हिंडनबर्ग रिपोर्टचा अदानी ग्रुपच्या धारावी प्रकल्पावर काय परिणाम होईल?

गौतम अदानी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी असलेल्या हिंडेनबर्गने आपल्या एका रिसर्चमधून अदानी समूह "अकाउंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिपुलेशन आणि मनी लाँडरिंग" मध्ये गुंतल्याचे गंभीर आरोप केले होते.

या आरोपांमुळे समूहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने घसरल्या आणि तज्ञांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

आता महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे, या आरोपांमुळे अदानी समूहाला त्यांच्या अर्धवट आणि नव्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारणं शक्य होईल का?

तसं बघायला गेलं तर संबंध भारतभर अदानी समूहाचं नाव आहे. मग उत्पादनाच्या बाबतीत असो की बंदर, एअरपोर्ट उभारणीतील गुंतवणूक असो, अदानी सगळीकडे आहेत.

हे संकट येण्याआधी अदानी समूह 260 अब्ज डॉलर्सचा समूह असल्याचं सांगितलं जायचं.

तसेच सध्या ज्या योजनांवर काम सुरू आहे त्या जर पूर्ण झाल्या तर येत्या काही वर्षांत समूह दुपटीने वाढू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.

सिंगापूरमधील भारतीय वंशाचे स्टॉक मार्केट आणि करन्सी मार्केटमधील तज्ज्ञ वैष्णव वशिष्ठ सांगतात की, "हे संकट एकट्या अदानी समूहावर कोसळलेलं नसून मोदी सरकारच्या अनेक मोठ्या योजनाही धोक्यात आहेत."

ते पुढे सांगतात, "काय बरोबर काय चुकीचं या विषयात मी जाणार नाही, पण मोदी सरकारने आपल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना अदानी समूहाकडे सोपवल्या आहेत. यात पायाभूत सुविधा, आत्मनिर्भर भारत अंतर्गत सुरू असणारे प्रोजेक्ट, शेतीशी संबंधित प्रोजेक्ट आहेत."

मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आर. एन. भास्कर यांनी गौतम अदानी यांचं चरित्र लिहिलं असून ते नुकतीच प्रकाशित झालं आहे.

गौतम अदानींचं चरित्र लिहिणारे आरएन भास्कर
फोटो कॅप्शन, गौतम अदानींचं चरित्र लिहिणारे आरएन भास्कर

आर. एन. भास्कर हे 2007 पासून अदानी यांना ओळखतात. त्यावेळी अदानींची गणना मोठ्या उद्योगपतींमध्येदेखील होत नव्हती.

ते सांगतात की, अदानी समूहाला भांडवलाची अथवा कर्जाची कमतरता भासणार नाही.

ते सांगतात, "मला असं वाटत नाही की, अदानींना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. फ्रेंच ऊर्जा कंपनी टोटलने सांगितलंय की ते अदानींसोबत आहेत. विल्मरने देखील अदानींना पाठिंबा असल्याचं सांगितलंय."

मात्र टोटल ग्रुपने अलीकडेच एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, अदानीसोबतचे हायड्रोजन प्रोजेक्ट्स त्यांनी तूर्तास थांबवले आहेत.

अदानींचे सध्याचे प्रोजेक्ट्स

पहिल्यांदा आपण अदानींच्या काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर एक नजर टाकूया..

धारावी पुनर्विकास प्रकल्प : अदानी समूहाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या बोली लावली होती.

या प्रकल्पामध्ये 7 वर्षात 6.5 लाख झोपडपट्टीवासीयांचं पुनर्वसन करायचं होतं. या प्रकल्पामुळे अदानी समूहाला मुंबईच्या मध्यभागी लाखो चौरस फूट निवासी आणि व्यावसायिक जागा मिळणार आहे. यातून त्यांना मोठी कमाई करता येणं शक्य आहे.

ग्रीन एनर्जी : मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गौतम अदानींनी ग्रीन एनर्जीच्या गुंतवणुकीसंदर्भात घोषणा केली होती. पुढील दशकात ते 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून यातील 70 टक्के रक्कम ग्रीन एनर्जीवर करण्यात येणार आहे.

