प्रविण हलप्पनावार बीबीसीला सांगतात.

"त्यातच बाळाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सविताची प्रकृती अधिकच बिघडली. यातून सविता बाहेर आलीच नाही आणि तिचे काही अवयव काम करण्याचे थांबले. अखेर 28 ऑक्टोबर 2012 ला सविताचा मृत्यू झाला." त्या 31 वर्षांच्या होत्या.

गर्भपाताची परवानगी नाकारल्यामुळे सविता यांचा मृत्यू झाल्याची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि आयर्लंडमध्ये गर्भपातावरील बंदी उठवण्याची मागणीही जोर धरू लागली.

सविता हलप्पनावार

फोटो स्रोत, Pravin Halappanavar

फोटो कॅप्शन, भारतीय वंशाच्या सविता हलप्पनावार या 31 वर्षीय महिलेला 2012मध्ये गर्भपाताला नकार देण्यात आला. सविता यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला.

त्यानंतर आयर्लंड सरकारनं गर्भपातावरील कायद्यात बदल करावा, अशी मागणी करत जवळपास 2,000 आंदोलकांनी डब्लिनमधल्या आयर्लंडच्या संसदेबाहेर निदर्शनं केली. लंडनमध्येही आयर्लंडच्या दूतावासाबाहेर निदर्शनं झाली.

आता आयर्लंडमध्ये गर्भपातावरील कायद्यान्वये घालण्यात आलेल्या बंदीवर उघड चर्चा होऊ लागली आहे. गर्भपातावर बंदी असावी आणि बंदी असू नये, हा वाद आहेच आणि या वादात दोन्ही मतांचे गट आजही देशात आहेत.

येत्या 25 मेला आयर्लंडमध्ये गर्भपाताभोवतीचा सध्याचा कायदा बदलावा की नाही, यासाठी सार्वमत घेतलं जाणार आहे. आयर्लंडच्या राज्यघटनेतील आठव्या कलमानुसार गर्भापत करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि यासाठी 14 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

म्हणून आजही आयर्लंडमधल्या तरुणींना काही कारणास्तव गर्भपात करण्याची वेळ आली तर इंग्लंड गाठावं लागतं. त्यामुळे गर्भपात करण्यावरच्या अशा बंधनांना आयर्लंडमधल्या महिलांकडूनच विरोध होताना दिसतो आहे.

'लंडनला जाऊन गर्भपात'

गर्भपातावरील बंदी उठवण्याची मागणी लावून धरणारी एक व्यक्ती म्हणजे लुसी. दोन वर्षांपूर्वी लुसी गरोदर राहिली.

ज्या व्यक्तीमुळे लुसी गरोदर झाली होती, तिला लुसीने सगळं सांगितलं होतं. पण त्याच्यासोबत ती कायमस्वरूपी राहणार नसल्यानं तिला बाळ नको होतं. अखेर तिने गर्भपात करण्याचं ठरवलं. पण आयर्लंडमध्ये ते शक्य नव्हतं, हे तिला ठाऊक होतं.

मग तिने इंटरनेटवर याविषयीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पण कुणालाही कळू नये म्हणून ती न चुकता हिस्टरी डिलीट करायची.

ल्युसी, आयर्लंडमधली 20 वर्षीय तरुणी
फोटो कॅप्शन, ल्युसी, आयर्लंडमधली 20 वर्षीय तरुणी

लुसीचा जन्म इंग्लंडमधलाच असल्यानं ती इथल्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (NHS) उपचार घेण्यास पात्र होती. खर्च होता तो केवळ लंडनमध्ये पोहोचण्याचा. पण तिच्या पासपोर्टची मुदत संपल्याने अजून सहा आठवडे थांबावं लागलं. या काळात तिच्यात गरोदरपणाची लक्षणं दिसू लागली होती.

"मी गरोदर असताना मला झोपच नाही यायची. मी गरोदर आहे हे लपवण्यासाठी हरतऱ्हेनं प्रयत्न करायची. त्या काळात मी खूप घाबरलेली होती," ती सांगते.

अखेर लुसीचा पासपोर्ट आला. तिने लंडनच्या एका क्लिनिकमध्ये गर्भपातासाठी वेळ घेतली, कारण तिला एका दिवसांत लंडनला जाऊन लगेच परत घरी यायचं होतं.

