You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेतान्याहू खोटारडे, अण्वस्त्र निर्मितीच्या आरोपांवर इराणचा पलटवार
अण्वस्त्रासंदर्भात इराणने जगाला अंधारात ठेवलं असं वक्तव्य इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना नेतान्याहू खोटारडे असल्याचं इराणनं म्हटलं आहे.
नेतान्याहू यांनी सादर केलेली कागदपत्र 15 वर्षांपूर्वीच्या अण्वस्त्र निर्मिती प्रकल्पाची असल्याचा दावा इराणनं केला आहे. अण्वस्त्रांचा प्रचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केल्यानं अणुबॉम्ब निर्मितीचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असा दावा इराणनं केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या करारातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे मित्रराष्ट्र इंग्लंड आणि फ्रान्स या देशांनी कराराच्या अटींचं पालन व्हावं अशी भूमिका घेतली आहे. या करारानं इराणवर निर्बंध आले आहेत. युरेनियम आधारित अण्वस्त्रं तयार करण्याची इराणची क्षमता कमी झाल्याचं फ्रान्स आणि इंग्लंडचं म्हणणं आहे.
एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या इराण आणि इस्राईल यांच्यातला वाद आता शिगेला पोहोचला आहे. इस्राईलच्या उंबरठ्यावर असलेल्या सीरियामध्ये इराणनं आपल्या सैन्याचा तळ उभा केला आहे.
इराणचं काय म्हणणं?
नेतान्याहू खोटं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते बहराम घासेमी यांनी म्हटलं आहे. नेतान्याहू यांनी केलेले आरोप बिनबुडाचे, तथ्यहीन आणि लाजिरवाणे आहेत असंही ते म्हणाले.
नेतान्याहू यांचे आरोप म्हणजे 'इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी' अर्थात IAEA नं केलेल्या जुन्या आरोपांची पुनरावृत्ती असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झारीफ यांनी सांगितलं आहे.
इस्राईलचा दावा काय होता?
इराण विश्वासू सहकारी नाही असं इस्राईलचं म्हणणं आहे. 2015 मध्ये इराणने सहा देशांशी केलेला करार फक्त कागदोपत्री उरला आहे असा आरोप इ्स्राईलनं केला होता.
इराण सरकारनं लष्करातर्फे कार्यान्वित आण्विक प्रकल्पाची माहिती जाणीवपूर्वक लपवली असं इस्राईलचे लंडन मधले राजदूत मार्क रेजेव्ह यांनी सांगितलं. आम्ही त्यांना रंगेहाथ पकडलं आहे. कराराच्या कलमांचं इराणनं उल्लंघन केलं आहे. कराराची पूर्तता करण्यासाठी इराणनं अण्वस्त्रं निर्मितीचं काम थांबवायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही असं रेजेव्ह म्हणाले.
इराणनं अमाद नावाचा अण्वस्त्रं निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता, असा आरोप नेतान्याहू यांनी केला होता. या प्रकल्पाचा तपशील नेतान्याहू यांनी सादर केला. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नावाखाली इराणध्ये अण्वस्त्रांची निर्मित होत होती, असं नेतान्याहू यांनी सांगितलं होतं.
अमेरिकेची काय भूमिका?
इराणकडे अण्वस्त्रं आहेत याची आम्हाला कल्पना आहे. नेतान्याहू यांनी फक्त त्याचा पुनरुच्चार केला, असं व्हाइट हाऊसतर्फे सांगण्यात आलं. मात्र थोड्या वेळानंतर अमेरिकेनं तांत्रिक चुक सुधारत इराणकडे अण्वस्त्रं होती असं सांगितलं.
इराणच्या युरेनियम साठ्यावर तसंच त्याच्या वापरावर कायमस्वरुपी निर्बंध असावेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं. इराणने कराराच्या अटींची अंमलबजावणी केली नाही तर अमेरिका 12 मे रोजी करारातून बाहेर पडेल असा इशारा ट्रंप यांनी दिला आहे.
काय आहे करार?
इराण, अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात 2015 मध्ये करार झाला. करारानुसार इराण त्यांच्या अण्वस्त्रं कार्यक्रमाला आवर घालेल आणि करारामधील देश इराणवरील आर्थिक प्रतिबंध मागे घेईल.