माजी हेरावर विषप्रयोग, रशियाच्या 23 राजनैतिक अधिकाऱ्यांची ब्रिटननं केली हकालपट्टी

फोटो स्रोत, Getty Images
युनायटेडे किंगडम रशियाच्या 23 राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांनी ही घोषण केल्यानंतर काही तासांतच संयुक्त राष्ट्र परिषदेची आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली.
रशियाने रासायनिक अस्त्रांच्या वापरावर असणाऱ्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप यूकेनं केला आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला रशियाने आपल्यावर केलेले सगळे आरोप फेटाळले आहेत.
ब्रिटनमधल्या एका माजी रशियन हेराला नर्व्ह एजंट (मज्जासंस्था बधिर करणारं रसायन) वापरून विष दिल्याचा आरोप ब्रिटननं रशियावर केला आहे. हकालपट्टी केलेले राजनैतिक अधिकारी खरं तर अघोषित हेर होते असं थेरेसा मे यांनी संसदेला सांगितलं.
रशियात होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेचं निमंत्रण देखील मे यांनी नाकारलं आहे. यावर्षाच्या अखेरीस रशियात होणाऱ्या फुटबॉल विश्वकप स्पर्धेत शाही परिवार सहभागी होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं.
रासायनिक अस्त्रांचा वापर करणं इतकं धोकादायक आहे की, युद्धात देखील अशा अस्त्रांचा वापर करण्यावर प्रतिबंध आहे, असं यूकेचे राष्ट्रसंघातले उपअधिकारी जॉनथन एलन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सांगितलं. अमेरिकन राजदूत निकी हॅली यांनीही यूकेचं समर्थन केलं आहे.
दुसऱ्या बाजूला रशियाचे राष्ट्रसंघातले राजदूत वसिली नेबेनझ्या यांनी सगळ्या आरोपांचं खंडन करत यूकेनं आपल्या आरोपांचे ठोस पुरावे द्यावेत अशी मागणी केली आहे.

फोटो स्रोत, EPA
"आमच्यावर जे आरोप लावले आहेत ते सिद्ध करून दाखवावेत. त्यांचे जर ठोस पुरावे नसतील तर फक्त ते म्हणतात की, खरं आहे म्हणून आम्ही त्याकडे लक्ष देऊ शकत नाही."
काही दिवसांपूर्वी दक्षिण इंग्लंडच्या एका भागात रशियन माजी हेर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांची मुलगी युलिया यांना विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता.
66 वर्षांचे सर्गेई आणि 33 वर्षांची त्यांची मुलगी साल्सबरी सिटी सेंटरमध्ये एका बाकावर बेशुद्धावस्थेत आढळले होते. अजूनही त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या विषप्रयोगासाठी रशियाने तयार केलेल्या नर्व्ह एजंटचा वापर केला असा आरोपही केला गेला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








