झिंबाब्वे संकट : या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

फोटो स्रोत, AFP/GETTY
झिंबाब्वेमध्ये राजकीय संकट निर्माण झाल्यानंतर अवघ्या जगाचं लक्ष या देशाकडे लागलं आहे. सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले सत्ताधीश म्हणून रॉबर्ट मुगाबे यांची ओळख आहे.
पण, झिंबाब्वेमध्ये आलेलं हे संकट नेमकं काय आहे? झिंबाब्वेची वर्तमान स्थिती समजवून घेण्यासाठी हे पाच मुद्दे महत्त्वाचे आहेत.
1. अर्थव्यवस्था संकटात
गेल्या 10 वर्षांपासून झिंबाब्वेची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. बेरोजगारीबाबत वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत.
झिंबाब्वे ट्रेड युनियनच्या मते 2017च्या सुरुवातीला बरोजगारीचा दर 90 टक्के एवढा होता.
देशातल्या चलनावरचा विश्वास उडाल्यानं लोकांनी अमेरिकन डॉलर वापरायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, AFP/GETTY
सरकारनं नवं चलन छापलं ते बाँडनोट नावनं ओळखलं गेलं. पण, देशात महागाई इतकी वाढली की या बाँड नोटचा काहीही फायदा झाला नाही.
लोकांनी बँकेत जमा केलेल्या पैशांवर प्रतिबंध घातले गेले. शिवाय पैसे काढण्यावर मर्यादा आहेत.
2. मुगाबे वादात का सापडले?
वयाच्या 93 वर्षांपर्यंत सत्तेत राहिलेले मुगाबे यांना काही वर्षांपासून कडाडून विराध होत आहे. पण 1980 च्या आधी गोऱ्या सत्तेविरुद्ध लढा दिल्यानं त्यांच्याकडे एक क्रांतीकारी नेता म्हणून पाहिलं जातं.
पण सत्तेत टिकून राहायला मुगाबे यांनी दडपशाहीचं धोरण होती घेतलं. पोलीस आणि सैन्याचा वापर सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
भांडवलीकरण आणि वसाहतवादाविरोधात ते लढा देत असल्याचं मुगाबेंच्या पक्षाचं म्हणणं आहे. पण त्याचवेळी देशावरील आर्थिक संकट टाळण्यात मात्र ते अपयशी ठरलेत.
क्रांतीचा शेवट झाला की मी पायउतार होणार असं मुगाबे म्हणतात. पण त्यांचा उत्तराधिकारी असावा असं सुद्धा त्यांना वाटतं.
3. देशात विरोधी पक्ष अस्तित्वात होता का?
1980 मध्ये ब्रिटनच्या देखरेखीखाली जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या त्यावेळी देशात विरोधी पक्ष अस्तित्वात होता. पण नंतर 1987 मध्ये मुगाबे यांनी संविधानात बदल करून स्वत:ला देशाचं राष्ट्रपती घोषीत केलं.
1999 मध्ये मुव्हमेंट फॉर डेमोक्रॅटीक चेंज नावाचा एक विरोधी गट स्थापन झाला. त्यानंतर सरकार विरोधात प्रदर्शनं ही नित्याचीच झाली.

फोटो स्रोत, Reuters
मुगाबेंनी त्यांच्या राजकीय विरोधकांचा खात्मा सुरू केला. पक्षातल्या प्रभावी नेत्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.
नुकतंच त्यांनी उपराष्ट्रपती इमर्सन म्नानगाग्वा यांना काढून टाकलं. मुगाबे यांना त्यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांना त्यांचं उत्तराधिकारी करायचं होत. पण सैन्यानं त्यांचा डाव हाणून पाडला.
4. दुसऱ्या फळीतील नेते देशात बदल घडवू शकतील?
पदच्युत उपराष्ट्रपती एमर्सन यांच्याकडे सत्तेची सूत्र हाती दिली तरी देशात फार बदल होण्याची शक्यता नाही. त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखलं जात. पण त्यांची ही प्रतिमा मुगाबे यांच्याप्रमाणे नाही.
ते सैन्य, गुप्तचर खातं आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून ओळखले जातात.
त्यांच्यावर विरोधकांची मुस्काटदाबी केल्याचा सुद्धा आरोप आहे.
गेल्या चार दशकात झिंबाब्वेमध्ये आहे ती परिस्थिती निर्माण होण्यास सरकार आणि लष्कर दोघेसुद्धा जबाबदार आहेत.
5. अजूनही मुगाबे सत्तेत राहू शकतात?
स्थानिक लोकांना या घडामोडींनंतर मोठा बदल होईल असं वाटत नाही. सैन्य अधिकाऱ्यानं टीव्हीवर दिलेल्या भाषणात ही सत्तापालट तात्पुरती असल्याचं सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हा बदल देशातील गुन्हेगारी संपवण्यासाठी केला आहे, मुगाबेंना काढून टाकण्यासाठी नाही असं त्यांनी म्हंटलं आहे.
पण, हे नाट्य संपल्यानंतर मुगाबे सत्ता सोडण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे.
कदाचित पदच्युत उपराष्ट्रपती एमर्सन यांना पुन्हा उपराष्ट्रपती केल्यावर मुगाबे सत्तेत कायम राहू शकतात.
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








