पाहा व्हीडिओ : रेल्वे ब्रिजचा प्रश्न विचारताच सुरेश प्रभूंचं वॉकआऊट
- Author, देवीना गुप्ता
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन दुर्घटना टाळता आली असती का? असा प्रश्न बीबीसीच्या प्रतिनिधी देवीना गुप्ता यांनी माजी रेल्वेमंत्री आणि सध्याचे वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना विचारताच त्यांनी मुलाखत अर्धवट सोडून वॉकआऊट केलं.
सध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्य मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश प्रभूंनी बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान वाणिज्य मंत्रालय आणि भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
नंतर आमच्या प्रतिनिधीनं एल्फिन्स्टन दुर्घटनेविषयी त्यांना प्रश्न विचारला. वेळेवरच उपाययोजना केल्या असत्या तर एल्फिन्स्टन दुर्घटना टाळता आली असती का, असा प्रश्न त्यांना विचारला.

फोटो स्रोत, Getty Images
"तुम्ही रेल्वे मंत्री असताना उपाययोजना करण्यास काही अडचणी आल्या होत्या का?" असं देखील आमच्या प्रतिनिधीनं विचारलं.
या प्रश्नाचं उत्तर देताना प्रभू म्हणाले, "इतिहासात आधी जेवढं काम झालं नाही त्यापेक्षा अधिक काम मोदी सरकारच्या काळात केलं."
"रेल्वेमध्ये या काळात अनेक सुधारणा झाल्या आहेत आणि होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी राखीव असावा असा प्रस्ताव आहे," असं त्यांनी म्हटलं. त्यांचं हे उत्तर संपल्यानंतर प्रतिनिधीनं पुन्हा फुटओव्हर ब्रिजबाबत विचारलं.
"क्या फूटओव्हर ब्रिज?" असं म्हणत त्यांनी मुलाखतीमधून वॉकआउट केलं. उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत किंवा त्या करताना काय अडचणी आल्या हे न सांगताच त्यांनी मुलाखतीतून वॉकआऊट केलं.
नेमकी घटना काय?
परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर 29 सप्टेंबर 2017 ला झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जण मृत्युमुखी पडले होते.

"इथले फुटओव्हर ब्रीज आणि जिने छोटे आहेत, तिथं चढता उतरताना चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी निवेदनंही दिली होती. पण, रेल्वे प्रशासनानं लक्ष घातलं नाही." असं रेल्वे प्रवासी संघाच्या सुभाष गुप्ता यांनी बीबीसीला सांगितलं होतं.
ऑगस्टमध्ये सततच्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाट पाहण्यास सांगितलं होतं.
नंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पीयुष गोयल यांच्याकडं रेल्वेमंत्रीपद देण्यात आलं. तर सुरेश प्रभूंकडे वाणिज्य मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला. ज्यावेळी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनचा अपघात झाला त्यावेळी सुरेश प्रभू रेल्वेमंत्रीपदावर नव्हते.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









