पाहा व्हीडिओ : लेबनॉनच्या मुद्द्यावरून युद्धाचे ढग; अमेरिकेचा सौदी आणि इराणला इशारा
तुमच्या आपापसातील वादात लेबनॉनला मध्ये खेचू नका असे खडे बोल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी इराण आणि सौदी अरेबियाला सुनावले आहेत.
लेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांनी राजीनामा घोषित केल्यानंतर लेबनॉनमध्ये राजकीय वातावरण पेटलं आहे. हरीरी यांना त्यांच्या इच्छेविरोधात सौदी अरेबियामध्ये थांबवून ठेवण्यात आल्याची चर्चा लेबनॉनमध्ये होत आहे.
"लेबनॉनवर नियंत्रण मिळवण्याचा कुठलाही अधिकार परराष्ट्रातील शक्तींना नाही. रिपब्लिक ऑफ लेबनॉन आणि त्यांच्या राजकीय पक्षांच्या स्वातंत्र्याचा अमेरिका आदर करते," असं टिलरसन यांनी म्हटलं आहे.
तसंच हारीरी यांनी आपल्या मायदेशी परतावं आणि प्रशासनाची सूत्रं हाती घ्यावी असं टिलरसन यांनी म्हटलं आहे.
टिलरसन आणि ट्रंप यांची भिन्न भूमिका
रियाधमध्ये नुकताच एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. त्याबाबत बोलतांना टिलरसन यांनी चिंता व्यक्त केली होती.
"या मोहिमेमुळं सौदी अरेबियाच्या भविष्यावर काय परिणाम होईल याबाबत आपण साशंक आहोत," असं देखील टिलरसन यांनी म्हंटलं होतं. सौदी अरेबियात उघड झालेल्या या घोटाळ्यावर वक्तव्य करण्यास अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला तब्बल सहा दिवस लागले.

फोटो स्रोत, Getty Images
या मुद्द्यावर मात्र व्हाइट हाऊस आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची वेगवगेळी भूमिका असल्याचं दिसून आलं आहे.
"राजे सलमान आणि सौदी अरेबियाचे युवराज यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांना माहीत आहे ते काय करत आहे." असं ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं होतं.
डोनाल्ड ट्रंप हे ट्विटच्या माध्यमातून सौदी अरेबियाचं समर्थन करत आहे असं दिसून येत आहे. तर परराष्ट्र खात्याची वेगळी भूमिका आहे.
अमेरिकेचं परराष्ट्र धोरण परराष्ट्र खातं ठरवत नसल्याचं हे निदर्शक आहे असं याबाबत काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
लेबनॉनचे राजकीय संकट नेमके काय आहे ?
सौदी अरेबियानं लेबनॉनविरुद्ध युद्ध पुकारलं आहे असा आरोप हिजबुल्ला नेते हसन नसरल्लाह यांनी केला आहे.
लेबनॉनचे पंतप्रधान साद अल हरीरी यांच्या राजीनाम्यानंतर नसरल्लाह यांनी हा आरोप केला आहे. हरीरी यांनी सौदी अरेबियामधूनच आपला राजीनामा पाठवल्यामुळं लेबनॉनमध्ये गोंधळ उडाला आहे.
हरीरी यांना त्यांच्या इच्छेविरोधात सौदी अरेबियात थांबवून ठेवण्यात आलं आहे, असा आरोप नसरल्लाह यांनी केला.
लेबनॉन विरोधात इस्राइलला भडकवण्याचं काम सौदी अरेबिया करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
सौदी अरेबियामुळे लेबनॉन आणि आजूबाजूच्या भागात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं इराणनं म्हटलं आहे. इराणचा पाठिंबा हिजबुल्ला शिया आंदोलनाला आहे.

फोटो स्रोत, AFP
शनिवारी सौदी अरेबियातून आपल्या पदाचा राजीनामा देताना हरीरी यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हंटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी इराण आणि हिजबुल्लावर निशाणा साधला होता.
हरीरी यांनी आपलं वक्तव्य दबावाखाली केलं असण्याची शक्यता आहे, असं लेबनॉनला वाटतं. लेबनॉनचे राष्ट्रपती मिशेल आऊन आणि इतर ज्येष्ठ राजकारण्यांनी हरीरी यांना परत आपल्या मायदेशात येण्याची विनंती केली आहे.
हरीरी यांना सौदी अरेबियामध्ये नजरकैदेत ठेवलं असावं असं लेबनॉनच्या नेत्यांना वाटतं. लेबनॉनच्या राष्ट्रपतींनी हरीरी यांचा राजीनामा अजूनही स्वीकारलेला नाही.
टीव्हीवर घोषणा केल्यानंतर हरीरी यांनी पुढं काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे लेबनॉनमधल्या या संघर्षाला सौदी अरेबिया जबाबदार असल्याचं हिजबुल्ला नेते नसरल्लाह यांनी म्हटलं आहे.
ते पुढं म्हणाले, "सौदी अरेबिया आणि त्यांच्या नेत्यांनी लेबनॉन आणि हिजबुल्ला विरोधात युद्ध पुकारल्याचं स्पष्ट झालं आहे."

फोटो स्रोत, EPA
"लेबनॉनवर हल्ला करण्यासाठी सौदी अरेबियानं इस्राईलला अब्जावधी डॉलर देण्याची तयारी दाखवली आहे," असा आरोप नसरल्लाह यांनी केला.
"हरीरी यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा नेता बसवून राजकीय आंदोलन थांबवण्याचा सौदी अरेबिया प्रयत्न करत आहे," असा आरोप त्यांनी पुन्हा केला आहे.
शिया नेते नसरल्लाह यांनी त्यांचं वक्तव्य शांतपणे केलं असलं तरी त्यांच्या या वक्तव्यामुळं वातावरण पेटण्याची शक्यता असल्याचं बीबीसी मध्य आशियाचे संपादक सेबास्टियन उशर यांनी म्हटलं आहे.
"त्यांच्या या वक्तव्यानंतर या क्षेत्राकडं लक्ष वेधलं जाईल आणि बाहेरील देश हा संघर्ष शांत करण्याचा प्रयत्न करतील," असं उशर यांनी म्हटलं.
आंतरराष्ट्रीय समुदायाची काय प्रतिक्रिया आहे?
सौदी अरेबिया आणि इराणच्या वादात लेबनॉन अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरीरी यांनी राजीनामा दिल्यानंतर तिन्ही देशांमधला तणाव वाढला आहे.
या नव्या संघर्षाचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे अशी चिंता संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अंटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मक्रॉन सौदी अरेबियाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी लेबनॉनमध्ये शांतता प्रस्थापित होणं किती आवश्यक आहे याकडं सौदी नेत्यांचं लक्ष वेधलं.
फ्रान्स आणि लेबनॉनचं जुनं नातं आहे. दुसऱ्या महायुद्धाआधी लेबनॉनमध्ये फ्रेंच वसाहत होती.
सौदी अरेबिया आणि त्यांच्या सहकारी आखाती देशांनी लेबनॉनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना लेबनॉन देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
येमेनमधून हिजबुल्लानं क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप सौदी अरेबियानं केला होता. इराणनं हे क्षेपणास्त्र हिजबुल्ला नेत्यांना पुरवल्याचा आरोप सौदी अरेबियानं केला आहे.
या आरोपानंतर या भाागात तणाव वाढला आहे. इराणनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









