1857च्या उठावावेळी ब्रिटीशांना चपाती गूढ किंवा रहस्यमय गोष्ट वाटू लागलेली, कारण...

पोळी
    • Author, मेहेर मिर्झा
    • Role, बीबीसीसाठी

भारतात 1857 मध्ये बुचकाळ्यात पाडणारं असं काहीतरी भलतंच घडायला सुरुवात झाली होती.

चपाती हा रोजच्या आहारातला पदार्थ... पण या चपात्या एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करू लागल्या होत्या. खबरी अचानक अशा चपात्यांसह उपस्थित व्हायचा आणि गावातील प्रमुखाला ते सोपवून निघून जायचा. त्यानंतर गावचे प्रमुख दुसऱ्या गावात ताज्या चपात्या पाठवायचे आणि असंच पुढं एका गावातून दुसऱ्या गावात सुरू होतं.

अशाप्रकारे ही चपाती संपूर्ण उत्तर भारतामध्ये फिरत होती, तिचा प्रवास सुरू होता. प्रामुख्यानं सध्याच्या मध्य प्रदेश राज्यातील मुख्य शहर असलेल्या इंदूरपासून राज्याच्या उत्तरेला असलेल्या ग्वाल्हेरपर्यंत हा प्रवास सुरू होता.

सध्या उत्तर प्रदेशच्या उत्तर भागात असलेल्या रोहिलखंडचा मार्ग त्यांना या माध्यमातून सापडला. हा मार्ग एकेकाळच्या प्रसिद्ध अवधचं राज्य असलेल्या अलाहाबाद आणि आताच्या प्रयागराजच्या भागातून सापडला होता. हा भागही उत्तर प्रदेशातच आहे.

या चपात्या एका रात्रीमध्ये 160 ते 200 मैलाचं अंतर पार करत होत्या, असा ब्रिटीश अधिकाऱ्यांचा अंदाज होता. हा वेग त्याकाळच्या सर्वात वेगवान संदेशवाहनापेक्षा खूप जास्त होता. कधी या चपातीबरोबर कमळाची फुलं असायची तर कधी बकरीचं मांस. मात्र, बहुतांशवेळा चपात्यांचा प्रवास एकट्या आणि सोबत काहीही नसतानाच व्हायचा.

सुमारे 100 वर्षांपूर्वी प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी तुकड्यांचा सामना बंगालचे नवाब आणि ईशान्य भारतातील त्यांचे फ्रेंच सहकारी यांच्याबरोबर झाला होता. या युद्धात रणांगण आणि रणांगणाबाहेर दोन्ही ठिकाणची लढाई ब्रिटिशांनी जिंकली होती.

या विजयामुळं इतर गोष्टींबरोबरच ईस्ट इंडिया कंपनीला मुघलांच्या अधिपत्याखालील क्षेत्रातूनही कर वसुली करण्याची परवानगी होती. या माध्यमातूनच कंपनीला भारतात पाळंमुळं रोवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

शतक उलटून गेलंय, पण अजूनही ही भारताची दुखरी नस ठरलीय.

धर्म प्रसाराच्या अफवा

"इंदूरमध्ये कोलेराची साथ पसरलेली. गेल्यावर्षी ईस्ट इंडिया कंपनीनं अवधवर ताबा मिळवला आणि नवाबालाही पायउतार करत कोलकात्यामधून हाकलून लावलं. सगळीकडे विविध अफवा पसरायला सुरुवात झाली होती. ब्रिटिश पीठामध्ये गायी आणि डुकरांच्या हाडांचा वापर करून ते दूषित करत आहे, असे आरोप काहींनी केले. तसंच ते औषधांमध्ये थुंकून तेही देखील खराब किंवा भ्रष्ट करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

लखनऊच्या तिलिस्म-ए-लखनऊ या स्थानिक उर्दू वृत्तपत्रानं एका घटनेचं वर्णन केलं होतं. त्यानुसार हॉस्पिटमधील रुग्णांनी औषधं खायलाच नकार दिला होता. एक ब्रिटिश अधिकारी औषधांमध्ये थुंकल्याच्या आरोपानंतर त्यांनी औषधं खायला नकार दिला होता," दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागात गेस्ट लेक्चरर असलेल्या हिना अन्सारी यांनी ही माहिती दिलीय.

