माझाही विनायक मेटे करण्याचा डाव : अशोक चव्हाण

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

1. अशोक चव्हाण यांचा आरोप- माझाही विनायक मेटे करण्याचा डाव

"सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा अशीही चर्चा सुरू आहे," असं खळबळजनक विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

"पण जे कोणी हे सगळं करत आहे, त्यांना एवढंच सांगायचं आहे की, अशोक चव्हाणाचा जीव गेला तरी हरकत नाही, पण अशोक चव्हाण तुमच्या सारखा डुप्लिकेट आणि खोटं बोलून नेतृत्व करणारा नेता नाही. दुर्दैवाने माझ्यावर हा प्रसंग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी या घटनेचा उल्लेख करत आहे," असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

ते नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचं खोटं लेटरपॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केली आहे.

बोगस लेटरपॅडच्या अधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

2. ...म्हणून 12 आमदारांच्या यादीवर सही केली नाही- भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती यादीवर सही करण्याची धमकी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचा आरोप राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

"12 आमदारांच्या नियुक्तीसाठी पत्र लिहिलं ते ठीक आहे. पण हे पत्र पाच ओळींचं असायला पाहिजे होतं. त्यासोबत नियुक्ती करण्यात येणाऱ्या आमदारांची नावं आणि त्यांचा बायोडाटा पाठवणं आवश्यक होते. परंतु 15 दिवसांच्या आत आमदारांची नियुक्ती करावी अशी मला धमकी देण्यात आली. राज्यपालांना निर्देश दिले जात नाहीत. तो माझा अधिकार होता. मी 15 दिवसांमध्ये नियुक्ती करावी किंवा शंभर दिवसात करावी तो माझा अधिकार होता. माझा कोणत्याही नावाला आक्षेप नव्हता. परंतु पत्र लिहून धमकी देण्यात आल्यामुळेच मी आमदारांची नियुक्ती केली नाही," असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय.

"मला देण्यात आलेल्या 12 आमदारांच्या यादीतील नावं अनेकवेळा बदलली गेली. शिवाय मला धमकी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना कधी आदेश दिला जातो का? परंतु, मला तसे आदेश दिले गेले. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांसोबत माझे संबंध चांगले आहेत. आदित्य ठाकरे हे तर मला मुलासारखे आहेत," असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय.

3. 'ठाकरे गटाने निवडणूक आयोगात दाखल केलेली अनेक प्रतिज्ञापत्रं बोगस निघाली'

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी (17 फेब्रुवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं.

या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि त्यांनी योग्यतेनुसार निर्णय घेतला आहे.

सोमवारी (20 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी बैठका घेतल्या तसंच वेगवेगळ्या संघटना आणि शिष्टमंडळासोबत बैठका घेतल्या.

त्यानंतर पत्रकरांशी बोलताना निवडणुक आयोगाच्या निर्णयावर शिंदे यांनी म्हटलं की, "निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि त्यांनी योग्यतेनुसार निर्णय घेतला आहे. आयोगाने सांगितल्याप्रमाणे आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली मात्र ठाकरे गटानं दाखल केलेली अनेक प्रतिज्ञापत्रं बोगस निघाली."

सकाळने ही बातमी दिली आहे.

4. 'महारेरा'ची 313 प्रकल्पांना नोटीस

मुंबईसह राज्यातील सर्वच स्तरांवरील गृहनिर्माण प्रकल्प योग्यरीतीने सुरू राहण्यासाठी 'महारेरा'ने विशेष लक्ष पुरविलं आहे.

प्राधिकरणाने नेमलेल्या आर्थिक ऑडिट संस्थेच्या पहिल्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे मोठी गुंतवणूक असलेल्या 313 गृहप्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

त्यावर योग्य वेळेत प्रतिसाद न लाभल्यास कामांची नेमकी स्थिती पाहण्यासाठी विशेष चौकशी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

'महारेरा'ने घर खरेदीदारांच्या हितरक्षणासाठी प्रख्यात आर्थिक ऑडिट संस्थेची निवड केली आहे. या संस्थेच्या सहाय्याने प्रकल्पांचा आढावा घेण्यास प्राधिकरणाने प्रारंभ केला असल्याचं 'महाराष्ट्र टाइम्स'ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

त्या संस्थेच्या अहवालात आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने 311 प्रकल्पांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. विविध विकासकांनी 'महारेरा'कडे सादर केलेल्या माहितीचे विश्लेषण करून या संस्थेने त्यातील विसंगतीवर बोट ठेवले आहे.

5. छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्यांच्या घरांवर 'ईडी'चे छापे

कोळसा शुल्क आकारणी गैरव्यवहार प्रकरणाच्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने सोमवारी (20 फेब्रुवारी) छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांची निवासस्थानं आणि कार्यालयांवर छापे टाकले.

भिलाईमध्ये काँग्रेस आमदार देवेंद्र यादव, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल, प्रवक्ते आर. पी. सिंह तसंच बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुशील सनी यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीने छापे टाकले.

अन्य काही पक्षांच्या नेत्यांवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटकही करण्यात आली आहे.

काँग्रेसने 'ईडी'च्या या कारवाईवर टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानी टाकलेले छापे हे राजकीय सूडाने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला, तर अशा कारवायांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली.

इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)