पुतिन चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीत

फोटो स्रोत, Getty Images
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
कार उत्पादक कामगारांच्या एका सभेत पुतिन यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले, "रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मी उभा राहीन."
पुतिन 2000 सालापासून कधी राष्ट्राध्यक्ष तर कधी पंतप्रधान म्हणून रशियात सत्तारूढ आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पुतिन जिंकले तर ते 2024 पर्यंत सत्तारूढ असतील.
रशियन टीव्ही पत्रकार सेनिया सोबचाक यांनीही आपण या निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं आहे. पण ओपिनियन पोल्स पुतिन सहज जिंकतील असं भाकित करत आहेत.
पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर रशियातले प्रमुख विरोधी पक्षनेते अॅलेक्सेई नवाल्नी यांना निवडणुक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
नवाल्नी म्हणतात की, हे सगळं राजकीय हेतूने प्रेरित आहे.

फोटो स्रोत, Reuters
बहुतांश रशियन नागरिक पुतिन यांना हीरो मानतात. सिरियातल्या यादवी युद्धात केलेल्या लष्करी हस्तक्षेपामुळे त्यांनी जगात रशियाची प्रतिमा उंचावली असं अनेक रशियन नागरिकांचं मत आहे.
युक्रेनपासून क्रिमीया प्रांत वेगळा करण्याचंही श्रेय लोक पुतिन यांना देतात.
पण पुतिन यांचे टीकाकार मात्र म्हणतात की, पुतिन भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. क्रिमीयाच्या बेकायदेशीररित्या केलेल्या विभाजनामुळे रशियाला आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरं जावं लागत आहे, असंही हे टीकाकार म्हणतात.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
पुतिन यांचा प्रवास:गुप्तहेर ते राष्ट्राध्यक्ष
- पुतिन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राड (आताचं पीटर्सबर्ग) इथे झाला.
- कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर ते गुप्तहेर संघटना केजीबी मध्ये रुजू झाले.
- तत्कालीन पूर्व जर्मनीत त्यांनी गुप्तहेर म्हणून काम केलं होतं. त्यांच्या त्यावेळच्या सहकाऱ्यांची पुतिन यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या पदांवर नेमणूक केली.
- 1990च्या दशकात सेंट पीटर्सबर्गचे नगराध्यक्ष अॅनातोली सोबचाक यांचे ते मुख्य सहकारी होते. अॅनातोलींनी पुतिनना कायद्याचं शिक्षण दिलं होतं.
- 1997 साली बोरीस येल्तसिनच्या काळात पुतिन क्रेमलिनमध्ये रुजू झाले आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर ते पंतप्रधानही झाले.
- 1999 साली नववर्षाच्या मुहूर्तावर येल्तसिन यांनी राजीनामा दिला आणि पुतिन यांना हंगामी राष्ट्राध्यक्ष घोषित केलं.
- पुतिन यांनी मार्च 2000 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजय नोंदवला.
- 2004 सालच्या निवडणुका जिंकून त्यांनी दुसऱ्यांदा पदभार घेतला.
- रशियन राज्यघटनेप्रमाणे एका व्यक्तीला सलग तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. म्हणूनच पुतिन आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान झाले.
- 2012 मध्ये निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली.








