You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...आणि अवयव काढण्याच्या काही क्षणांपूर्वी 'मेलेला' मुलगा जागा झाला!
एक 13 वर्षांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. निदान डॉक्टरांनी तरी त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्याचं जाहीर केलं होतं.
आपल्या काळजाचा तुकडा गमावल्याचं दुःख त्याच्या आईवडिलांना क्षणाक्षणाला जगू देत नव्हतं. पण त्यांना आता पुढचा विचार करायचा होता. त्यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचं ठरवलं. त्यासाठी अर्जही भरला. पण अर्ज भरून झाल्यानंतर हा मुलगा चक्क शुद्धीत आला!
काय! असं कसं?
अमेरिकेतल्या अलाबामा राज्यात राहणाऱ्या ट्रेंटॉन मॅकिनलेच्या गाडीला मार्च महिन्यात अपघात झाला. त्यात कारमधून तो पडला आणि एका मोठ्या ट्रेलरला जाऊन धडकला. त्यात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.
ट्रेंटॉनच्या डोक्याला सात ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं.
ट्रेंटॉनची आई जेनिफर रिंडल सांगतात की, "त्याच्या डोक्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे त्याची किडनी खराब झाली आणि हृदयविकाराचा झटकाही आला. हॉस्पीटलमध्ये एका वेळी तो तब्बल 15 मिनिटं मृतावस्थेत गेल्यासारखा झाला. तो पुन्हा कधीच शुद्धीवर येणार नाही असंही डॉक्टरांनी सांगितलं."
त्याचे अवयव जर दान केले तर इतर पाच गरजू लहान मुलांमध्ये त्यांचं प्रत्यारोपण करता येईल, असंही डॉक्टरांनी त्यांना सांगितलं.
CBS News शी बोलताना रिंडल म्हणाल्या, "आम्ही त्यांना होकार दिला कारण आम्हाला ट्रेंटॉनला कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत पाहायचं होतं. म्हणून त्याचे अवयव दान करण्याचा आम्ही निश्चय केला."
अखेर त्याचा लाईफ सपोर्ट काढण्याच्या तयारी करत असताना डॉक्टरांना जाणवलं की ट्रेंटॉन शुद्धीत येतोय.
"त्याला कायमचं मृत घोषित करण्यासाठी त्याची अंतिम ब्रेन वेव्ह टेस्ट होणार होती. पण तितक्यात तो शुद्धीत आला आणि डॉक्टरांनी ही टेस्ट रद्द केली," त्या सांगतात.
ट्रेंटॉनवर सध्या पुढील उपचार सुरू आहे.
"त्याला चालता-बोलता येत आहे, तसंच वाचन आणि गणितही सोडवता येत आहे, हा म्हणजे एक चमत्कारच आहे," रिंडल सांगतात.
"मी काँक्रिटवर धडकलो आणि एका मोठ्या ट्रेलरचा धक्का माझ्या डोक्याला लागला," ट्रेंटॉन सांगतो. "त्यानंतरचं मला काही आठवत नाही."
त्याला अजूनही वेदना होत आहेत आणि डोक्याचा अर्धा भाग जोडण्यासाठी त्यावर शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
"बेशुद्धावस्थेत असताना मला वाटत होतं की मी खरंच स्वर्गात पोहोचलोय," असं ट्रेंटॉन स्वत: सांगतो. "मी एका मोकळ्या मैदानात एकदम सरळ रेषेत चालत होतो."
पण हे नेमकं कसं झालं?
"देवाशिवाय इतर कुणीही हे स्पष्ट करू शकणार नाही," असं 13 वर्षांच्या ट्रेंटॉन मॅकिनलेला वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)