फेसबुकवर आता आपल्या पाऊलखुणा पुसता येतील आणि 'डेटिंग'ही करता येईल!

आगामी काळात फेसबुक आपल्या युजर्सना त्यांनी कुणाच्या प्रोफाईलवर काय पाहिलंय, काय लाईक केलंय, किंवा कुठल्या पेजेस आणि ग्रुप्समध्ये फेरफटका मारलाय, अशी ब्राऊझिंग हिस्ट्री डिलीट करण्याची सोय देणार आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली.

डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकच्या विश्वासार्हतेसंदर्भात शंका व्यक्त करण्यात येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कंपनीच्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये सहकाऱ्यांना संबोधित करताना झुकरबर्ग बोलत होते. फेसबुकवर 'क्लिअर हिस्ट्री' नावाच्या एका टूलच्या मदतीने आता जुन्या गोष्टी डिलीट करता येतील, असं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

"ही सोपी प्रक्रिया असेल ज्याद्वारे ब्राऊझिंग हिस्ट्री डिलीट करता येऊ शकेल. कोणत्या लिंक्सवर क्लिक केलं आहे, कोणत्या वेबसाईटला भेट दिली आहे हा सगळा तपशील क्लिअर हिस्ट्री टूलच्या माध्यमातून डिलीट करता येईल," असं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

अनेक युझर्सनी याबाबत सांगितलं होतं म्हणूनच हा बदल अंमलात आणला जाणार आहे. फेसबुकवर जाहिराती आणि अन्य टूल्सच्या माध्यमातून ज्या वेबसाइट्स आणि अॅप्स पाहिल्या जातात, त्याबाबतचा तपशील डिलीट करता येईल. ही माहिती सुरक्षित आणि गोपनीय ठेवावी असं युझरला वाटलं तर क्लिअर हिस्ट्री ऑप्शन बंद ठेऊन डेटा सुरक्षित ठेवता येईल.

हितसंबंधांसाठी युझर्सची गोपनीय माहिती केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला विकल्याप्रकरणी फेसबुक अडचणीत सापडलं आहे. फेसबुकचे कोट्यवधी युझर्स आहेत. या युझर्सची माहिती तटस्थ व्यक्ती किंवा कंपनीकडे जाऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल असं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

"डेटालीक हा विश्वासघात होता. पुन्हा असं कधीही होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना केली आहे. अॅप डेव्हलपर्स युझर्सकडून गोपनीय माहिती मागवतात. हे थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डेटा सुरक्षेसाठी ज्या गोष्टी अडसर ठरू शकतात त्या त्रुटी दूर करण्यात येत आहेत," असं झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, 2014 या वर्षात युझर्सचा डेटा चोरणाऱ्या प्रत्येक अॅपची आम्ही कसोशीनं चौकशी करत आहोत. याप्रकरणी काहीही संशयास्पद आढळलं तर स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. कोणत्याही युझरच्या डेटाचा गैरवापर झाल्याचं लक्षात आलं तर अॅप डेव्हलपरवर बंदी घालण्यात येईल.

फेसबुकद्वारे सुरू करण्यात येणार असलेल्या नव्या गोष्टींविषयी झुकरबर्ग यांनी सविस्तर माहिती दिली.

फेसबुक लवकरच डेटिंग सर्व्हिस सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. फेसबुकवर 2 कोटी लोकांनी आपलं स्टेटस सिंगल असं लिहिलं आहे. त्यांना मनासारखा जोडीदार फेसबुक डेटिंगद्वारे मिळू शकेल.

इन्स्टाग्रामवर व्हीडिओ चॅटसह आणखी काही फिल्टर्स देण्यात येणार आहे, असंही झुकरबर्ग यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)