ईस्ट इंडिया कंपनी
फोटो कॅप्शन, ईस्ट इंडिया कंपनी

लेखक आणि ऐतिहासिक अनुवादक राणा सफ्वी यांनी तणाव आणि चिंतेच्या आणखी एका कारणाचं विश्लेषण केलंय. त्यांच्या मते, "एक अशीही अफवा होती की, 1757 मधील प्लासीच्या लढाईच्या 100 व्या वर्धापन दिनाला, विदेशी राजवट संपुष्टात येणार आहे."

एकत्रितपणे पसरलेल्या या अफवांनी लोकांचा समज झाला होता की, इंग्रज देशात धर्मप्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

चपाती चळवळ

याच सर्व वातावरणात समोर आली चपाती चळवळ. त्यामुळं ब्रिटिश पूर्णपणे अस्वस्थ झाले होते.

गोंधळलेल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना पत्र लिहित संभ्रम आणखी वाढवण्यात मदत केली होती. या पत्रांमध्ये त्यांनी, किमान चळवळीच्या सुरुवातीला तरी चपाती ही 'अवर्णनीय' किंवा 'काही तरी विकृती असावी' असं म्हटलं होतं. पुन्हा पुन्हा चपातीला 'गूढ किंवा रहस्य' म्हणून घोषित करण्यात आलं.

"त्या काळात संपूर्ण भारतामध्येच अत्यंत गूढ असं काहीतरी घडत होतं." ईस्ट इंडिया कंपनीत आर्मी सर्जन पदावर असलेले गिल्बर्ट हॅडो यांनी मार्च 1857 मध्ये त्यांच्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात तसं म्हटलं होतं.

"कोणालाही याचा अर्थ माहिती आहे, असं वाटत नाही. याची सुरुवात किंवा उदय कुठून झाला, कुणी आणि कशासाठी ते सुरू केलं काहीही माहिती नाही. त्याचा संबंध एखाद्या धार्मिक विधीबरोबर आहे किंवा एखाद्या सिक्रेट सोयासटी (गूढ गट-समाज) बरोबर याचा संबंध आहे हेही माहिती नाही. याचा नेमका काय अंदाज असावा, या मुद्द्यांनी भारतीय वृत्तपत्रे भरलेली आहेत. याला 'चुपट्टी (chupatty) आंदोलन'म्हटलं जात आहे," असं त्यांनी लिहिलं होतं.

त्यावेळी मथुरा या शहराचे मॅजिस्ट्रेट असलेले मार्क थोर्नहिल लिहितात की, : "एक व्यक्ती गावात आला आणि त्यानं पहारेदाराला (प्रमुखाला) एक केक (चपाती) दिला. त्यासारख्याच आणखी चार चपात्या तयार करून त्या इतर गावांच्या पहारेदारांना वाटाव्या अशा संदेश त्याबरोबर देण्यात आला होता. तसंच त्यांनी हे असंच पुढे ठेवावं असंही त्यांना संदेश देण्यात येत होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे नऊ दिवसांनंतर याबाबतची चर्चा पूर्णपणे बंद झाली होती."

चपाती

फोटो स्रोत, Getty Images

काही जण तर, चपात्या सोबत नेण्याचे दाखले पाहून वैतागायला सुरुवात झाली होती.

"याकडं वसाहतवादी अधिकाऱ्यांप्रती देशद्रोह आणि भारतीयांचा वसाहतवादविरोधी राष्ट्रवादी संर्घषाची खूण अशा अर्थानं पाहिलं गेलं, असं युकेच्या नॉटिंघम विद्यापीठातील इतिहास विषयाचे प्राध्यापक अरुण कुमार यांनी म्हटलंय.

"स्कॉटलँडमधील ज्वलंत क्रॉसच्या वाटपाप्रमाणं, राजकीय एकत्रिकरण आणि संघर्षाचं एक साधन म्हणून, चपातीकडं पाहिलं जाऊ लागलं." (ज्वलंत किंवा भाजलेला क्रॉस हा एकेकाळी स्कॉटलँडमध्ये शस्त्रांची मागणी करण्यासाठी केला जात होता.)

