उत्तर प्रदेश : योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये भाजपच्या पराभवाची 4 कारणं

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अनुक्रमे गोरखपूर आणि फुलपूरच्या लोकसभेच्या जागा रिकाम्या झाल्या होत्या.
त्यासाठी 11 मार्चला पोटनिवडणुका घेण्यात आल्या. गोरखपूर मतदारसंघात 47.75 टक्के तर फुलपूर मतदारसंघात 37.39 टक्के मतदान झाले होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या फुलपूरमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने युती केली होती.
फूलपूरमध्ये समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची विजयाचा दिशेने आघाडी स्पष्ट होताच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.
समाजवादी पाटीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, "या उपनिवडणुकांमधून एक राजकीय संदेश देण्यात आला आहे. योगी सरकारवर जनता नाराज आहे. मायावती यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभार मानतो."

फोटो स्रोत, AKHILESH YADAV TWITTER
"जनतेला दिलेली आश्वासनं भाजपने पाळली नाहीत. म्हणून जनता त्यांच्या पराभवासाठी एकत्र आली आहे. जनतेचं स्वागत," असंही अखिलेश म्हणाले.
'अतिआत्मविश्वास महागात पडला'
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी बोलताना फूलपूर आणि गोरखपूरमध्ये झालेला पराभव स्वीकारला. ते म्हणाले, "अतिआत्मविश्वास आम्हाला महागात पडला. शेवटच्या क्षणी सपा आणि बसपा यांनी युती केली. स्थानिक मुद्द्यांनी निवडणुकीवर प्रभाव टाकला. दोन्ही निवडणुकांमधल्या पराभवांचं आम्ही विश्लेषण करू. मतदान टक्केवारी कमी झाल्याने फरक पडला."
अररिया लोकसभा मतदारसंघात राजद
दुसरीकडे, बिहारच्या अररिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे खासदार तसलीमुद्दीन यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात आली. इथं त्यांचा मुलगा सरफराज अहमद हे राजदच्या तिकीटावर निवडणुकीत उभे होते. भाजपचे उमेदवार प्रदीप सिंह यांचा 61,988 मतांनी पराभव केला.
याशिवाय बिहारच्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांची आज मतमोजणी होती. जहानाबाद मतदारसंघात राष्ट्रीय जनता दल आणि तर भभुआ मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे.

जेष्ठ पत्रकार शरद गुप्ता याचं विश्लेषण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गुजरात आणि त्रिपुरामध्ये भाजपला मिळालेल्या विजयाचं श्रेय दिलं जात होतं. कर्नाटकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पक्षाच्या प्रचारासाठीही त्यांना पाठवण्यात येत होतं. पण आदित्यनाथ आपल्या मतदारसंघ पुन्हा पक्षासाठी जिंकण्यात अपयशी ठरले आहेत.
तर दुसरीकडे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे 52 टक्के मत मिळवून लोकसभा निवडणुक जिंकले होते. तेच मौर्य यंदा आपली जागा पक्षासाठी जिंकून नाही आणू शकले.
अखेर असे निकाल का आले. या दोन्ही जागांवर भाजपचे मतदार तीन ते साडेतीन लाखांनी कसे काय कमी झाले.
1. चुकीचे उमेदवार
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, गोरखपूरमध्ये केवळ गोरखपूर पीठावरील व्यक्तीच निवडणूक जिंकू शकते. पण पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने गोरखपूरमधले पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र शुक्ल यांची निवड केली.
गोरखपूरच्या आजूबाजूच्या परिसरात जगदंबिका पाल यांना सोडलं तर इतर सर्व खासदार ब्राह्मण आहेत. अशा वेळी आणखी एका ब्राह्मण उमेदवाराला निवडणुकीत उभं करणं, हे जातीय समीकरणांच्या हिशोबानं अगदी चुकीचं होतं.