"मी सकाळी लवकर उठून विमानतळावर गेले आणि तिथून थेट लंडन गाठलं. मला काही खाता येईल की नाही, याचीही शाश्वती नव्हती, कारण माझं ऑपरेशन होणार होतं. त्या क्लिनिकमध्ये अनेक मुली आपल्या कुटुंबीयांसोबत आल्या होत्या. मलाही कुणाच्यातरी आधाराची गरज होती, पण...", लुसी सांगते.

"माझं ऑपरेशन झालं आणि मग मी एअरपोर्टला येण्यासाठी एका ट्रेनमध्ये शिरले. बसायला जागा नसल्यानं मला उभ्यानं प्रवास करावा लागला. मी आयर्लंडहून निघून एका दिवसांत लंडनला जाऊन गर्भपात करून परतले," लुसी सांगते.

ल्युसी, आयर्लंडमधली 20 वर्षीय तरुणी

"मी जेव्हा गर्भपात करायला गेले होते तेव्हा मला आणखी कुणी गर्भपात केलेली व्यक्ती माहिती नव्हती. असं वाटत होतं की मी कुठल्या तरी दुसऱ्याच देशात आहे, कारण मला जे करायचं होतं, त्यासाठी मला माझाच देश सोडून दुसरीकडे जावं लागलं. कारण माझा देश मला मदत करू शकत नव्हता."

त्यानंतर कोणत्याही अटी न घालता गर्भपातास सरसकट परवानगी मिळावी यासाठीच्या आंदोलनात लुसी सहभागी झाल्या.

आयर्लंडमध्ये अशाप्रकारे गर्भपात करण्याचे प्रकार आता वाढत आहेत. गर्भपाताला परवानगी देण्याच्या बाजूनं असणाऱ्या गटांचं म्हणणं आहे की, दररोज आयर्लंडमधून 12 महिला किंवा मुली लंडनला जाऊन गर्भपात करून परततात.

त्यामुळे लुसीसारख्या अनेक तरुण मुली घटनेतील आठव्या कलमाला विरोध करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

गर्भपाताविषयी सार्वमत

आयर्लंडच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये केवळ 25 अशा गर्भपातांना परवानगी देण्यात आली होती, ज्यात महिलांचा जीव धोक्यात होता.

पण अनधिकृतरीत्या कोणत्याही महिलेनं गर्भपात केल्यास तिला 14 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 2016 मध्येच एकूण 3,265 महिलांनी UKमध्ये जाऊन गर्भपात करवून घेतल्याची नोंद आहे.

फलक

अशा घटना घडल्यानंतर 2017 मध्ये कायद्यातील बदलांसंबंधी आयर्लंड सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. आयर्लंडच्या घटनेतील आठव्या कलमामध्ये कोणत्याही स्वरूपाचा गर्भपात न करण्यासंबंधीचा उल्लेख आहे. हे कलम बदलण्यात यावं किंवा त्यात सुधारणा करण्यात यावी, अशी सूचना या समितीनं केली होती.

त्यामुळे हे आठवं कलम बदलण्यात यावं की भविष्यात गर्भपातासंबंधी नवा कायदा करण्यात यावा, याची विचारणा आयरिश जनतेला केली जाणार आहे. येत्या 25 मेला होणारं सार्वमत ते यासाठीच.

जर, आठव्या कलमात बदल करण्यासंबंधी आयरिश जनतेनं बहुमतानं सकारात्मकता दाखविली तर, तर महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या 12 आठवड्यांत गर्भपात करता येईल. 12 आठवड्यांपुढे जर, महिलेची तब्येत गंभीर होणार असेल तरच, गर्भपाताची परवानगी मिळेल. तसंच, गर्भामध्ये व्यंग आढळल्यासही गर्भपात करता येईल.

'डाऊन सिंड्रोम झालेल्या मुलांचे फोटो नकोत'

आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे. त्यांचं मूळ गाव महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गमध्ये.

एका मराठी कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या वराडकरांची गर्भपाताच्या सार्वमत प्रकरणी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर

याप्रश्नी बीबीसीसोबत बोलताना वराडकर सांगतात की, "गर्भापातावरील सध्याची बंदी कायम ठेवायची किंवा नाही, हा निर्णय आता आयर्लंडच्या जनतेला घ्यायचा आहे. पण गर्भापाताला विरोध करणाऱ्यांनी त्यांच्या पोस्टर्सवर डाऊन सिंड्रोम झालेल्या मुलांच्या चेहऱ्यांचा वापर केला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)