अमेरिकी तलवारपटूच्या सन्मानार्थ हिजाब घातलेल्या बार्बीचं अनावरण

फोटो स्रोत, Harry How/Getty Images
हिजाब घालून ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणारी अमेरिकेतली स्त्री म्हणून प्रसिद्ध झालेली इब्तिहाज मोहम्मद आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आहे बार्बी डॉल.
इब्तिहाज मोहम्मद या अमेरिकी तलवारपटूच्या गौरवार्थ हिजाब घातलेली बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे. या हिजाबसह नव्या रुपातल्या बार्बी डॉलचं अनावरण खुद्द इब्तिहाज हिच्या हस्ते करण्यात आलं.
इब्तिहाज मोहम्मद ही हिजाब परिधान करुन ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवणारी अमेरिकेतली पहिली स्त्री ठरली. इब्तिहाजनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीच्या खेळात कांस्य पदक मिळवलं होतं.
तिच्या गौरवार्थ तयार करण्यात आलेल्या बार्बी डॉलचा चेहरा इब्तिहाजसारखाच आहे.
'या बाहुलीकडं बघून लहानपणचं स्वप्न सत्यात उतरल्याची भावना मनात येते,' असं इब्तिहाज सांगते.
बार्बी बनवणाऱ्या मॅटल या कंपनीवर या अगोदर अनेक वेळा टीका झाली होती.
बार्बी डॉल म्हणजे शिडशिडित, गोरी, निळ्या डोळ्यांची आणि सौंदर्याच्या ठोकळेबाज कल्पनांना चालना देणारी बाहुली म्हणून ती टीकाकारांचं लक्ष्य झालेली होती.
आता पुढील वर्षापासून प्रेरणादायी महिला व्यक्तिमत्वांवर आधारित बाहुल्यांची डिझाईन करणार असल्याचं या बाहुल्यांचे निर्माते मॅटल सांगतात.
'ग्लॅमर विमेन ऑफ द इयर'परिषदेमध्ये या बाहुलीचं अनावरण करण्यात आलं.
बाहुली इतरांना प्रेरणा देईल
"एक मुलगी आणि त्यातही मुस्लीम मुलगी आहे म्हटल्यावर मी तलवारबाजी करु शकणार नाही, असं अनेकांना वाटलं होतं," तिच्या प्रवासाबद्दल इब्तिहाज सांगते.

फोटो स्रोत, Mattel
"ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला नाही, त्या सर्वांसाठी ही बाहुली आहे," असं ती सांगते.
इब्तिहाजची बाहुली ही चित्ताकर्षक आहे. या बाहुलीचा चेहरा इब्तिहाजसारखाच आहे. तिच्या हातात तलवार आहे. पायात बूट आहेत आणि डोक्यावर हिजाब घातलेला आहे.
'आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बाहुली मुलींना प्रेरित करेल,' असं इब्तिहाज सांगते.
"हिजाब घालणाऱ्या आणि न घालणाऱ्या दोन्ही प्रकारच्या मुली आता हिजाबवाल्या बार्बीशी खेळणार याचा मला अभिमान आहे," असं इब्तिहाज सांगते.
न्यूजर्सीला राहणारी इब्तिहाज लहान असताना बार्बी डॉलच्या डोक्यावर टिश्यू पेपर गुंडाळून बाहुलीला हिजाब घालत असे.
"असं केल्यानं ती बार्बी माझ्यासारखी आणि माझ्या बहिणींसारखी दिसायची", असंही तिनं या नव्या बार्बीच्या अनावरणप्रसंगी सांगितलं.
नवी बार्बी एक कणखर महिलेसारखी असेल. ती तलवारबाजीत सक्षम आहे. तसंच ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी अनेक वर्षं मेहनत घेण्यासाठी सज्ज आहे, असं त्याविषयी सांगितलं जात आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