दुसरीकडे हा प्रकार म्हणजे स्थानिकांची आजार पळवण्यासाठीची परंपरा असल्याचं म्हणत त्याकडं दुर्लक्ष केलं. गांभीर्यानं विचार केला असता, अशा संदेशवहनाचे मोठ्या प्रमाणावर प्रतिध्वनी भारतीय इतिहासात उमटलेले दिसतात.

"याबरोबरच इतरही अनेक वस्तू म्हणजे, तीर, आदिवासींमध्ये काही विशिष्ट झाडांची पानं, नारळ, मातीची भांडी यांचा वापरदेखील रोग, सण-उत्सव, एकत्र जमणे किंवा बंडखोरीचे संदेश पोहोचवण्यासाठी केला जात होता," असं कुमार म्हणतात.

चपातीमधली प्रतीकात्मकता

कुमार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, कोल या पूर्व भारतातील आदिवासी जमातीनं 1831-32 मध्ये छोटा नागपूर पठारावर खास संदेशासह बाणांचं वितरण केलं होतं. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं होतं की, पूर्व भारतातच वसलेल्या संथाळ जमातीचे लोकदेखील 1857 पूर्वी साल नावाच्या झाडाच्या फांद्या आणि लाक कुंकू वितरीत करून एकत्रितपणे कारवाईचा संदेश प्रसारीत करणार होते.

"पण मोठ्या प्रमाणावरील भौगोलिक भागात राबवलेल्या चपाती चळवळीशी तुलना करता, हे सर्व अगदी छोट्या प्रमाणावर सुरू होतं," असं कुमार म्हणतात.

"उत्तर भारतात चपातील सर्वात महत्त्वाचा आणि विविध संदर्भ असलेला खाद्यपदार्थ आहे. संपूर्ण ग्रामीण समाजाला एकवटवण्याचं असं ग्रामीण प्रतीकात्मक मूल्य त्यात होतं."

पुढे गांधीजींनी मीठासारख्या रोजच्या वापरातील पदार्थाचा वापर करून अशाच प्रकारे ग्रामीण भागाला संघर्षासाठी प्रेरित करण्याचं काम केलं.

त्या काळातील पहाडगंज येथील पोलिस अधिकारी मुईनुद्दीन हसन खान यांनीदेखील चपात्या वितरीत करून अशाच प्रकारे गोंधळ पसरवल्याचं सांगितलं होतं, याकडं सफ्वी लक्ष वेधतात. "सध्याच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात चपात्यांचे वितरण करुन आणखी एक संकेत देण्यात आला. हा संकेत म्हणजे अशुभ चिन्हं होतं," असं त्यांनी सांगितल्याचं चार्ल्स मेटकाफ यांच्या 1988 मधील टू नेटिव्ह नरेटिव्हज ऑफ म्युटिनी इन दिल्ली या पुस्तकात लिहिलंय.

खान यांनी पुढं त्याबाबत स्पष्टीकरण दिलंय. "त्यावेळी मी दिल्ली शहराच्या अगदी बाहेर असलेल्या, पहाडगंड येथील पोलिस ठाण्याचा मुख्य पोलिस अधिकारी होतो. एके दिवशी अगदी पहाटे इंद्रपुत गावचा पहारेदार आला आणि त्यानं सेराई गावचा पहारेदार फारुक खान यानं चपाती आणल्या आहेत, असं सांगितलं.

त्यानं अशाच पाच चपाती तयार करून जवळच्या गावात पाठवायला सांगितल्याचंही त्यानं म्हटलं. त्यानंतर त्या चपाती मिळालेल्या प्रत्येकाला पाच गावांमध्ये अशा चपातींचं वाटप करायचं होतं आणि हे असंच सुरू राहणार होतं."

"प्रत्येक चपाती जव किंवा सातू आणि गव्हाच्या पीठापासून तयार करायची होती. तिचा आकार पुरुषाच्या हाताएवढा आणि वजन अंदाजे वीस ग्रॅम असणार होतं," असं खान म्हणाले.

