You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅटलोनियाचा कारभार स्पेनच्या उपपंतप्रधानांच्या हातात
कॅटलोनियानं स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतर स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी कॅटलोनियन पार्लमेंट विसर्जित झाल्याची घोषणा केली आहे. आता कॅटलोनिया प्रांतात थेट हस्तक्षेप करत तिथली सत्ता नियंत्रित केली आहे.
"कॅटलोनियानं जाहीर केलेलं स्वातंत्र्य आपणास मान्य नाही," असं म्हणत स्पेननं या ठिकाणी आपलं प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित केलं आहे.
सरकारच्या वतीनं स्पेनचे उप-पंतप्रधान सोराया सेंझ दे सेंटामेरिया हे कॅटलोनियाचा कारभार पाहणार आहेत.
स्पेनच्या गृहमंत्र्यांनी कॅटलन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
कॅटलोनियातली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
कॅटलोनियनाचे नेते कार्ल्स पुजडिमाँ आणि त्यांची कॅबिनेट दोन्ही बरखास्त करत असल्याचंही स्पेनच्या पंतप्रधानांनी सांगितलं.
स्पेन कॅटलोनियावर संपूर्ण सत्ता प्रस्थापित करण्याच्या बेतात असतानाच शुक्रवारी कॅटलन प्रादेशिक पार्लमेंटनं स्पेनपासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं मतदान केलं आणि त्यानंतर हा गोंधळ सुरू झाला.
135 सदस्यांच्या सभागृहात स्वातंत्र्याच्या बाजूने 70 मतं तर 10 मतं विरोधात पडली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता.
स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी कायदा, स्थिरता आणि लोकशाहीसाठी संपूर्ण नियंत्रण महत्त्वाचं आहे, असं सांगितलं होतं.
कॅटलोनियामधल्या लोकांनी गेल्या महिन्यात झालेल्या वादग्रस्त सार्वमतात स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं होतं.
कॅटलन सरकारचं म्हणणं आहे की, सार्वमतात भाग घेतलेल्या अंदाजे 43 टक्के मतदारांपैकी 90 टक्के मतदारांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं होतं. पण स्पेनच्या संवैधानिक कोर्टाने हे मत अवैध ठरवलं होतं.
यानंतर लगेच रेजॉय यांनी स्पेनच्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करतानाचा कॅटलोनियाला स्वायत्ततेचं आश्वासन दिलं होतं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)