समूहाने ग्रीन एनर्जीच्या गुंतवणुकी संबंधित आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत सरकार पण देशाचं पेट्रोलियम इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.

अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस : अदानी समूहाची डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 'अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस' ने ड्रोनसह काही संरक्षण उत्पादनांची निर्यातही सुरू केलीय.

ड्रोन बनवण्यासाठी त्यांनी काही इस्रायली कंपन्यांशी करार केलाय.

अदानी-हिंडनबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

समूहाने आपल्या वेबसाइटवर म्हटलंय की, "आम्ही संरक्षण आणि एरोस्पेसमध्ये जागतिक खेळाडू बनण्यासाठी कटिबद्ध आहोत. भारताला जागतिक दर्जाच्या आणि हायटेक संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

आर.एन. भास्कर त्यांच्या पुस्तकात लिहितात की, भारताने 2016-20 दरम्यान संरक्षण सामग्री आयात करण्यासाठी 332 अब्ज डॉलर खर्च केलेत.

त्यामुळे भारताला संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करायची असेल तर त्यासाठी खाजगी क्षेत्राला यामध्ये सहभागी करून घेणं योग्य ठरेल.

एअरलाइन्स आणि एमआरओ : भारतातील प्रवासी आणि मालवाहू विमान कंपन्यांकडे 700 पेक्षा जास्त विमानं आहेत.

याव्यतिरिक्त भारतीय हवाई दलाची जी विमाने आहेत त्यांना वेळोवेळी मेंटेनेंस आणि सर्व्हिसची गरज असते.

अदानी समूहातील कंपनी या सर्व विमानांना सर्व्हिस पुरवते. आणि फक्त भारतच नाही तर शेजारील देशांच्या काही विमान कंपन्याही ही सुविधा घेतात.

अदानी कनेक्स डाटा सेंटर : पुढील दशकात डिजिटल इंडियाला सशक्त बनविण्यासाठी अदानी ग्रुप आणि एजकनेक्स यांनी 1 GW डेटा सेंटर जॉइंट व्हेंचर सुरू केलंय.

अदानी समूहाच्या वेबसाइटवर या जॉइंट व्हेंचरचा उल्लेख करताना म्हटलंय की, "प्रत्येक संस्थेचा डेटा आणि त्यांच्या डिजिटल ट्रांसफॉर्मेशनला गती देणं हा आमचा उद्देश आहे. तसेच या व्हेंचर अंतर्गत संस्थांना आवश्यक असलेली पारदर्शकता, मानके, सुरक्षा आणि लवचिकता प्रदान करण्यात येतील."

गोड्डा थर्मल पॉवर स्टेशन : बांगलादेशची वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी 1,600 मेगावॅटचे गोड्डा थर्मल पॉवर स्टेशन बांधण्यात येत आहे. या पॉवर स्टेशनला आणखी सहा महिने

विलंब झाला असून ते बांधून जवळपास तयार आहे.

सध्या तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे की, या नव्या संकटामुळे समूहाच्या नवीन योजनांवर परिणाम होईल की नाही? किंवा या समूहात गुंतवणूकदार गुंतवणूक करतील का? याव्यतिरिक्त कर्ज देणाऱ्या बँका समूहाला कर्ज देतील की नाही?

'अदानी जखमी झालेत पण संपलेले नाहीत'

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाईड इकॉनॉमिक्स शिकवणारे प्राध्यापक स्टीव्ह एच. सांगतात की, "अदानी गंभीर जखमी झालेत पण अजून संपलेले नाहीत. एखाद्याची प्रतिष्ठा संपवण्यासाठी फसव्या व्यावसायिक व्यवहारापेक्षा वाईट असं काहीही नाही आणि एखाद्याच्या प्रतिष्ठेपेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाही."

स्टीव्ह एच अमेरिकेचे माजी अध्यक्ष रेगन यांच्या आर्थिक सल्लागार समितीमध्ये कार्यरत होते.

स्टीव्ह एच

पण आर. एन भास्कर यांच्या मते, अदानी समूहाकडचा कॅश फ्लो मजबूत आहे.