"मी चकित झालो होतो. पण पहारेदार जे सांगत होता ते खरं होतं हे माझ्या लक्षात आलं. याचा नक्कीच एखाद्या घटनेशी संबंध होता. त्याद्वारे संपूर्ण देशभरातील लोकांच्या मनात, प्रेरणा किंवा भावना निर्माण केली जाणार होती, यात शंका नाही."

चपातीचा क्रांतीच्या प्रतिकाचं रुप असल्याचा उल्लेख विनायक दामोदर सावरकर यांच्या 'इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857' मध्ये करण्यात आलेला आहे. त्यांच्या मते, ब्रिटिश साम्राज्यावर नाराज अशलेल्या भारतीयांसाठी चपाती चळवळ स्फुल्लिंग पेटवणारी अशी होती.

सिराज- उद-दौलला
फोटो कॅप्शन, सिराज- उद-दौलला

त्यानंतर आणखी एक अफवा पसरली. ब्रिटिश सैन्यानं भारतीय सैनिकांच्या तुकड्यांना युद्धात वापरण्यासाठी दिलेल्या एनफिल्ड रायफलच्या कार्ट्रेजेसमध्ये (काडतुसे) डुक्कर आणि गायींच्या चरबीचा वापर वंगन म्हणून करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

मुस्लीम आणि हिंदू सैनिकांच्या धार्मिक विचारसरणीला ते मान्य नव्हतं.

ही अडचण दूर करण्यासाठी, सैन्याने दाताने फाडायची असलेली काडतुसे कापडाने गुंडाळलेली असायची. या सर्वामुळं संघर्षाचा केंद्रबिंदू तयार झाला. हिंदू आणि मुस्लीम सैनिकांनी त्यांच्या धर्म आणि जातीच्या भीतीने (ऐतिहासिकदृष्ट्या केवळ काही जातींनी गोमांस टाळलं आहे) ही काडतुसं वापरण्यास नकार दिला. त्यांच्या नकारानं जणू एक ठिणगी पेटली आणि त्यासह इतर गोष्टीमुळं ही घटना मोठ्या बंडासाठी कारणीभूत ठरली.

आता हे केवळ सैनिकांचा बंड उरलेला नव्हता. तर इतर लोकांचा विरोधही यामुळं सुरू झाला होता. दिल्लीमध्ये बहादूर शाह, कानपूरमध्ये नानासाहेब (मराठा पेशवा बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र), झांशीमध्ये राणी लक्ष्मीबाई, लखनऊमध्ये मौलवी अहमदुल्लाह आणि जनरल बख्त खान आणि मध्य भारतात तात्या टोपे, असे नेते उदयास आले आणि सगळे संघर्षाच्या उद्देशानं एकमेकांशी आणि आंदोलनाशी जोडले गेले.

मे ते सप्टेंबरदरम्यान अत्यंत जोरदार युद्ध झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे ब्रिटिशांनी दिल्लीत अत्यंत क्रूरपणे हत्या केल्या.

या सगळ्यामध्ये चपातीनं योगदान दिलं होतं का?

"चपातीचं गूढ हे 1857 च्या सुरुवातीच्या काळात पसरलेली एक अफवा होती. नव्यानं आणल्या जाणाऱ्या बंदुकींच्या काडतुसांमध्ये गाय आणि डुकराच्या चरबीचा वापर केल्याचा, संदेश त्यातून भारतीयांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित होतं," असं साफ्वी म्हणतात.

"याचं वर्णन करणारे अनेकजण असंही म्हणतात की, हे सर्व का केलं जात होतं हे कोणालाही माहिती नव्हतं. जो उठाव झाला त्याचा याच्याशी काहीही संबंध नव्हता असं सांगितलं जातं. पण जे नंतर या बंडामध्ये सहभागी झाले होते, त्या सर्वांनी हे बिंदू जोडले आणि त्याचा संबंध लावला."

गेल्या काही दशकांत झालेल्या संशोधनानं त्या वर्षीच्या घटनांचं गुंतागुंतीचं वर्णन समोर आलंय. काही इतिहासकारांच्या मते तर, उठावाचं आव्हान देशवासियांपर्यंत विविध गोष्टींच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलं होतं. त्यात लावणी, तमाशा (प्रसिद्ध लोककसा), कठपुतली याबरोबरच शाईने कागदावर लिहून पाठवलेले संदेश, सादिक-अल-अखबारसारखी काही वृत्तपत्रे, प्रसिद्धी पत्रके यांचाही प्रभावी वापर करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. दाट लोकवस्तीमध्या या सर्वांचं वितरण केलं जात होतं.

