आमिर खान कसा बनलाय चीनमधला 'सिक्रेट सुपरस्टार'?

आमिर खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2017 च्या बिजिंग आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये निर्देशक नितेश तिवारीसोबत आमिर खान.
    • Author, वंदना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रसारमाध्यमं त्याला प्रेरणादायी सुपरस्टार म्हणतात. चाहते त्याला नान शेन (पुरुष देव) मानतात आणि मुलांसाठी तो 'आमिर अंकल' आहे. बॉलिबुडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान चीनमध्ये भलताच लोकप्रिय आहे.

तिथे त्याचे चित्रपट तर हिट आहेच, शिवाय चाहत्यांनी त्याला अनेक विशेषणंही दिली आहेत. कमाल म्हणजे त्या देशाची संस्कृती भारताशी मिळतीजुळती नाही. आणि भारत आणि चीनमधले संबंधही काही फारसे चांगले नाहीत.

14 मार्च हा आमिर खानचा वाढदिवस. सध्या त्याचे चिनी चाहते 'सिक्रेट सुपरस्टार'च्या यशाचं आनंद साजरा करत आहेत. हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला होता. मागच्या वर्षी त्याचा 'दंगल' सिनेमा चीनमध्ये जबरदस्त हिट ठरला होता.

पाच वर्षांपूर्वी 2013 मध्ये जेव्हा अभिनेता जॅकी चॅन भारतात आला होता तेव्हा तो निवडक पत्रकारांना भेटला होता. त्यांच्यात माझा नंबर लागला होता. भारतीय चित्रपटांच्या बाबतीत विचारल्यावर त्यानं आमिर खान, 'थ्री इडियट्स' आणि बॉलिवुडचा डान्स, या तीन गोष्टींचा उल्लेख केला होता.

आमिर खान

फोटो स्रोत, Disney

फोटो कॅप्शन, दंगल

तेव्हा आमिर खानचं चीनशी इतकं विशेष नातं आहे, हे मला पहिल्यांदा जाणवलं. आता तर हे नातं प्रेमप्रकरणात बदललं आहे.

दुसऱ्या देशांत हिंदी चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात, पण राज कपूर यांच्यानंतर प्रथमच चीनमध्ये एखादा भारतीय अभिनेता इतका प्रसिद्ध झाला आहे.

चीनमध्ये मोदीपेक्षाही पुढे

आमिर चीनचं सोशल नेटवर्किंग साईट वायबो (Weibo, ट्विटरसारखी एक मायक्रोब्लॉगिंग साईट) वर अकाउंट आहे. वायबोवर तिथं आमिरचे सगळ्यांत जास्त फॉलोअर्स आहेत.

आमिर खान वायबोच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत संपर्कात असतो. कधी चिनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा तो देतो, कधी आपल्या नवीन चित्रपटाचा लूक शेअर करतो. कधी चिनी कलाकारांना डान्स शिकवतो, तर कधी चिनी खाद्यपदार्थ खाताना तो दिसतो.

तुम्ही याला जनसंपर्क बळकट करण्याची कवायत मानू शकता. पण तो आपल्या चिनी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो, त्यावरून चीनच्या चाहत्यांबरोबर एक वेगळं नातं तयार करण्यात तो यशस्वी झाला आहे. यावर्षी तो 'सिक्रेट सुपरस्टार'साठी चीनमध्ये गेला होता.

आमिर खान

फोटो स्रोत, Vandana Vijay

2000 मध्ये आलेल्या 'लगान'च्या माध्यमातून चिनी चाहत्यांनी आमिर खानला ओळखायला सुरुवात केली. पण थ्री इडियट्स चित्रपटानं त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर लवकरच 'धूम-3', 'पीके' आणि 'दंगल' आले.

जे इतर स्टार्सला शक्य झालं नाही ते आमिरला कसं काय जमलं? जर चीनमधल्या सोशल मीडियाच्या चर्चा आणि बातम्यांवर एक नजर टाकली तर एक गोष्ट समोर येते. चिनी तरुण आमिरच्या सिनेमातले मुद्दे स्वतःशी जोडून पाहतात.

कॉलेजमध्ये चांगले गुण मिळवण्याचा दबाव, पालकांचं दडपण, व्यवस्थेतले दोष, असे 'थ्री इडियट्स' मधले अनेक मुद्दे चीनच्या युवकांना आपलेसे वाटले.

हॉलिवुडच्या Sci-Fi किंवा अॅक्शन फिल्मच्या उलट आमिरच्या चित्रपटांत सामाजिक न्याय, स्त्री समानता, कौटुंबिक मूल्य, आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी केलेल्या संघर्षाच्या कथा असतात. या गोष्टी चिनी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जातात.

दंगलचा धुमाकूळ

'थ्री इडियट्स', 'पीके' आणि 'धूम-3' लोकांना फार आवडला, पण जेव्हा 'दंगल' 9000 स्क्रीनवर प्रदर्शित झाला तेव्हा आमिरला खरं यश मिळालं. पाहता पाहता 'दंगल' चीनमध्ये सगळ्यांत जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनीसुद्धा 'दंगल'ची स्तुती केली.

