चीनच्या हद्दीत भारताचं ड्रोन पाडल्याचा दावा!

फोटो स्रोत, AFP/Getty Images
भारतीय ड्रोननं चीनची हद्द ओलांडत सीमारेषेचं उल्लंघन केल्याचा दावा चीनच्या सरकारी मीडियाने केला आहे. हे ड्रोन चीनच्या हद्दीत कोसळल्याचं मीडियाने म्हटलं आहे. भारताने मात्र चीनच्या या दाव्याला उत्तर दिलेलं नाही.
चीनच्या वेस्टर्न थिएटर कॉम्बॅट ब्युरोचे उपसंचालक जांग शुईली यांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडला आहे. त्यांनी हा प्रकार नेमका कुठे घडला, हे स्पष्ट केलं नाही.
शिनख्वा वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार भारताने चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं उल्लंघन केलं, असं जांग शुईली यांनी म्हटलं आहे.
चीनचं सीमा सुरक्षा दल या ड्रोनची सगळी तपासणी करत आहे, असं शुईली यांनी म्हटल्याचं चीनची सरकारी प्रसारमाध्यमं सांगत आहेत.
'भारताची ही कृती अत्यंत असमाधानकारक आणि खेदजनक आहे. आपल्या देशाचं सार्वभौमत्त्व, हक्क आणि सुरक्षा करण्यास चीन कटिबद्ध आहे', असंही शुईली यांनी म्हटलं आहे.
याच वर्षी जून महिन्यात भारत आणि चीन या दोन देशांमध्ये डोकलामच्या मुद्द्यावरून तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर चीनचा हा दावा महत्त्वाचा ठरतो.
डोकलामच्या पठारावर चीन आणि भूतान हे दोन्ही देश दावा सांगत आहेत. या प्रश्नी भारताने भूतानची बाजू घेतली आहे.
डोकलाममध्ये अनेक आठवडे तणाव होता. दोन्ही देशांच्या जवानांमध्ये काही चकमकीही झाल्या. अखेर दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतल्यानंतर ऑगस्टमध्ये हा तणाव निवळला.
उभय देशांमध्ये 1962मध्ये सीमावादावरूनच युद्ध झालं होतं. तेव्हापासून अनेक भूभागांबद्दल दोन्ही देशांमध्ये विवाद आहेत.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








