माउंट एव्हरेस्टवर पडलेल्या शेकडो टन कचऱ्याचं काय होतं?

फोटो स्रोत, AFP
माउंट एव्हरेस्टवर पडलेल्या शेकडो टन कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न होता. आता या कचऱ्याचं रिसायकलिंग करण्यात येणार आहे. हा कचरा विमानाने काठमांडूला नेण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या पहिल्या दिवशी लुकला विमानतळावरून 1200 किलो कचरा काठमांडूला रिसायकलिंगसाठी नेण्यात आला. जेव्हा गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर जातात तेव्हा त्यांच्याकडून टाकण्यात आलेला कचरा त्यांनी स्वतःसोबत परत आणणं अपेक्षित असतं. पण अनेक जण कचरा तिथेच टाकून खाली येतो.
हा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात. यावर्षी जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाणार आहे. खासगी विमान कंपनी येती एअरलाइन्सने या मोहिमेला सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे.
रिकाम्या बीअरच्या बाटल्या, कॅन, पॅक्ड फूड आणि ट्रेकिंग एक्विपमेंट, ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर या गोष्टी माउंट एव्हरेस्टवर टाकून अनेक जण खाली येतात.

फोटो स्रोत, Getty Images
माउंट एव्हरेस्टवरचा कचरा स्थानिक गाईड्सकडून साफ केला जातो. एवढ्या उंचीवरचा कचरा उचलून परत येण्याचं काम शेर्पा करतात. त्यांना सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटीचं (SPCC) सहकार्य मिळत आहे.
गेल्या वर्षी अंदाजे 1 लाख लोकांनी माउंट एव्हरेस्टच्या परिसराला भेट दिली असं SPCCचं म्हणणं आहे. यापैकी 40,000 पेक्षा अधिक जण हे गिर्यारोहक होते.
त्याचबरोबर माउंट एव्हरेस्टवर मानवी मैला देखील आढळत आहे असं SPCCने सांगितलं. माउंट एव्हरेस्टवर असणाऱ्या कॅम्पवर SPCCनं पोर्टेबल शौचालयं उभी केली आहेत.
गेल्या वर्षीपासून परदेशी गिर्यारोहकांना एकट्याने माउंट एव्हरेस्ट चढण्यावर बंदी घातली गेली आहे. स्थानिक गाईडसोबतच त्यांना जावं लागतं. त्यामुळं माउंट एव्हरेस्टला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








