सत्यजित तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरात म्हणतात... #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. सत्यजित तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरात म्हणतात...
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. दरम्यान, या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी 'लोकसत्ता'ने दिली आहे.
ते म्हणाले, "विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे."
"हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे,"असंही ते पुढे म्हणाले.
2. 232 चिनी ॲप्सवर बंदी; जुगार, बेटिंग आणि मनी लाँड्रिंगवर केंद्र सरकारचा प्रहार
जुगार, बेटिंग, कर्जपुरवठा व मनी लाँडरिंगशी संबंधित चीन व इतर देशांची सुमारे 232 ॲप्स केंद्र सरकारने ब्लॉक केली आहेत. हा आदेश शनिवारी, 5 फेब्रुवारीला जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही बातमी 'लोकमत'ने दिली आहे.
ब्लॉक केलेल्या 232 पैकी 138 ॲप हे बेटिंग, जुगार, मनी लाँडरिंगशी संबंधित, तर उर्वरित 94 ॲप हे कर्जपुरवठ्याशी निगडीत आहेत. मात्र त्या ॲपच्या नावांचा तपशील केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. चीन व इतर देशांमधून ही ॲप चालविली जात होती. या ॲपमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
3. जाहिरातबाजीवर शिंदे-फडणवीस सरकारने 7 महिन्यात केले 42 कोटी खर्च
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यापासून फक्त 7 महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल 42 कोटी 44 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती RTI मधून प्राप्त झाली आहे. ही बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाकडे मागितली होती. त्यांनी म्हटलं आहे की, "नुकतंच राज्य शासनाकडून ही देयके मला उपलब्ध झाली. या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास 19 लाख 74 हजार रुपये जनतेच्या खिशातून खर्च होत आहेत."
असं जाहिरातबाज सरकार जनतेच्या विकासासाठी काम करेल का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
4. 'इंदुरीकरांचं कीर्तन ऐकणार होतो, पण...' शरद पवारांनी बोलून दाखवली खंत
विनोदी कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाबद्दल भाष्य केलं.

फोटो स्रोत, KIRAN GUJAR
ते म्हणाले की, "मला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आवडतं पण संसंदेच्या अधिवेशनासाठी जायचं असल्यानं यावेळी कीर्तन ऐकता येणार नाही. ही खंत आहे परंतु पुढच्या वेळी नक्कीच कीर्तनाचा लाभ घेऊ". ही बातमी 'सकाळ'ने दिली आहे.
महिलांबाबतच्या विधानामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले होते.
5. 'अब की बार किसान सरकार...'; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. परंतु आजही शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे देशात शेतकऱ्यांचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे हातात गुलाबी झेंडा घ्या अन् शेतकऱ्यांचे सरकार आणा. दोन वर्षांत महाराष्ट्रासह देशात झगमगाट दिसून येईल, असे म्हणत अब की बार किसान सरकार, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. ही बातमी 'पुढारी'ने दिली आहे.

फोटो स्रोत, TRS/FACEBOOK
भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी, 6 फेब्रुवारीला नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली. यावेळी केसीआर म्हणाले, "75 वर्षांत देशात अनेक सरकारं आली. परंतु आजही पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर दररोज शेतकरी आत्महत्या होतात याचं दु:ख आहे. देशाचे पंतप्रधान संसदेत मोठ-मोठी भाषणं करतात. परंतु दिल्लीत अनेक महिने शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात साडेसातशे जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याबद्दल मोदी एक शब्दही बोलले नाहीत."
या सभेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहमदनगर, गडचिरोलीसह अनेक भागातील माजी आमदार, जिल्हा परिषद, नगर परिषद सदस्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








