जन्मानंतर अपहरण, मुस्लिम आईच्या पोटी जन्म, हिंदू आईने वाढवलं; खरी आई कोण हा तिढा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋषी बॅनर्जी
- Role, बीबीसी गुजराती
"मी त्याची आई आहे. त्याच्या अपहरणानंतर जेव्हा पहिल्यांदा त्याला पाहिलं, तेव्हा मी लगेच ओळखलं. तो हुबेहूब त्याच्या वडिलांसारखा दिसतो. तो माझ्या कुटुंबाचा भाग आहे आणि आम्हा सगळ्यांना तो सोबत हवाय."
सुफियाना अलीने तिच्या मुलाला सहा वर्षानंतर पाहिल्यावर ही पहिली प्रतिक्रिया दिली. बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच त्याचं अपहरण झालं होतं.
जन्मानंतर काही तासांत अपहरण, नंतर बाळाच्या शोधासाठी वणवण भटकणं, बाळ भेटल्यावर खरी आई कोण हा तिढा... हे सर्व एखाद्या सिनेमाचं कथानक वाटावं इतकं तंतोतंत घडलं गुजरातमधील सुरत जिल्ह्यात.
सुफियाना सध्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहतेय. पण हे पूर्ण प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊया.
नेमकं काय घडलं?
सुरत जिल्ह्यातील आंबोली गावात राहणाऱ्या सत्तार मन्सुरी यांची सुफियाना ही मुलगी. सुफियानाचं मुंबईतील जोगेश्वरीत राहणाऱ्या मोहम्मद अली यांच्यासोबत विवाह झाला.
माहेरच्या घरीच आपलं पहिलं मूल जन्माला यावं अशी सुफियानाची इच्छा होती. तशी ती पहिल्या बाळंतपणासाठी सुरतला माहेरी आली.
5 जानेवारी 2017 रोजी सुफियानानं मुलाला जन्म दिला. जन्मानंतर काही तासांतच अज्ञात व्यक्तीनं स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगत बाळाचं अपहरण केलं. सुफियाना यांनी कामरेज पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली.

सुफियानाचे वडील सत्तार मन्सुरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "काथोर गावातील आरोग्य केंद्रात सुफियानाला भरती केलं होतं. तिथं तिनं बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर काही तासातच बाळाचं अपहरण झालं. नवजात बाळाला लस द्यायची असल्याचं सांगून डॉक्टर बनून आलेल्या त्या व्यक्तीनं अपहरण केलं."
"पोलिसांच्या मदतीनं बाळाचा आम्ही बराच शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. बाळाला शोधण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून अहमदाबाद, राजकोट, बडोदा आणि इतर शहरं अक्षरश: पालथी घातली. पण आमच्या पदरी निराशाच पडली," असं मन्सुरी सांगतात.
ते पुढे म्हणतात की, "लहान मुलांचं अपहरण केल्याची टोळी पोलिसांनी पकडल्याचं आम्हाला कळल्यावर आम्ही धावतच मोठ्या आशेनं तिथे पोहोचायचो. पण आम्हाला आमच्या बाळाबद्दल काहीच माहिती मिळायची नाही."
बाळतंपणासाठी माहेरी गेलेली सुफियाना या अपहरणाच्या घटनेनं हादरून गेली होती. मग घटनेच्या तीन आठवड्यानंतर सुफियाना मुंबईत परतली. गेल्या सहा वर्षात सुफियाना आणखी तीन मुलांची आई झाली.
दुसरीकडे, पहिल्या बाळाचा शोध सुरूच होता.
अखेर पोलिसांना यश
सहा वर्षांनंतर पोलिसांना सुफियानाच्या बाळाच्या अपहरणाचा छडा लागला. 22 जानेवारी 2023 रोजी सत्तार मन्सुरींना कामरेज पोलिसांनी फोन करून कळवलं की, पोलीस ठाण्यात या, अपहरण झालेला मुलगा सापडला आहे.
सत्तार मन्सुरी सांगतात, "आम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात पोहोचलो. तिथं एक पोलीस निरीक्षक सहा वर्षांच्या मुलासोबत बसलेला दिसला. पोलीस निरीक्षक आर. बी. भटोल यांनी आम्हाला सांगितलं की, सहा वर्षांपूर्वी अपहरण झालेलं हे सुफियानाचं बाळ आहे. सुरुवातीला आमचा विश्वासच बसला नाही. पण पोलीस निरीक्षकांनी आम्हाला अधिकचा तपशील सांगितला."

