You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्हाला माहितीये, सुंदर असण्याचेही तोटे असतात...
- Author, डेव्हिड रॉबसन
- Role, बीबीसी फ्युचर
तुम्हाला टीव्हीवरच्या जाहिरातीतली ती मुलगी आठवत असेल, जी फेयरनेस क्रीम लावून मुलाखतीला जाते आणि तिला नोकरी मिळते. किंवा तो तरुण जो शाहरुख खानने दिलेल्या क्रीममुळे एका मुलीला डेटवर घेऊन जाण्यात यशस्वी ठरतो. अॅड क्रीमचं असल्यामुळे त्यांचं सौंदर्य आहे, असं दाखवण्यात आलंय. ते कितपत खरं ते तुम्ही ठरवा. मात्र आज या लेखाच्या निमित्ताने एक मोठा उलगडा आम्ही करणार आहोत - सौंदर्यामुळे आयुष्य जर प्रगतीपथावर राहतं तर त्याचे काही दुष्परिणामही असतात!
तुम्ही फार देखणे आहात का? आपल्यापैकी कुणी याचा सखोल विचार केलेला नाही, असं नाही. आपण जर नसाल तर निदान आपण तसं दिसण्याचं स्वप्न तर किमान बघितलेलंच असतं.
आता सौंदर्य हे वर की शाप, यावर मानसशास्त्रात बऱ्याच कालावधीपासून संशोधन चाललं आहे. ज्यांना बांधेसूद शरीर लाभलंय, त्यांचं नक्कीच कौतुक होतं. पण त्यांना याची किंमतही मोजावी लागते का?
सामाजिक मानसशास्त्रज्ञ लिसा स्लॅटेरी वॉकर आणि टोनिया फ्रिवर्ट यांनी शार्लटमधील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामध्ये प्रत्यक्षातील पुराव्यांसह परीक्षण सादर केलं आहे. आणि तुमचा अजिबातच विश्वास बसणार नाही, असं निष्कर्ष हाती आले आहेत.
जर वरवर पाहिलं तर या सौंदर्याभोवती एक वलय कायम असतंच. आता हे बघा ना, एखादी व्यक्ती गुणी दिसली आणि सहयोगी असली तर आपण हे ठरवूनच टाकतो, की त्या व्यक्तीवर सगळ्याच बाबतीत कृपादृष्टी असणार आहे. "एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर सुरुवातीच्या काळातील संवादापासूनच व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपल्याला जाणवतात," असे वॉकर म्हणाल्या.
मानशास्त्रज्ञ म्हणतात, "जे सुंदर ते उत्तम मानलं जातं. आता उदाहरण द्यायचं झालं तर '30 रॉक' या सिटकॉमच्या प्रेक्षकांना हे `द बबल'म्हणून माहिती आहे. यातल्या जॉन हॅमचं पात्र कितीही अपुरं असलं तरीही स्वतःच्या देखणेपणामुळे त्याला आपण सर्वगुणसंपन्न असल्याचा भास त्याला होत राहतो.
कुणाच्या घशात काहीतरी अडकल्यावर एक डॉक्टर म्हणून करायची जी 'हायमलिक' क्रिया असते तीपण त्याला सहजपणे करता आली नाही, परंतु त्याच्या नैसर्गिक चार्ममुळे ते कसंतरी आपली मेडिकलची पदवी मिळवली.
उपलब्ध असलेल्या पुराव्यांनुसार हे `बबल' खरंच अस्तित्वात आहे. वॉकर आणि फ्रिवर्ट शिक्षण व्यवस्थेतली उदाहरणं देतात. शाळेत आणि युनिव्हर्सिटीमधले शिक्षक देखणे विद्यार्थी अधिक सक्षम किंवा प्रतिभावान असतात, असं शिक्कामोर्तब करतात, आणि अर्थातच त्यांच्या गुणांवर त्याचा चांगला परिणाम होतो.
आता हा पारदर्शी 'बबल' वर्षागणिक फुगतच राहतो. "अर्थात हा संकलित परिणाम आहे,'' असं फ्रिवर्ट विषद करतात. त्या म्हणतात की यामुळे "तुमच्यात अधिक आत्मविश्वास येतो आणि तुमची श्रद्धा सकारात्मक बनते आणि तुमच्या सक्षमता आजमावायला अनेक संधी मिळतात."
कामाच्या ठिकाणी तुमचा चेहरा म्हणजे तुमचं नशीब बनतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तर असं दिसून येतं की, आकर्षक लोकांना कमी आकर्षक दिसणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त पैसे वा उच्च पदं मिळतात. एका अभ्यासाअंती असं दिसलं की, MBA पदवीधर विद्यार्थ्यांच्या उत्पन्नात आणि आकर्षक व्यक्तींच्या उत्पन्नात तब्बल 10 ते 15 टक्क्यांचा फरक आहे. संपूर्ण आयुष्यभराचं गणित मांडले तर हा फरक 230,000 डॉलर्स इतका पडतो. वॉकर म्हणतात, "तुम्ही संपूर्ण आयुष्यभर, अगदी शाळेपासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत सर्व फायदे प्राप्त करून घेता असता."
