रस्ता ओलांडणाऱ्या पुरुषांना गर्लफ्रेंड मिळते तेव्हा...

    • Author, न्यूज फ्रॉम एल्सव्हेअर
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग

तैवानमध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या ट्रॅफिक सिग्नलच्या दिव्यांमध्ये असलेल्या पुरुषांना 'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला गर्लफ्रेंड मिळाली आहे.

तैवान न्यूज या वेबसाईटनुसार, "पिंगटाँग काऊंटीमध्ये ट्रॅफिक सिग्नलवरच्या दिव्यांमध्ये जोडप्यांचं डिझाईन असणाऱ्या 40 पादचारी चिन्हांचं अनावरण नुकतंच करण्यात आलं आहे."

लाल रंगाच्या दिव्यात त्यातील माणूस गुडघ्यांवर बसून प्रेयसीला प्रपोज करताना दिसून येत आहे, तर हिरव्या रंगाचा माणूस प्रेयसीचा हात हातात घेऊन रस्ता ओलांडताना दिसून येत आहे.

डिसेंबरमध्ये पिंगटाँग काऊंटी पोलिसांकडून या डिझाईन्सची मर्यादित कालावधीकरिता चाचणी घेण्यात आली होती.

डिसेंबरमध्येच त्यांनी 2018पासून संपूर्ण देशभरात ही डिझाईन्स वापरण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. त्यांच्यानुसार, या नव्या प्रणालीमुळे देशातले 18 वर्षं जुने असलेले ट्रॅफिकचे दिवे जास्त आकर्षक दिसतील.

"या डिझाईनमुळे पिंगटाँग काऊंटी प्रेक्षणीय बनेल आणि प्रेमानं गजबजलेलं वाटेल," असं पिंगटाँग काऊंटीचे महापौर पेन-मेन-अॅन यांनी तैवान न्यूजशी बोलताना सांगितलं.

"या नवीन डिझाईन्समधून सुरक्षेसाठी खबरदारी बाळगण्याचं सांगण्यात आलं आहे," असं डिझायनर चेंग-दा-वेई सांगतात.

"यामुळे लोकांचं सुरक्षित प्रवासाकडे लक्ष वेधलं जाईल, तसंच तरूणांमध्ये जागरुकता वाढण्यास मदत होईल," असं त्यांनी डिसेंबरमध्ये अॅपल डेलीला सांगितलं होतं.

असं असलं तरी ट्रॅफिक लाईट डिझाईनमध्ये बदल करणारा तैवान हा काही पहिला देश नाही. संस्कृतीविषयक जागरुकतेसाठी बऱ्याच देशांनी यापूर्वीच असं पाऊल उचललं आहे.

नेदरलँडमधल्या यूट्रेक्ट शहरात ट्रॅफिक लाईटवर मिफ्फी या सशाच्या कार्टून प्रतिमेचं चित्रण करण्यात आलं होतं. डिक ब्रूना यांना श्रद्धांजली म्हणून असा बदल करण्यात आला होता.

तसंच मार्च 2017मध्ये लिंगभेदाकडे लक्ष वेधण्यासाठी ऑस्ट्रलियाच्या मेलबर्न शहरात ट्रॅफिक लाईट सिग्नलवर महिलाविषयक पात्र डिझाईन करण्यात आले होते.

(केरी अॅलन यांचा रिपोर्ट)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)