अमेरिका निवडणूक हस्तक्षेप : 13 रशियन नागरिकांवर आरोप

2016साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्यावरून अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयनं 13 रशियन नागरिकांविरोधात आरोप निश्चित केले आहेत.

बेकायदेशीरपणे अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप या लोकांवर आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून धोका देणं आणि खोट्या ओळखीचा वापर करणं, अशा स्वरूपाचे आरोप तिघांवर आहेत. याशिवाय 3 रशियन कंपन्यांवरही आरोप आहेत. या प्रकरणी तपास करणारे स्पेशल काऊन्सेल रोबर्ट म्युलेर यांनी हे आरोप दाखल केले आहेत.

डेप्युटी जनरल रॉड रोसनस्टाइन यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.

ते म्हणाले, "कोणत्याही अमेरिकन नागरिकावर या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप नव्हता. तसंच रशियानं केलेल्या प्रयत्नांमुळे निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झालेला नाही."

आरोप काय आहेत?

आरोप निश्चित करण्यात आलेल्या रशियन नागरिकांनी स्वत:ला अमेरिकाचे नागरिक भासवून बँकांमध्ये खाती उघडली. तसंच राजकीय जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले तसेच अमेरिकेत राजकीय रॅली घडवून आणल्या, असाही आरोप आहे.

या लोकांनी सोशल मीडियावर खोटी अकाऊंट सुरू करून राजकीय पोस्ट लिहिल्या. त्या माध्यमातून हिलरी क्लिंटन यांना कमी लेखलं जाईल, अशा माहितीचा प्रचार करण्यात आला. पैसे घेऊन अमेरिकेतील सोशल मीडियांवर हे लेखन करण्यात आलं.

महिन्यासाठीचं त्यांचं बजेट 12 लाख 50 हजार डॉलरचं होतं. सोशल मीडियावरील पोस्टला लोकांची काय प्रतिक्रिया मिळत आहे, यावरून हे लोक त्यांची कार्यपद्धती ठरवत होते.

ट्रंप म्हणतात...

दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये असंही म्हटलं आहे की, 2014पासूनच या लोकांनी निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी तयारी सुरू केली होती.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या मुद्द्यावर ट्वीट केलं आहे की, "मी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहण्यापूर्वीच 2014पासून रशियानं अमेरिकेच्या निवडणुकींविरुद्ध तयारी सुरू केली होती. असं असलं तरी, निवडणूक निकालावर त्याचा काही प्रभाव पडला नाही. मी आणि माझ्या प्रचार यंत्रणेनं मात्र कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही."

रशियाची प्रतिक्रिया

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा यांनी रशियावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, "अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचं बजेट करोडो रुपयांचं आहे. असं असताना 13 लोक अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतात. हे कसं शक्य आहे?"

आरोपपत्रात रशियाच्या जेनी प्रशोगिन यांचं नाव आहे. त्यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या जवळचे मानलं जातं. त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

"अमेरिकेच्या लोकांना तेच दिसतं जे त्यांना बघायचं असतं," अशी प्रतिक्रिया प्रगोशिन यांनी दिली आहे.

सोशल मीडिया कंपन्यांचं म्हणणं काय?

सोशल मीडियाचा राजकीयदृष्ट्या गैरफायदा घेण्यासाठी वापर करण्यात येत असल्यानं, या कंपन्यांनी अधिक खबरदारी बाळगणं गरजेचं आहे, असं दोन्ही प्रमुख पक्षांनी म्हटलं आहे.

"मूलर यांनी केलेल्या तपासावर फेसबुकनं लक्ष देऊन काम केलं आहे. पण अशा प्रकारची गैरकृत्ये रोखण्यासाठी अधिक काम करणं गरजेचं आहे," असं फेसबुकनं निवेदनात म्हटलं आहे.

"निवडणूक काळात केलेल्या क्रिया-प्रतिक्रिया असह्य होत्या आणि आम्ही तपास कर्मचाऱ्यांबरोबर काम करत होतो. पण एकट्या टेक कंपन्या या गोष्टीला पराभूत करू शकत नाही," असं ट्वीटरनं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)