फोटो स्रोत, Getty Images
मुलगा सापडलं कसं, याबाबत जेव्हा आम्ही कामरेज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांशी बोललो, तेव्हा ते म्हणाले की, "तपास करत असताना आम्हाला कळलं की, मुलगा आणि अपहरणकर्ता कर्जनमध्ये आहेत. आमचं पथक कर्जनमध्ये पोहोचलं आणि मुलाचा ताबा घेतला. कल्पेश आणि त्याची पत्नी नम्रताबेन (आरोपींची मूळ नावं बदलली आहेत) यांनाही पोलिसांनी अटक केली."
तपासादरम्यान पोलिसांना कळलं होतं की, आरोपी कल्पेश '108 रुग्णवाहिके'त काम करत होता. हीच माहिती पोलिसांना मुलाच्या शोधासाठी आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरली.
सुफियानाच्या मुलाचं अपहण झालं, तेव्हा कल्पेश आरोग्य केंद्राच्या भागातच काम करत होता. अपहरणाच्या घटनेनंतर कल्पेशनं त्याची बदली कर्जनमध्ये करून घेतल्याचे पोलीस तपासात उघड झालं.
पोलिसांनी कल्पेशकडे या घटनेबद्दल चौकशी केली तेव्हा कल्पेशनं गुन्ह्याची कबुली दिली.
अखेर सहा वर्षांनंतर सुफियानानं तिच्या पहिल्या मुलाला पाहिलं. त्यावेळचा अनुभव सांगताना सुफियाना म्हणते की, "मी माझ्या मुलाला पाहतच राहिले. पोलिसांनी त्याला जेव्हा सांगितलं की, ही तुझी आई आहे, तेव्हा तो काहीसा घाबरला. तो सतत माझ्याकडे बघत होता. खूप समजावल्यानंतर तो काही क्षण माझ्याकडे आला आणि मग पुन्हा नम्रताकडे परतला."
बाळ होत नसल्यानं अपहरण
पोलिसांनी अपहरणाच्या या घटनेचं कारण शोधण्यासाठी आरोपींची चौकशी केली आणि त्यातून अपहरणाचं कारण समोर आलं.
लग्नाला तीन वर्षे उलटूनही नम्रताबेन आई होऊ शकत नसल्यानं, कल्पेशनं बाळाच्या अपहरणाचा कट रचला. कल्पेश आणि नम्रताबेन यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं आणि 2017 पर्यंत नम्रताबेनचे तीन गर्भपात झाले होते.
कल्पेश सुरत जिल्ह्यातील कीम इथे '108 रुग्णवाहिके'त इमरजन्सी मेडिकल टेक्निशियन (EMT) म्हणून काम करत होता.
सुफियानाला प्रसूती वेदना होत असताना '108 रुग्णवाहिके'तून आरोग्य केंद्रात आणलं गेलं. सुफियानाला बाळ होणार असल्याची माहिती कल्पेशला इथूनच मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
बाळाचा जन्म झाल्यानंतर कल्पेश वॉर्डात जाऊन सुफियानाला म्हणाला की, बाळाला लसीकरणासाठी घेऊन जात आहे.
कल्पेश बाळाला लस देण्याच्या नावाखाली घेऊन गेला, तो परत आलाच नाही. त्यानं बाळाचं अपहरण करून घरी नेलं.
पोलीस निरीक्षक भटोल म्हणतात की, "बाळाचा जन्म आणि अपहरण यातील वेळ पाहता कल्पेश सुफियानावर सातत्यानं पाळत ठेवून होता. सुफियानानं बाळाला जन्म देताच कल्पेश वैद्यकीय कर्मचारी म्हणून तिथे गेला आणि बाळाला उचलून नेलं."
"बाळाचं अपहरण केल्यानंतर कल्पेश आणि नम्रताबेन हे दाम्पत्य किम आणि नंतर अहमदाबादमध्ये गेले. मग तिथून बडोद्यातील कर्जनमध्ये गेले. या दाम्पत्यानं प्रीत (नाव बदललं आहे) असं बाळाचं नाव ठेवलं."