कोर्टातसुद्धा हे होतं. आकर्षक, हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीच्या येण्याने जादूची कांडी फिरावी तसा फरक पडतो. आकर्षक आरोपीलाही अगदी सौम्यशी शिक्षा मिळते, किंवा तो पूर्णपणे मुक्तही होऊ शकतो. याबरोबरचा फिर्यादी आकर्षक असेल तर तो त्याची केस जिंकलाच म्हणून समजा. तसंच परतफेड म्हणून भलीमोठी रक्कमही त्याच्या पदरात पडते, हा प्रभाव वाढत जाणारा आहे, असे वॉकर म्हणाल्या.
असं सगळं असलं तरीही, बहुतांश परिस्थितीत सौंदर्यालाही किंमत मोजावीच लागते. काही परिस्थितींमध्ये तर अगदी उलथापालथ होऊन जाते.
एकवेळी आकर्षक पुरुष चांगले नेते मानले जातात. पण आकर्षक दिसणाऱ्या महिलांना पूर्वग्रहदूषित लैंगिक भेदभावाला सामोरं जावं लागतं, आणि वरच्या स्तरावरील अधिकाराच्या जागेसाठी त्यांना कमी लेखलं जातं.
आणि यामुळे त्यांच्यात मत्सरभावही उद्भवतो, अगदी स्त्री-पुरुष अशा दोहोंमध्ये हा भाव दिसून येतो. एका अभ्यासात तर असेही नमूद करण्यात आलं आहे की एका स्त्रीने सुंदर स्त्रीची किंवा एखाद्या पुरुषाने देखण्या पुरुषाची मुलाखत घेतली तर तुम्हाला ती नोकरी मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक आकर्षक आहात, असं दिसून आलं तर हे होऊच शकते.
याहीपेक्षा वाईट म्हणजे, सुंदर किंवा आकर्षक असल्याने तुमच्या आरोग्याबाबतही गैरसमज असतात. आपण सौंदर्य आणि आरोग्य यांच्यात लगेचच नातं जोडून टाकतो, याचाच परिणाम म्हणजे आकर्षक व्यक्तींचा आजार तितकासा गांभीर्याने घेतला जात नाही.
आता हेच उदाहरण बघा ना, डॉक्टरांचा उपचार करण्याचा कलही सुंदर माणसांपेक्षा सामान्यांकडे अधिक असतो.
आणि हा सौंदर्याचा बुडबुडा कधीकधी एकांतही घेऊन येतो.
1975 साली सादर करण्यात आलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं की माणसं सुंदर स्त्रियांना दुरून वाट देतात! अर्थात त्यामागे आदर हीच भावना असते, पण त्यामुळे अंतरच वाढतं.
"आकर्षक असल्याने दृश्य माध्यमात एखादी व्यक्ती जास्त सामर्थ्यवान वाटतं, पण त्यामुळे इतर व्यक्ती त्यांच्यापासून दूरच राहणं पसंत करतात, अशीही भावना घर करून राहते,'' असे फ्रिवर्ट म्हणाल्या. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'OK Cupid' या ऑनलाइन डेटिंग वेबसाइटने अलीकडेच नमूद केलं की, सुंदर प्रोफाइल पिक्चर असलेल्या व्यक्तींना थोड्या विक्षिप्त, कमी परफेक्ट असलेल्या पिक्चर्सपेक्षा डेट शोधण्याची संधी तशी कमीच असते.
आता तुमच्या लक्षात आलं असेलच, की सुंदर असणं हा काही आनंद मिळवण्याचा पासपोर्ट नाही - हां, त्याची मदत होते एवढे मात्र नक्की. फ्रिवर्ट आणि वॉकर आपल्या सौंदर्याविषयीच्या संकल्पांचा विस्तार करण्यास उत्सुक आहेत, हे परिणाम वरवरचे असतात आणि आपल्या शारिरीक घडणीत त्याचा कुठलाही सखोल अर्थ नसतो.
"आपल्याकडे सौंदर्याच्या अनेक रुढीबद्ध संकल्पना आहेत, आणि आपण त्याचा सक्षमतेशी संबंध जोडतो," असं वॉकर म्हणाल्या. तातडीच्या मूल्यमापनासाठी आकलनाचा शॉर्टकट आहे. "इतर अनेक शॉर्टकटसारखाच आपण तो वापरतो, पण तो तितकासा विश्वासार्ह नक्कीच नसतो," असं फ्रिवर्ट म्हणाल्या. जर ह्यूमन रिसोर्सेस विभागाने उमेदवाराच्या यशाची जास्त माहिती मुलाखतीच्या पूर्वीच दिली तर त्या व्यक्तीबद्दलचा परिणाम अधिक सकारात्मक होऊ शकेल, हे एक उदाहरण आहे.
अखेरीस, फ्रिवर्ट म्हणतात, तुमच्या बाह्यरूपावर तुम्ही खूप लक्ष देत राहिलात, तर त्यामुळे तणाव वाढतो आणि नैराश्य येतं, अगदी निसर्गदत्त सौंदर्याची देणगी असली तरीही. "सौंदर्याच्या मागे धावलात तर तुमच्या अनुभवाची आणि आकर्षकतेची शिदोरी कदाचित कमी होईल," असंही त्या म्हणाल्या. हे अगदी ठरीव असलं तरीही कुठलंही सौंदर्य वाईट व्यक्तिमत्त्वाला झाकू शकत नाही.
लेखक डोरोथी पार्कर यांनी फारच सुरेख शब्दांत हे मांडलंय : "सौंदर्य हे फक्त त्वचेवर असतं, पण वाईट वृत्ती मात्र आत हाडापर्यंत भिनलेली असते."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)