ते सांगतात, "मी जेव्हा अदानीवर पुस्तक लिहीत होतो त्यावेळी हिंडनबर्गचा रिपोर्ट आला नव्हता. पण आता रिपोर्ट जरी आला असेल तरी विनाकारण चिंता करण्याची गरज नाहीये."

ते यामागची कारणं सांगतात की, "एकतर अदानी समूहाचा कॅश फ्लो मजबूत आहे. त्यांचे निम्मे भारतीय प्रकल्प हे नियमन केलेले आहेत, म्हणजे यावर समूहाचीच मक्तेदारी आहे. जसं की, गॅस वितरण नेटवर्क, ऊर्जा उत्पादने, वीज ट्रांसमिशन नेटवर्क यात त्यांचीच मक्तेदारी मानली जाते आणि सरकार निश्चित दराने याची खरेदी करते."

ते म्हणतात, "त्यामुळे समूहाकडे पैशांचा ओघ कायम आहे. आणि जसजशी कमाई वाढेल तसतसा समूहाचा नफा वाढतो."

अदानी समूहाने गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. त्यामुळे अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरच्या किमतीत घसरण झाल्यानंतरही मोठी झेप घेतली आहे.

यातलं पहिलं पाऊल म्हणजे, समूहाने सोमवारी 9,200 कोटी रुपयांचं कर्ज फेडलं. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, अदानी समूह आता अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि अदानी ट्रान्समिशन या तीन कंपन्यांचे इक्विटी शेअर्स विकायला काढेल.

गौतम अदानी

फोटो स्रोत, Getty Images

याव्यतिरिक्त अदानी पोर्ट्सनेही त्यांचं कर्ज मुदतीआधी फेडणार असल्याची घोषणा केली आहे. समूहाच्या संपूर्ण कर्जापैकी 30 टक्के कर्ज हे सरकारी बँकांकडून घेण्यात आलंय. मात्र मागच्या तीन वर्षांपासून यात कोणताही बदल झालेला नाही.

भारतातील नंबर वन उद्योग समूह

मागच्या दोन वर्षांत अदानी समूहाचं कर्ज 1 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलंय. आणि इतकं कर्ज असूनही अदानी समूह भारतातील पहिल्या क्रमांकावरचा उद्योग समूह आहे.

उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास

देशातील खाद्यतेल व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे अदानी विल्मर.

अदानी समूह सफरचंदांची सर्वात मोठी पुरवठा साखळी आहे. हिमाचलनंतर आता काश्मीरमधील सफरचंदांच्या व्यापारात उतरण्याचा समूहाचा प्रयत्न सुरू आहे.

अदानी समूह

ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी धान्य साठवणूक कंपनी आहे.

आर.एन. भास्कर म्हणतात, "जर तुम्ही कोलकाता किंवा इतर ठिकाणच्या धान्याच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये गेलात, तर लोक अदानीचा स्टॉक आहे का? असं विचारताना दिसतील. कारण अदानी समूहाकडे धान्याचा सर्वात प्रीमियम साठा असतो आणि त्याची आधुनिक पद्धतीने साठवणूक केलेली दिसते."

भारतातील सर्वात मोठी गॅस नेटवर्क कंपनीसुद्धा अदानींचीच आहे.

वीज निर्मिती आणि वितरण करण्यात अदानी समूह देशात एक नंबरला आहे.

एअरपोर्ट निर्मिती आणि मॅनेजमेंट मध्ये देशातील तीन मोठ्या कंपन्यांमध्ये समूहाचं नाव आहे.

बंदर निर्मितीमध्ये ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

समूहाच्या सध्याच्या कंपन्या आणि नवीन मेगा प्लॅनसाठी भरपूर पैसा लागणार आहे. अदानी स्वतः म्हणाले होते की, त्यांना त्यांच्या योजना पूर्ण करण्यासाठी पुढील 10 वर्षांत 100 अब्ज डॉलर्सची गरज आहे.

