…तर शिवसेना भवन उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंकडेच गेलं असतं

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेल्या 'शिवसेना शाखा' कोणाच्या? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना शाखा ताब्यात घेण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेच्या आमदारांकडून अधिवेशनापूर्वी मुंबईच्या विधानभवनातील कार्यालयावर ताबा मिळवला.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबत पत्र दिलं आहे. त्याचबरोबर या कार्यालयातला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो हटवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 फेब्रुवारी रोजी हे स्पष्ट केले की ते शिवसेनेच्या मालमत्तेवर किंवा संपत्तीवर दावा करणार नाहीत.

"आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, आम्ही कुठल्याही संपत्तीवर दावा करणार नाही," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

"मी अधिकृतपणे सांगतो आम्ही कुठल्याही संपत्तीवर दावा करणार नाही. कायद्यानुसार शिवसेना विधिमंडळ कार्यालय आम्हाला मिळालं", असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "निवडणूक आयोगाचा निर्णय मेरिटवर झालाय. त्यावर आक्षेप घेणं चूक आहे. आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधिमंडळाचं कार्यालय ताब्यात घेतलं. मात्र कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही. आम्ही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही," असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.

असं असलं तरी एक प्रश्न राहतो तो म्हणजे शिवसेनच्या शाखा, कार्यालयं आता कुणाकडे राहतील. त्यांचं नियोजन कसं होईल?

शाखा कुणाच्या?

शिवसेनेतील पदाची रचना पाहीली तर शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, विभागिय नेते, उपनेते, नेते, पक्षप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख हे पदं आहेत. शिवसेनेची शाखा आणि शाखाप्रमुख या पदाला शिवसेना पक्षात विशेष महत्त्व आहे.

शिवसेनेला तळागाळातील लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी, लोकांच्या मदतीसाठी या शाखांचा मोठा वाटा आहे. अनेक मोठ्या नेत्यांपैकी रामदास कदम, नारायण राणे, दिवाकर रावते यासारख्या अनेक नेत्यांच्या राजकारणाची सुरूवात शाखाप्रमुख या पदापासून झाली आहे.

मुंबईत शिवसेनेच्या 227 शाखा आहेत. तर MMR रिजनमध्ये ठाण्यासह 500 शाखा आहेत. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते दोन गटात विभागले गेले आहेत.

दादरची शिवसेना शाखा शिवाई ट्रस्टच्या अंतर्गत आहे. जी अधिकृतपणे पक्षाकडून चालवली जाते. पण इतर शाखा या भाडेतत्वावर किंवा कुणाच्या तरी मालकीच्या आहेत. त्या शाखेतील जे शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झाले आहेत त्या शाखा त्या त्या गटाकडे जाऊ शकतात.

"शिवसेना भवनासह राज्यातील आमच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. आमचे शिवसैनिक तिथेच बसून काम करतील. उध्दव ठाकरे हेच आमचे सेनापती असतील," असं संजय राऊत म्हणालेत.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे म्हणतात, "आमच्या पक्षाकडून सहा महिन्यांनंतर सर्व ठिकाणी शाखा उघडल्या जातील. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात या शाखा उघडल्या जातील."

शिवसेना भवनावर कोणाचा अधिकार?

दादर शिवाजी पार्कजवळ असणारं शिवसेना भवन हे दादर , लालबाग, परळ, वरळी, माहिम या मराठी भागांना जोडणारं आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर जसेजसे कार्यकर्ते वाढत गेले तशी बाळासाहेब ठाकरे यांचं दादरचं घर आणि पर्ल सेंटरच्या ऑफिसची गर्दी वाढू लागली.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी 1974 साली शिवसेना भवनाच्या बांधकामाची सुरवात केली. 19 जून 1977 साली शिवसेनेचं अधिकृत आणि प्रमुख कार्यालय उभं राहीलं. या कार्यालयातील काही खर्च हा वेगवेगळ्या लोकांच्या देणगीतून झाला आहे.

पण शिवसेना भवनची ही जागा शिवसेनेची आहे का? तर नाही. शिवसेना भवनची ही जागा शिवाई ट्रस्टची आहे. कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे सांगतात,

"शिवसेना भवनवर जर शिंदे गटाने दावा केला तर शिवाई ट्रस्टने ठरवलं की ही जागा आम्हाला ठाकरे गटाकडे ठेवायची आहे तर ती जागा ठाकरेंकडेच राहणार. जर ती जागा शिवसेना पक्षाच्या नावावर असती तर शिंदे गटाला मिळू शकली असती."

शिवाई ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये सुभाष देसाई, उद्धव ठाकरे, विशाखा राऊत, दिवाकर रावते, लीलाधर डाके हे नेते आहेत. त्यामुळे ही जागा ठाकरेंकडे राहील.

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणतात, "शिवसेना भवन ही आमच्यासाठी मालमत्ता नाही तर ते आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही त्यावर कधीही दावा सांगणार नाही. याउलट आजही तिथे वाकून नमस्कार करू."

पक्षाचा निधी, युनियन कोणाच्या असतील?

विविध कंपन्यांमधील संघटना या खासगी आहेत. मुंबईतील विविध पंचतारांकीत हॉटेल, विमानतळ, टेलीफोन एक्सचेंज अशा असंख्य ठिकाणी शिवसेनेच्या युनियन आहेत. या सर्व युनियन खासगी असून त्यावर पक्षाचा एक माणूस प्रमुख म्हणून काम करत असतो. तिथे काम करणारे कर्मचारी पक्षाच्या त्या व्यक्तीसोबत काम करत असतात.

त्यामुळे खासगी युनियनवर दावा न सांगता शिंदे गटाला नव्याने या संघटनांची स्थापना करावी लागेल.

कायदेतज्ञ श्रीहरी अणे सांगतात, "शिवसेना नावाचं जर कोणतं बॅंकेत खातं असेल. त्यात पार्टी फंड जमा असेल तर त्यावर एकनाथ शिंदे दावा करू शकतात. पण जर ती खाती वेगळ्या कंपनीच्या किंवा ट्रस्टच्या नावे असेल तर तो निधी कोणाचा यावर कायदेशीर वाद चालू शकतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)