इस्राईलकडून सीरियावर हल्ला; इराणच्या कृतीला प्रत्युत्तर

सीरियात असलेल्या इराणच्या लष्करी ठाण्यांवरचा हल्ला हे त्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचं इस्राईलनं जाहीर केलं आहे.

इस्राईलच्या गोलन हाईट्स परिसरात असलेल्या लष्करी ठाण्यांवर 20 रॉकेट्स डागण्यात आली होती, अशी माहिती इस्राईलच्या लष्करानं दिली आहे.

त्याला उत्तर देण्यासाठी केलेली कारवाई ही अलिकडच्या काळातली व्यापक हवाई कारवाई असल्याची प्रतिक्रिया लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली.

इराणकडून त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सीरियातल्या यादवीचा सामना करण्यासाठी सरकारच्या मदतीसाठी इराणनं लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत.

इराणनं नेहमीच इस्राईलचं अस्तित्व संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सीरियावर गेल्या काही काळात केलेल्या हल्ल्यामुळे इराणकडून असा हल्ला होण्याची शक्यता इस्राईलला वाटत होती. त्यांनी एप्रिल महिन्यात हवाईतळावर केलेल्या हल्ल्यात इराणचे सात जवान ठार झाले होते.

सीरियाची प्रतिक्रिया

इस्राईलच्या या हल्ल्यात 23 लोकांचा मृत्यू झाल्याचं सीरियन ऑब्झर्व्हेटरीनं म्हटलंय. त्यात 5 लष्करी जवानांचा समावेश आहे.

"इस्राईलनं डागलेल्या रॉकेट्स पैकी जास्तीत जास्त रॉकेट्स हाणून पाडण्यात आम्हाला यश आलं आहे," असं सीरियान सैन्यानं म्हटलंय.

या हल्ल्यांमध्ये एक रडार स्टेशन आणि शस्त्रसाठा नष्ट झाल्याचं सीरियन लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

इस्राईलनं हवेतून जमिनीवर 60 आणि हवेतून हवेत 10 रॉकेट्सचा मारा केला, पण त्यातले अर्धे आम्ही पाडले, अशी प्रतिक्रिया रशियाच्या वतीनं देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)