मागच्या वर्षी बीबीसीशी बोलताना चीनच्या अनेक प्रेक्षकांनी 'दंगल' आपल्याच आयुष्याची कथा असल्याचं सांगितलं होतं. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची लढाई, वडील आणि मुलांचं नातं आणि चीनमध्ये बायकांना येणाऱ्या अडचणी, अशा अनेक गोष्टी त्यात दाखवल्या होत्या.

आमिर खान

फोटो स्रोत, Wibeo

आमिरच्या शब्दात सांगायचं झालं तर त्याला चीनमध्ये जायला खूप आवडतं. चीनचे लोक खुल्या मनाचे आहेत. हीच गोष्ट त्याला सगळ्यांत जास्त आवडते. ते प्रेमानं आमिरला 'मिचू'म्हणतात.

सत्यमेव जयते सारख्या टीव्ही शोमुळे आमिरची प्रतिमा चीनमध्ये एका मार्गदर्शकाची झाली आहे. त्याचा हा शो चीनच्या एक वेबसाईटवर दाखवला जातो.

पण भारत आणि भारताच्या बाहेर या शोवर प्रचंड टीका झाली होती. भारताबाबत चीनचं धोरण आक्रमक असतं. पण चीनची प्रसारमाध्यमं आमिरची स्तुती करताना थकत नाहीत. साऊथ मॉर्निंग पोस्टने 'मीट द सिक्रेट सुपरस्टार ऑफ चायना' असा लेख लिहिला आहे.

तर स्ट्रेट टाइम्सनं लिहिलं आहे की, 'सिक्रेट सुपरस्टार' हा आमिरने चीनमध्ये आणखी एक हिट चित्रपट दिला आहे. त्याच वेळी आमिर चीनमध्ये भारताची सॉफ्ट पॉवर आहे, असा लेख सुद्धा लिहिला आहे.

आमिर का लोकप्रिय आहे?

चीनच्या चित्रपट चाहत्यांमध्ये आमिर नातं जोडण्यात यशस्वी झाला. पण त्यात त्यानं वेळोवेळी केलेल्या चित्रपटांच्या प्रमोशनचा देखील समावेश आहे. आमिरनं त्याच्या चित्रपटांचं सुरुवातीपासून चांगलं प्रमोशन केलं होतं.

आमिर तिथल्या लोकांमध्ये मिसळतो, तिथल्या स्थानिक कलाकारांना आमंत्रण देतो. यावर्षी सिक्रेट सुपरस्टारसाठी तो सात शहरांच्या दौऱ्यावर गेला, दंगलच्या वेळीसुद्धा त्यानं तसंच केलं होतं.

मार्केटिंग आणि प्रमोशनच्या बाबतीत भारतात त्यांची कायमच स्तुती झाली आहे. काही लोक त्याला ठरवून प्रतिमा उंचावणं, असं देखील म्हणतात.

आमिर खान

फोटो स्रोत, Spice PR

चीनमध्ये दरवर्षी फक्त चार भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. पण 2018 हे पहिलं असं वर्ष आहे की मार्चपर्यंत दोनपेक्षा जास्त हिंदी सिनेमे तिथं प्रदर्शित झाले आहेत.

आमिरच्या 'सिक्रेट सुपरस्टार'ला आणि सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ला चांगलं यश मिळालं आहे. आता इरफान खानचा 'हिंदी मिडियम' तिथं प्रदर्शित होत आहे.

चीमध्ये आमिरसारखं यश इतर भारतीय कलाकारांना मिळेल का, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. पण आमिर खानने लांबचा पल्ला गाठला आहे, हे मात्र नक्की.

असा पल्ला जो त्याची शाळा संपल्यानंतर लगेच सुरू झाला होता - 'पारानोईया' ही 40 मिनिटांची शॉर्ट फिल्म त्याचं पहिलंवहिलं स्वतंत्र काम होतं. ही शॉर्ट फिल्म त्यांच्या शाळेतल्या एका मित्रानं तयार केली होती. तो मित्र बिमल रॉय यांचा नातू आणि बासू भट्टाचार्यांचा मुलगा होता. त्या शॉर्ट फिल्ममध्ये आमिर फक्त अभिनेताच नव्हता तो त्या फिल्मचा स्पॉट बॉय, असिस्टंट डायरेक्टर आणि प्रोडक्शन मॅनेजर सुद्धा होता.

अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक होण्याचे गुण आमिरमध्ये तेव्हापासूनच होते. आणि आज चीनमध्ये त्याचा प्रभाव आहे.

स्वित्झर्लँडच्या डोंगरदऱ्यांमध्ये शाहरूख खानचा कब्जा असला तरी चीनची भिंत पार करणारा फक्त आमिर खानच आहे. पण चिनी चाहते आणि आमिरमधलं हे प्रेम एकतर्फी नाही. त्यांनेही आपल्या चाहत्यांसाठी थोडी मँडरिन शिकण्याचा निश्चय केला आहे.

हे पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: प्रिया प्रकाशची खास मुलाखत

हे तुम्ही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)