तसंही गोरखपूरमध्ये निषादसह मागासवर्गीय जातींची संख्या मोठी आहे. हेच कारण आहे की समाजवादी पार्टीने कधी तरी फूलनदेवीला इथून उमेदवारी दिली होती. आणि याच कारणांमुळे आता समाजवादी पार्टीच्या निषाद यांना विविध जातींची मतं मिळाली.
2. जातीय समीकरण
याचं महत्त्व मुलायम सिंह यांनी ओळखलं होतं. तेव्हाच तर 1999मध्ये त्यांनी गोरखपूरहून गोरख निषाद यांना उमेदवार केलं होतं.
अशातच फुलपूरमध्ये मौर्य हे आपल्या पत्नीला उमेदवारी देऊ इच्छित होते. पण पक्ष यासाठी तयार नव्हता. पक्षाने कौशलेंद्र सिंह पटेल यांना तिकीट दिलं जे स्थानिक नव्हते.
दुसरीकडे समाजवादी पार्टीचा उमेदवार हा स्थानिक असल्याचा फायदा त्यांना मिळाला.
अलाहाबादचे तीन मंत्री - नंद कुमार गुप्ता नंदी, सिद्धार्थ नाथ आणि मौर्य यांच्या आपआपसात पटत नाही. पटेल यांच्यातील कोणाच्याच पसंतीचे उमेदवार नव्हते.
मौर्य यांनी भलेही 11 दिवस फुलपूरमध्ये थांबून 100पेक्षा जास्त प्रचारसभा घेतल्या पण निकाल काही वेगळाच लागला. फुलपूरमध्ये दलित आणि मागासवर्गीयांची संख्या जवळपास 70 टक्के आहे. सपा आणि बसपा हे एकत्र आल्याने सगळ्यांनी या युतीच्या उमदावाराला जोरदार मतदान केलं.
3. नाराज लोक आणि कार्यकर्ते
राज्य सरकारच्या कामकाजाने लोक नाराज होते. एक वर्षात राज्य सरकारने शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ यांना नाराज केलं. ज्येष्ठांची पेंशन बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच घाला घातला.
याशिवाय पक्षाचे कार्यकर्ते नेतृत्वावर नाराज होते. नेते त्यांना भेटत नाहीत. त्यांची कामं होत नाहीत. यातून एक संदेश गेला की सत्ता मिळाल्यानंतर नेते हे सत्तांध झाले आहेत.

फोटो स्रोत, LUDOVIC MARIN/GETTY IMAGES
हेच नव्हे तर संघटनेचं दायित्व सांभाळणारे लोकही कार्यकर्त्यांना टाळत होते. शेवटी कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांमुळेच मजबूत असतो. हेच कारण असेल की भाजपच्या पराभवाच्या जल्लोषात सपा आणि बसपाशिवाय भाजपचेही काही कार्यकर्ते सहभागी होते.
पक्षाच्या केंद्रीय आणि प्रदेश कार्यकारिणीने या निवडणुकांना कितपत गंभीर्याने घेतलं होतं, हे जाहीर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे प्रचारासाठी गेले नव्हते. हेच नव्हे तर निवडणुकांचे प्रभारी म्हणून अनूप गुप्ता आणि शिव नारायण शुक्ल या कमी वजनदार नेत्यांची निवड करण्यात आली होती.
पक्षाला योगी आणि मौर्य यांच राजकीय महत्त्व तर कमी करू इच्छित नाही?
4. युती हे कारण ठरत नाही
हे म्हणणं योग्य ठरणार नाही की सपा आणि बसपा एकत्र आल्याने भाजप हरलं. मागील निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांना मिळालेली मत एखत्र केली तरी ते भाजपच्या उमेदवाराला हरवू नाही शकत.

गोरखपूरमध्ये 2009मध्ये सपाचे उमेदवार मनोज तिवारी (जे आता दिल्ली भाजपचे अध्यक्ष आहेत) यांना 11 टक्के मतं मिळाली होती आणि बसपाच्या विनय शंकर तिवारी यांना 24.4 टक्के मत मिळाली होती. तथापि, दोघं मिळूनही योगी आदित्यनाथ यांना हरवू शकत नव्हते. कारण त्यांना जवळपास 54 टक्के मतं मिळाली होती.
2014 मध्ये मोदी लाट असूनही योगी यांना त्याआधीच्या तुलनेत दोन टक्के मतं कमी मिळाली होती. असं असलं तरी सपाला मिळालेली 22 टक्के मतं आणि बसपाला मिळालेली 17 टक्के मतं बघता योगी यांना हरवणं मुश्कील होतं. हीच स्थिती फुलपूरमध्येही होती.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








