You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी आरोप निश्चिती
- Author, शहजाद मलिक
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात इस्लामाबादमधील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले.
शरीफ यांच्यासह त्यांची मुलगी मरियम आणि जावई निवृत्त कॅप्टन मोहंमद सफदर यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मोहंमद बशीर यांनी आरोप निश्चितीची घोषणा केली. या सुनावणीवेळी लंडनमधील फ्लॅट्सच्या प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले.
त्यावेळी आरोपी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी गुन्हा मान्य करण्यास नकार दिला, तसंच त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं सांगितलं.
भ्रष्टाचाराच्या अन्य दोन प्रकरणातही त्यांच्यावर आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.
ऑफशोअर कंपन्या आणि अझिझिया स्टेलमिल्स प्रकरणात आरोपपत्रांबद्दल नंतर सुनावणी होईल, असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
'कायद्याचा सन्मान करतो'
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मरीयम नवाज म्हणाल्या, "आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी नाही. आम्ही न्यायप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आलो आहोत. आम्ही न्यायालय आणि कायदा यांचा सन्मान करतो."
आरोप पत्रात 2006 सालचे लंडन फ्लॅट प्रकरणाचे करारपत्र बनावट असल्याचं म्हटलं आहे. हा आरोप मरियम यांनी फेटाळला.
मरियम म्हणाल्या, "जर तपासपथक आता लंडनला गेलं असेल तर या वर्षी सुरुवातीला तपास पथकाने सादर केलेले पुराव्यांचा बॉक्समध्ये काय होतं?"
नवाज शरीफ सध्या ब्रिटनमध्ये आहेत. नवाज शरीफ, मरियम आणि सफदर यांनी न्यायालयात आरोप निश्चिती रद्दबातल ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली.
नवाज शरीफ यांनी जफर खान यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. खान यांच्या उपस्थितीत न्यायाधीशांनी आरोपपत्राचे वाचन केलं.
शरीफ यांची बाजू मांडताना खान म्हणाले, "पनामा लिक्स प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजून यायचा आहे."
त्यामुळे जोपर्यंत हा सविस्तर निर्णय येत नाही, तसेच नॅशनल अकाउंटिबिलिटी कमिशनसमोर सादर झालेल्या 3 साक्षीदारांच्या साक्षींच्या प्रती मिळत नाहीत तोपर्यंत आरोपपत्र दाखल प्रक्रिया सुरू करणं नियमांनुसार नाही.
पनामा लिक्समध्ये शरीफ यांच्या तीन मुलांची ऑफशोअर कंपन्यांत गुंतवणूक केली असल्याचं पण ही मालमत्ता कुटुंबांच्या वेल्थ स्टेटमेंटमध्ये दाखवली नसल्याचे उघड झाले होते.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय अकाउंटॅबिलिटी कमिशनने या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी हे गुन्हे दाखल केले होते.
यात 67 वर्षांचे शरीफ यांना अघोषित मालमत्तेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान पदासाठी अपात्र ठरवल्यानंतर त्यांना पंतप्रधान पदासाठी राजीनामा द्यावा लागला होता.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)