या दस्तऐवजांचा उद्देश हिंदु-मुस्लीम ऐक्याची भावना पुढं नेणं आणि त्याचबरोबर पुन्हा मुघल सार्वभौमत्वाची भावना निर्माण करणं हा होता. संदेशवहनाची लेखी आणि खाद्यपदार्थांच्या रुपातील पद्धत सहजपणे विरोधकांकडून थांबवता येणं शक्य नव्हती.

अन्सारी यांनी याबाबत ठामपणे मत मांडलंय. "बंडखोरांनी तोंडी प्रचारानं किंवा चपाती आणि कमळ अशा गोष्टींच्या वितरणाच्या माध्यमातून बंडाचा प्रसार केला या मताच्या अगदी विरोधी काही छापील आणि हस्तलिखित दस्तऐवज सापडले असून, त्याद्वारे बंडखोरांनी आधुनिक तंत्राचा वापर केल्याचं स्पष्ट होतं.

बंडखोर नेत्यांनी जारी केलेले अनेक आदेश घोषणांचे असे दस्तऐवज भारतीय अभिलेखागारात आहेत. त्याशिवाय त्यांनी संविधानही तयार केलं होतं तसंच कायदेव्यवस्था हाताळण्यासाठी दिल्ली शहरात न्यायालयाचीही स्थापना केली होती. "

दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक सय्यद झहीर जाफरी यांनी 1857 च्या क्रांतीचा अभ्यास केला आहे. तेही याच्याशी समहत आहेत. "1857 च्या उठावात लोकांचे एकत्रिकरण हे निश्चितच छापील मजकुराच्या माध्यमातून झालं होतं. इतिहासकारांनी बंडखोर नेत्यांनी जारी केलेले जवळपास 74 दस्तऐवज समोर आणले आहेत. त्यात पत्रकं आणि स्थानिक राजा, राणी, नबाब यांनी जारी केलेली पत्र यांचा समावेश आहे. चपातीच्या प्रतिकाबद्दल 20 व्या शतकामध्ये सावरकरांनी लिहिलेलं समोर आलंय. पण त्यासाठी कोणताही स्त्रोत देण्यात आलेला नाही."

तरीही या घटनेच्या बहुतांश वसाहतवादी स्पष्टीकरणांमध्ये मोठ्या संख्येतील पुराव्यांकडं दुर्लक्ष करण्यात आलंय. केवळ चपातीचा मुद्दाच शिल्लक राहिलाय. काही इतिहासकारांच्या मते या लेखी पुराव्यांकडं दुर्लक्ष करणं हा, या क्रांतीच्या घटनेला केवळ संतापात घडलेला प्रकार दर्शवण्याचा वसाहतवादी शक्तींचा प्रयत्न आहे. बंडखोरांच्या चिंता आणि त्यांचे विचार दाबण्याचा हा आणखी एक मार्ग बनला.

1857 मधील घटना या भारतातील ब्रिटिश राजवटीची पुनर्स्थापना करणाऱ्या ठरल्या. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये इंग्रजांनी संपूर्ण देशभरात अगदी वेगानं त्यांची निगराणी वाढवली. त्यांनी 1878 मध्ये 'गँगिंग अॅक्ट' म्हणून प्रसिद्ध असलेला 'व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट' हा कायदा करत बंडखोरांची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला.

या कायद्यानुसार भारतीय भाषांतील वृत्तपत्रांना ब्रिटिश धोरणांवर टीका करण्यास पूर्णपणे बंदी होती आणि ही बंदी केवळ भारतीय माध्यमांवर लागू करण्यात आली होती.

त्यामुळं हे असं वर्ष होतं जेव्हा साध्या चपातीच्या वाटपातून एक मोठा विचार पसरण्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या पतनाची सुरुवात झाली आणि त्यांचे अधिकार ब्रिटिश राजवटीकडं हस्तांतरीत झाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)