आजअखेर त्यांन विदेशी गुंतवणूकदार, बँका आणि भारतातील सरकारी बँकांकडून कर्ज घेतलंय. मात्र हिंडेनबर्गच्या रिपोर्ट नंतर जे संकट ओढवलंय त्यामुळे समूहाला पूर्वीसारखं कर्ज मिळेल का? अशी भीती निर्माण झाली आहे.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे स्टीव्ह एच. हँके सांगतात की, इथून पुढे भारत आणि तिथल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची का? याचा विचार परदेशी गुंतवणूकदार करतील.

ते सांगतात की, "भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी अदानींचं संकट एक मोठा इशारा आहे."

अदानींना पाठिंबा कुठून मिळतोय?

हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अडचणीत आलेल्या अदानी समूहाला काही धक्के बसले तर काहींनी बळ दिलं.

शुक्रवारी एका मोठ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने, स्टँडर्ड अँड पुअरने अदानी पोर्ट्स आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचं रेटिंग निगेटिव्ह केलंय. याआधी याच एजन्सीने या दोन्ही कंपन्यांना स्थिर असल्याचं रेटिंग दिलं होतं.

जानेवारी 2020 मधल्या या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सुनील मित्तल, मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, गौतम अदानी आणि एएम नाइक हे उद्योगपती दिसत आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, जानेवारी 2020 मधल्या या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सुनील मित्तल, मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, गौतम अदानी आणि एएम नाइक हे उद्योगपती दिसत आहेत.

भविष्यात नव्या प्रकल्पांसाठी कर्ज उभारताना अदानी समूहाला अडचणी येऊ शकतात असा इशारा मूडीजने दिलाय. पण कंपन्यांच रेटिंग बदलणार नसल्याचं मूडीजने सांगितलंय.

रेटिंग एजन्सी असलेल्या फिंचने स्पष्ट केलंय की, अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर, अदानी समूहाच्या संस्था आणि त्यांच्या सिक्युरिटीजच्या रेटिंगवर तात्काळ परिणाम होणार नाही.

एस अँड पी डाऊ जोन्स इंडेक्सने म्हटलंय की, पुढच्या मंगळवारपासून अदानी एंटरप्रायझेसला त्यांच्या सस्टेनेबिलिटी इंडेक्स मधून हटवलं जाईल.

ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनात कोट्यवधी डॉलर्स गुंतवण्याची समूहाची वचनबद्धता असूनही सस्टेनेबिलिटी फंड त्यांना गुंतवणूक करण्यापासून रोखू शकतो.

भारताच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स अतिरिक्त देखरेखी खाली ठेवले आहेत.

आरोपांची चौकशी व्हावी

अदानी समूहाच्या विरोधात असलेल्या आरोपांसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी मोदी सरकारकडे केली आहे.

पण आर. एन. भास्कर विचारतात की, याआधी मार्केटमध्ये किती मोठी संकटं आली, मग त्यावेळी जेपीसी चौकशी का केली नाही?

ते म्हणतात, "यूटीआयवर संकट कोसळलं होतं तेव्हा मार्केट 64 टक्क्यांनी कोसळलं होतं. जर टक्केवारी मोजायला गेलं तर आजच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त मार्केट कोसळलं होतं. 2000 साली डॉट कॉममुळे मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळलं होतं, पण त्याची जेपीसी चौकशी झाली नाही."

"जेपीसी चौकशी तेव्हाच होते जेव्हा ब्रोकर्स आणि शेअर बाजारातील व्यापारी यांचं संगनमत झालेलं असतं. ज्याचे शेअर्स आहेत त्यांची चौकशी होत नाही."

रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून गौतम अदानींच्या संपत्तीत 100 अब्ज डॉलर्सची घट झालीय. थोडक्यात या रिपोर्टमुळे त्यांच्या

व्यापार साम्राज्याला मोठा धक्का बसलाय. मात्र सोमवारी (6 फेब्रुवारी) आणि मंगळवारी (7 फेब्रुवारी) समूहाच्या कंपन्यांचे स्टॉक वाढले आहेत. त्यामुळे संकटांचे ढग दूर होतील अशी आशा अदानी समूहाला लागून राहिलीय.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)