You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियात थंडीचा कहर : मॉस्कोत फक्त सहा मिनिटं दिसतोय सूर्य
मागच्या वर्षीचा डिसेंबर महिना मॉस्कोच्या इतिहासात सगळ्यांत अंधारलेला होता, असं निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. 'डिसेंबर महिन्यात सूर्य एकदाही तळपलेला दिसला नाही,' असा अहवाल मेटॅनोवॉस्टी पोर्टलनं दिला आहे. हे पोर्टल हवामानविषयक विषयांमध्ये काम करतं.
या पोर्टलच्या अहवालानुसार गेल्या महिन्यात रशियात सरासरी फक्त सहा मिनिटांसाठी सूर्य दिसत होता.
डिसेंबर महिन्यात कुंद वातावरण असतं. अनेकदा ढगाळ वातावरण असतं, असं रशियन हायड्रोमेट्रॉलॉजिकल सेंटरचे संचालक रोमन विलफँड यांनी RBC या न्यूज पॉर्टलला सांगितलं.
"या थंडीत वातावरण नेहमीपेक्षा पाच ते सहा अंशांनी जास्त होतं," विलफँड सांगत होते. "हे सगळं अटलांटिक एअर मासेस मध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे होतं आहे. त्यामुळे तिथे अजिबात सूर्य दिसत नाही," असं विलफँड यांनी बीबीसीला सांगितलं.
असा अंधार डिसेंबर 2000 मध्ये आला होता. तेव्हा मॉस्को येथे फक्त तीन तास सूर्यप्रकाश आकाशाच्या आरपार जाऊ शकत होता.
खरं चित्र हे इतकं अंधकारमय नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गेल्या दोन महिन्यांत मिळून जितके दिवस सूर्यप्रकाश होता त्यापेक्षा जास्त सूर्यप्रकाश आहे.
'मद्यप्राशनामुळे अंगातली उष्णता कमी होते'
सध्याच्या काही दिवसांत मॉस्कोमधलं तापमान उणे आठ डिग्री आहे. पण यकुतिया भाग सगळ्यांत थंड भाग समजला जातो. तिथे तापमान उणे 60 अंश असतं.
रशियात उणे 50 अंश तापमान पोहोचल्यावर तिथल्या शाळा बंद होतात.
रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने लोकांना मद्यप्राशन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण मद्यप्राशनामुळे अंगातली उष्णता कमी होते. तसंच रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी सैलसर कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे.
तसंच अशा वातावरणात पायातले बूट न काढण्याचा सल्ला दिला आहे कारण एकदा बूट काढले तर पुन्हा घालायला त्रास होईल.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
रशियात सायबेरियाच्या ओईमकॉन गावात पारा उणे 62 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. तिथे बर्फाची मोठी चादर पसरलेली दिसते आहे. तिथे राहणारे लोक सोशल मीडियावरून जगाला आपल्या परिस्थितीविषयी माहिती सांगत आहेत.
रशियात राहणारी 24 वर्षीय महिला अनास्तासिया ग्रुजदेवा हिचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. थंडीमुळे तिच्या पापण्यांपर्यंत बर्फ साचला आहे.
इथे तापमान इतकं कमी झालं आहे की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असलेलं डिजिटल थर्मामीटरसुद्धा तुटलं.
ओईमाकॉन येथे 1933 साली सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली होती. तेव्हा पारा उणे 68 डिग्रीपेक्षाही खाली गेला होता.
जगातला सगळ्यांत थंड प्रदेश
ओईमकॉन हा बर्फाळ प्रदेशातलं एक छोटंसं गाव आहे. इथे दूरदूरपर्यंत जमीन दिसत नाही. सगळीकडे फक्त बर्फ दिसतो आहे.
पोल ऑफ कोल्ड या नावानं ओळखला जाणारं हे गाव मनुष्यवस्तीत असलेलं सगळ्यांत थंड ठिकाण आहे.
गंमत म्हणजे या गावाच्या नावाचा अर्थ जिथे कधीही पाणी जमत नाही असा होतो. उलट तिथेच सगळ्यांत जास्त बर्फ जमताना दिसतो.
मग तिथे लोक का राहतात?
फोटो बघून तिथे लोक का राहतात आणि कसं राहतात असे प्रश्न नक्कीच पडू शकतात.
त्याचं उत्तर इतिहासात दडलं आहे. खरंतर 1920-30 या काळात सैन्य आणि गुराखी लोकांची ही लपण्याची जागा होती.
सोव्हिएत सरकारने इथल्या भटक्या लोकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. पण असं करण्यात त्यांना यश न मिळाल्याने त्यांना नेहमीकरता त्यांना आइमोकॉनमध्ये वसवलं. तेव्हापासून लोक या थंड जागेत रहात आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)