टायपिस्ट ते फर्स्ट लेडी : कोण आहेत ग्रेस रॉबर्ट मुगाबे?

फोटो स्रोत, Reuters
कालपर्यंत झिंबाब्वेचे सर्वशक्तिमान नेते असलेले रॉबर्ट मुगाबे आज सत्तहीन आणि हतबल आहेत. त्यांच्या या अधःपतनाला त्यांची पत्नी तर जबाबदार नाही?
झिंबाब्वेमध्ये लष्करानं सत्ता ताब्यात घेतली आहे. 1980ला झिंबाब्वे स्वतंत्र झाल्यापासून झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवत असलेले 93 वर्षांचे रॉबर्ट मुगाबे यांनाही लष्कराने ताब्यात घेतलं आहे.
झिंबाब्वेच्या राजकारणात गेली काही वर्षं मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांचं नाव सतत चर्चेत आहे. वादग्रस्त पण समाजसेवी कामात सहभागी म्हणून कौतुकास पात्र ठरणाऱ्या ग्रेस याच मुगाबे यांच्या वारसदार ठरतील, अशी अटकळ होती.
मुगाबे यांच्या कार्यालयातील टायपिस्ट ते राष्ट्राध्यक्षाची पत्नी आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या दावेदार असा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे.
दोन उपराष्ट्राध्यक्षांची गच्छंती
इमर्सन म्नानगाग्वा यांना काही दिवसांपूर्वी उपराष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं, त्यानंतर लष्करानं ही कारवाई केली. म्नानगाग्वा हेसुद्धा मुगाबे यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदार आणि ग्रेस यांचे स्पर्धक होते.

फोटो स्रोत, Reuters
यापूर्वी ग्रेस यांच्या सांगण्यावरूनच 2014ला तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष जॉईस मुजुरू यांनाही पदावरून हटवण्यात आलं होतं.
झिंबाब्वेमधल्या या घडामोडींमाहे ग्रेस
स्टेनो ते फर्स्ट लेडी
- ग्रेस यांचं वय सध्या 52 आहे. त्यांच्या आणि मुगाबे यांच्या वयात 4 दशकांचं अंतर आहे.
- ग्रेस या झिंबाब्वेच्या परराष्ट्र विभागात टायपिस्ट होत्या. त्यांच्यापेक्षा 41 वर्षांनी मोठे असलेल्या मुगाबे यांच्याशी त्यांचे प्रेमसंबध जुळले.
- त्यावेळी मुगाबे यांच्या पहिल्या पत्नी सॅली आजारी होत्या. सॅली यांचं निधन 1992ला झालं.

फोटो स्रोत, ZINYANGE AUNTONY/AFP/Getty Images
- 1996ला मुगाबे आणि ग्रेस यांचा शाही थाटात विवाह झाला.
- त्यांना बोना, रॉबर्ट, चाटुंगा अशी 3 मुलं आहेत.
- त्यांची लाईफस्टाईल खर्चिक असून त्यांना 'गुची ग्रेस' असंही म्हटलं जातं.
- कल्याणकारी कामं आणि अनाथ आश्रमांना मदत, अशा कामांमुळे त्यांची स्तुती केली जाते.
- 7. त्यांनी समाजशास्त्र विषयात पीएचडी मिळवली आहे. पण त्यांनी ही पीएचडी युनिव्हर्सिटी ऑफ झिंबाब्वेमधून 2 महिन्यांत मिळवल्याचं बोललं जातं.
- ग्रेस यांच्यावर दक्षिण आफ्रिकेतील मॉडेल गॅब्रिएल एंजेल्स हिला जोहान्सबर्ग इथं एका हॉटेलमध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार ऑगस्ट महिन्यात झाला होता. यावर दक्षिण आफ्रिकेनं ग्रेस यांना राजनयिक संरक्षण देऊ केलं होतं. यावर बराच वाद ही झाला होता.
पॉवरवुमन अशी प्रतिमा
ग्रेस स्वतःला फार पूर्वीपासून मुगाबे समर्थक मानतात. झिंबाब्वेमधले लोक मुगाबे यांच्या मृतदेहालाही मतं देतील, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

फोटो स्रोत, JEKESAI NJIKIZANA/AFP/Getty Images
ग्रेस यांनी आणखी एका मुलाखतीमध्ये मुगाबे आणि त्यांच्या भेटीबद्दल सांगितलं आहे.
"1980च्या दशकात आमची पहिली भेट झाली. ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल चौकशी केली," असं त्यांनी सांगितले.
खरंतरं ते मला वडिलांसमान होते. मला ही मुलगी आवडली, असं काही ते म्हणतील अशी मला अपेक्षाच नव्हती, असं त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
मुगाबे यांच्याशी लग्नानंतर त्यांनी विविध व्यवसायांवर पकड मिळवत पॉवरवूमन अशी प्रतिमा निर्माण केली आहे.
त्या स्वतःला समाजसेविका म्हणवतात. तसेच एक अनाथ आश्रम ही चालवतात.

फोटो स्रोत, JEKESAI NJIKIZANA/AFP/Getty Images
तिखट भाषणांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. विरोधकांवर हल्ले करताना त्या मुगाबे यांचं समर्थनही करतात. पक्षातील वाद चव्हाट्यावर आणण्यामुळं त्यांच्यावर टीकाही झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