आता प्रीत सहा वर्षांचा असून कर्जनमधील शाळेत सीनियर केजीमध्ये शिकतोय. गेल्या सहा वर्षांपासून कल्पेश आणि नम्रताबेन हे या मुलाचं संगोपन करतायेत.
आणि अपहरण केलं...
कल्पेश आणि नम्रताबेन यांना बाळ होत नव्हतं आणि शारीरीक त्रासामुळे नम्रताबेनने तीनवेळा गर्भपात केलं होतं. ही सारी माहिती या दाम्पत्यानं कुटुबीयांना सांगितली नव्हती.
नम्रताबेन गर्भवती असल्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना सांगितलं. हे खोटं पकडू जाऊ नये म्हणून ते वारंवार खोटंच सांगत राहिले. नंतर नंतर तर त्यांनी सातव्या महिन्यात गर्भवती असल्यानं कार्यक्रमही आयोजित केला. तिथे सगळे नातेवाईक आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
मग नम्रताबेन तिच्या माहेरी बाळंतपणासाठी गेली आणि तिथेही सगळ्यांशी खोटं बोलत राहिली. मग उपचाराचं कारण सांगून नम्रताबेन पुन्हा पतीसोबत राहण्यासाठी म्हणजे कल्पेशकडे परतली.
त्यानंतर एक-दीड महिन्यांनी कल्पेशनं आरोग्य केंद्रातून सुफियानाच्या बाळाचं अपहरण केलं.
चूक सुधारण्यासाठी नम्रताचे प्रयत्न
कल्पेशनं अपहरण केलेल्या मुलानं त्याच्या खऱ्या आई-वडिलांना स्वीकारावं, यासाठी नम्रताबेनच आता प्रयत्न करतेय. नम्रताबेन तिला वेळ मिळतो, तेव्हा प्रीतला सुफियाना राहत असलेल्या ठिकाणी घेऊन जाते. प्रीत सुफियानाच्या इतर मुलांमध्ये मिसळून खेळेल, राहील, असा तिचा प्रयत्न आहे.
नम्रताबेनच्या या प्रयत्नांना आता यश येताना दिसतंय. प्रीत सुफियानाच्या इतर मुलांमध्ये रमताना दिसतोय.
सुफियाना म्हणते की, "प्रीत आणि माझी आता चांगली मैत्री झालीय. प्रीत त्याच्या इतर भावंडांसोबत खेळतो. पण तो अजूनही मला आई म्हणून हाक मारत नाही. पण तो लवकरच आई म्हणून हाक मारेल, अशी मला आशा आहे."
अपहरणाच्या खटल्याची सद्यस्थिती काय आहे?
कामरेज पोलिसांनी अपहरणाच्या घटनेचा छडा लावल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलंय. स्थानिक न्यायालयात सुनावणी सुरू असून, निर्णय होईपर्यंत प्रीत नम्रताबेनकडेच राहील, असा आदेश न्यायालयानं दिलाय.
न्यायालयानं प्रीतच्या डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांकडे मागितलाय. सुरत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजकडून प्रीतच्या डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.

फोटो स्रोत, Getty Images
पोलीस निरीक्षक भटोल म्हणतात की, "मुलाचा डीएनए अहवाल आल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करू. त्यानंतर न्यायालयात पुढील सुनावणी होईल. निकाल येण्यास थोडा वेळ लागेल. तोपर्यंत प्रीत नम्रताबेनकडेच राहील."
या सर्व कायदेशीर प्रक्रियेत सुफियानाला आता तिच्या मुलाची वाट पाहावी लागतेय. प्रीत लवकरात लवकर आपल्याकडे यावा, असं तिला वाटतंय.
सुफियाना म्हणते की, "मी त्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतेय, जेव्हा माझ्या मुलाचा ताबा कायदेशीररित्या माझ्याकडे सोपवला जाईल. ताबा मिळाल्यानंतर मी आधी अजमेर दर्ग्याला जाणार आहे."
या संपूर्ण घटनेत नम्रताबेनची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी गुजरातीनं सतत संपर्क केला. मात्र, नम्रताबेनशी संपर्क होऊ शकला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








