You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : ही चिमुरडी जन्मली तेव्हा तिचं हृदय शरीराबाहेर होतं
- Author, फर्ग्युस वॉल्श
- Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी
'हृदय धडधडणं' हा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. पण प्रत्यक्षात छातीबाहेर धडधडणारं हृदय कधी पाहिलं आहेत का?
UKमधील लेस्टर शहरातल्या ग्नेलफिल्ड हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या व्हॅनेलोप होप विकीन्सचं हृदय असं शरीराबाहेर धडधडत होतं. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवण्यात आला.
व्हेनेलोप जन्माला यायच्या आधीच तिला छातीचं हाड नाही आणि तिचं हृदय छातीच्या पिंजऱ्याबाहेर असल्याचं कळलं होतं. डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना म्हणजेच नाओमी फिंडले आणि डीन विल्कीन्स या दोघांना या प्रकारची कल्पना दिली होती.
वैद्यकीय भाषेत या प्रकाराला इक्टोपिया कॉर्डिस असं म्हणतात. हा प्रकार 'दहा लाखांत एक' इतका दुर्मिळ आहे. इक्टोपिया कॉर्डिस असलेल्या बाळांच्या वाचण्याची शक्यताही खूप कमी असते.
त्यामुळेच डॉक्टरांनी निओमी आणि डीन यांनी गर्भपाताचा सल्ला दिला होता.
"आम्ही अल्ट्रासाउंड चाचणी केल्यावर तिचं हृदय बाहेर आहे, असं आम्हाला समजलं होतं. त्यानंतर आम्हाला धक्का बसला. डॉक्टरांनी तर गर्भपाताचा सल्ला दिला होता," निओमी सांगतात, "पण नऊ आठवडे त्या बाळाची धडधड मी ऐकत होते. त्या बाळाला माझ्याकडून हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. त्या अर्भकाच्या संघर्षानेच मला बळ दिलं."
व्हॅनेलोप लढवय्यी आहे, असं तिचे आईवडील सांगतात. अल्ट्रासाउंड चाचणी झाल्यानंतर त्यांनी खास रक्तचाचण्या केल्या. व्हॅनेलोपच्या गूणसूत्रांमध्ये गुंतागूंत नसल्याचं आढळून आल्यावरच त्यांनी तिला जन्म देण्याचा निर्धार केला.
सूचना - खालील छायाचित्रं तुम्हाला विचलित करू शकतं.
व्हेनेलोपचा जन्म ख्रिसमसच्या काळात अपेक्षित होता. पण तिच्या हृदयाला संसर्ग होण्याची शक्यता असल्याने 22 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करून तिला जन्म दिला.
नाओमीच्या प्रसुतीच्या वेळी तब्बल 50 वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. त्यात प्रसुतीतज्ज्ञ, हार्ट सर्जन, भूल देणारे डॉक्टर आणि नर्स यांचा समावेश होता.
व्हेनेलोपचा जन्म झाल्यानंतर लगेचच म्हणजे पुढल्या तासाभरातच तिचं हृदय शरीरात घालण्यासाठी तिच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
बालहृदयरोग तज्ज्ञ फ्रांसिस ब्युलॉक म्हणाले, "व्हेनेलोपीच्या जन्माच्या वेळी परिस्थिती खूपच बिकट होती पण आता सर्व ठीक आहे. ती आता एकदम सुस्थितीत आहे. भविष्यात 3D प्रिंटच्या किंवा इतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तिच्या हृदयाभोवती एक कवच बसवण्यात येईल जे तिच्या शरीराच्या वाढीबरोबर वाढत राहील."
अमेरिकेत अशा प्रकारची काही ठरावीक मुलंच वाचू शकली आहेत. 2012मध्ये ऑड्रिना कार्डनास हिचा जन्म टेक्सासमध्ये झाला.
तिचं हृदयही छातीबाहेर होतं. तिच्यावर शस्त्रक्रिया करून ते शरीरात टाकण्यात आलं. या शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांनी तिला घरी सोडलं होतं.
तिच्याही छातीला प्लास्टिकचं सुरक्षाकवच देण्यात आलं होतं.
ग्लेनफिल्ड हॉस्पिटलच्या मते, व्हेनेलोप पूर्ण बरी होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. हृदयाला संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
"प्रत्येक आव्हानांना ती खंबीरपणं तोंड देत आहे. हे चमत्काराच्या पलीकडं आहे," असं तिचे वडील डीन विल्किन्स यांनी सांगितलं.
व्हेनेलोप हे नाव का ठेवलं?
डिस्ने फिल्म "रेक-इट राल्फ" (Wreck-It Ralph) मधील व्हेनेलोप पात्रावरून त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं.
नायोमी यांच्या मते, "या सिनेमातील व्हेनेलोप ही खरीखुरी वीरांगना आहे आणि ती संघर्ष करून शेवटी राजकुमारी बनते. त्यामुळे आमच्या मुलीला हे नाव साजेसं वाटतं."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)