You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्लॅस्टिकची दुसरी बाजू : 'बंदी ठरू शकते पर्यावरणाला धोकादायक'
प्लॅस्टिकचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणामांवर जगभर चर्चा होत आहे. समुद्रातही प्लॅस्टिकचा कचरा प्रचंड प्रमाणावर साठत आहे. पण 'प्लॅस्टिक विरोधी लढा' असं स्वरूप पर्यावरणाला जास्तच धोकदायक ठरू शकते, अशी भूमिका ब्रिटनच्या संसदीय समितीने घेतली आहे.
म्हणून 'प्लॅस्टिक विरोधात लढा' असे न म्हणता प्लॅस्टिकच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे, असं या समितीनं म्हटले आहे.
प्लॅस्टिक हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे आणि त्यातून आपली सहज सुटका होणं शक्य नाही, अशी भूमिका ब्रिटनच्या संसदीय समितीने घेतली आहे. प्लॅस्टिकबाबत असलेल्या दृष्टिकोनात बदल होणं आवश्यक आहे असं 'द ग्रीन अलायन्स' या समितीचं म्हणणं आहे.
पुनर्वापर करता येणार नाही अशा प्लॅस्टिकचा वापर केल्यास कर भरावा लागेल, अशी शिफारस या समितीनं केलं आहे.
त्यांच्या या शिफारशीचं पर्यावरण तज्ज्ञांनी स्वागत केलं आहे.
प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आल्यास काय नुकसान होईल?
अन्न साठवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर केला जातो. जर आपण प्लॅस्टिक वापरणं बंद केलं तर पॅकेजिंग करता येणार नाही. त्यामुळं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, असं या समितीचं मत आहे.
हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये शेतीचा खूप मोठा वाटा आहे. हे लक्षात घेतलं तर अन्नाची नासाडी थांबवणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे, हे समजून येतं. प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेलं अन्न लवकर खराब होत नाही. पर्यायानं हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.
बायोप्लॅस्टिक फायदेशीर ठरू शकतं का?
द ग्रीन अलायन्सनं आणखी एक चिंता व्यक्त केली आहे. ती म्हणजे प्लॅस्टिकला पर्याय म्हणून वनस्पतींपासून प्लॅस्टिक तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्लॅस्टिकला बायोप्लॅस्टिक म्हणतात. अशा प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी जंगल तोडावी लागतात.
शेतीसाठी जंगलं कापावी लागली त्यामुळं पर्यावरणाचं नुकसान झालं तसेच बायोफ्युएलच्या निर्मितीसाठी जी झाडं लावावी लागत आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. त्यामुळं पर्यावरणाचं नुकसान होत आहे.
बायोप्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी जंगलतोड होईल आणि त्यामुळं हरितगृह वायूचं उत्सर्जन वाढेल. समुद्राची आम्लतादेखील वाढेल, अशी भीती द ग्रीन अलायन्सने व्यक्त केली आहे.
"प्लॅस्टिकचा वापर ही समस्या आहे, यात दुमत नाही पण लोकांच्या रास्त संतापामुळं बाजारपेठेवर आणि सरकारवर चुकीचा परिणाम होता कामा नये. त्यांच्या दबावामुळं चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात त्यातून पर्यावरणाचं नुकसान होऊ शकतं," असं मत द ग्रीन अलायन्सच्या सदस्या लिबी पिके यांनी व्यक्त केलं आहे.
"आपण जो तोडगा काढू त्यामुळं पर्यावरणाचं नुकसान होता कामा नये असा विचार आपण केला पाहिजे. आता हेच उदाहरण घ्या. जनतेच्या आक्रोशामुळं प्रसिद्ध खेळणी उत्पादक लेगोनं आपलं धोरण बदललं. तेलापासून निर्मिती झालेल्या प्लॅस्टिकपासून आम्ही खेळणी बनवणार नाही तर फक्त उसापासून तयार करण्यात आलेल्या प्लॅस्टिकपासून आम्ही खेळणी तयार करू अशी घोषणा त्यांनी केली होती," पुढं त्या सांगतात.
त्यांच्या या पावलाचं कौतुक माध्यमांनी केलं. पण त्यामुळे काही विशेष फायदा झाला असं मला तरी वाटत नाही. कारण लेगो सध्या पॉलिइथिलिनपासून खेळणी बनवत आहे. याचाच अर्थ असा तेलापासून बनलेलं प्लॅस्टिक आणि उसापासून बनलेलं प्लॅस्टिक या दोन्हींमध्ये पॉलिइथिलिन हा घटक समान आहेच. उसापासून बनलेली खेळण्याचं विघटन होण्यासाठी साधारण प्लॅस्टिकचं विघटन होण्याइतकाच वेळ लागेल हे एक विदारक सत्य आहे.
सागरी प्रदूषण
"बायोप्लॅस्टिकपासून बनलेल्या खेळणीची गुणवत्ता ही साधारण प्लॅस्टिकप्रमाणेच असते. ही खेळणी तितकीच टिकाऊ असतात," असं लेगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
यावर द ग्रीन अलायन्सच्या सदस्या पिके म्हणतात, "याचाच अर्थ असा आहे की हे प्लॅस्टिकदेखील साधारण प्लॅस्टिकइतकंच टिकणार. बायोप्लॅस्टिकमध्येही प्लॅस्टिकचे सर्व दोष आढळतात. याचाच अर्थ असा की सागरी प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने हे प्लॅस्टिक उपयुक्त नाही."
"बायोप्लॅस्टिक निर्मितीसाठी लेगोनं सनदशीर मार्गानं शाश्वत कच्चा माल मिळवला. पण जर सर्वजण लेगोप्रमाणे वागू लागले तर त्यांना शाश्वत कच्चा माल मिळणार नाही. त्यामुळं बाजारात असंतुलन निर्माण होऊन हरितगृह वायूचं उत्सर्जन वाढेल," अशी चिंता पिके व्यक्त करतात.
तर मग उपाय काय?
प्लॅस्टिकच्या समस्येवर योजता येण्यासारखे काही उपाय पुढील प्रमाणे :
- स्ट्रॉ किंवा कॉटन बड्स सारख्या वस्तूंच्या निर्मितीवर बंदी घालण्यात यावी कारण या वस्तू रस्त्यावर फेकून दिल्या जातात. त्यांचं रिसायकलिंग होत नाही.
- फक्त रिसायकल होईल असंच प्लॅस्टिक वापरण्यात यावं.
- रिसायकलिंग उद्योगाला चालना मिळेल असं वातावरण तयार करणं.
- तेलापासून निर्माण झालेलं प्लॅस्टिक हे रिसायकल झालेल्या प्लॅस्टिकच्या तुलनेत स्वस्त असतं. त्यामुळं प्लॅस्टिकवर कर लादण्याचा युरोपियन युनियन विचार करत आहे.
- प्लॅस्टिक कचऱ्यामुळं सागरी प्रदूषण वाढत आहे. ही सर्व जगाची चिंता आहे. ही चिंता सुटावी यासाठी सर्व जगानं एकत्र येऊन तोडगा शोधण्याची आवश्यकता आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)