You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सत्यजीत तांबेंना कोरा एबी फॉर्म मिळाला की नाव घालून? काँग्रेसमध्येच आरोप-प्रत्यारोप
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली. तांबे-थोरात कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला आणि आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र करण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले.
याआधी काँग्रेसमध्ये असलेल्या सत्यजीत तांबे यांनी खुलासा केला की त्यांना मुद्दामहून चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. आणि असा बनाव करण्यात आला मी बंडखोरी केली. मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे तेव्हा अपक्षच राहणार आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
चुकीचा एबी फॉर्म देण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालय जबाबदार आहे, त्यावर भारतीय काँग्रेस काही कारवाई करेल का हे पाहावे लागेल असं सत्यजीत तांबे म्हणाले.
काय बोलले सत्यजीत तांबे?
ज्या ज्या वेळेस मी पक्षश्रेष्ठींकडे जायचो, तेव्हा मला सांगितलं जायचं की तुमच्या घरात वडील आमदार आहेत. त्यामुळे तुम्हाला परिषद देता येणार नाही.
खरं तर नाशिक पदवीधर मतदारसंघ हा माझ्या वडिलांनी कष्टाने बांधलेला बालेकिल्ला आहे. पण वारंवार मला सांगितलं जायचं की, वडील आमदार आहेत, त्यामुळे मला संधी देता येणार नाही.
शेवटी सात-आठ महिन्यांपूर्वी मी एचके पाटील यांना सांगितलं की, मला संघटनेत तरी संधी द्या. पण मला सांगितलं गेलं की, वडिलांच्या जागेवरून तुम्ही निवडणूक लढवा.
तेव्हा मला खूप संताप आला. मला जी संधी द्यायची असेल तर संघटनेनं द्यायला हवी, वडिलांच्या जागेवर काम करण्याची माझी मानसिकता नव्हती.
हे सगळं सुरू असताना पदवीधर निवडणूकीची गडबड सुरू झाली. त्याचवेळी माझ्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस माझ्या पुस्तकप्रकाशनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आमचा त्यांच्यावर डोळा आहे, असं विधान केलं. सभागृहातून त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड प्रतिसाद आला.
या सगळ्या दरम्यान माझ्या वडिलांनी अशी भूमिका घेतली की, जर पक्ष संधी देत नसेल तर वडिलांच्या नात्याने मी संधी द्यायला हवी. त्यानुसार आम्ही घरात चर्चा केली. माझे वडील होते, थोरातसाहेब होते आणि आम्ही चर्चा केली.
तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र
आम्ही याबद्दल प्रभारी एचके पाटील यांना सांगितलं. कारण काँग्रेसमध्ये विधान परिषदेची उमेदवारी ही राज्यातून ठरत नाही. त्यांनीही सांगितलं की, आम्ही तुम्हाला एबी फॉर्म देतो, तुम्ही कोणी निवडणूक लढवायची हे ठरवा.
फॉर्म भरायच्या शेवटची तारीख जवळ आली, तेव्हा नागपूरला एबी फॉर्म घ्यायला माणूस पाठवा असं सांगितलं. माझा माणूस दहा तारखेला नागपूरला गेला. तो दहा तारखेला संध्याकाळपर्यंत तिथे होता. रात्री त्याने एबी फॉर्म घेतला आणि अकरा तारखेला सकाळी पोहोचला.
हे एबी फॉर्म सीलबंद लिफाफ्यातून येता. आम्ही ते फॉर्म भरण्यासाठी जेव्हा लिफाफे उघडले, तेव्हा लक्षात आलं की, हे एबी फॉर्म चुकीचे आहेत. एक फॉर्म औरंगाबदचा होता, तर दुसरा नागपूर पदवीधरचा होता. त्यानंतर दिलेल्या फॉर्मवर सुधीर तांबेंचं नाव होतं.
या सगळ्या गोंधळाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस घेणार का?
हा आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा कट आहे, असा आरोपही सत्यजित तांबे यांनी केला.
माझ्याच वडिलांची उमेदवारी दिल्लीतून का जाहीर केली गेली? अमरावती आणि नागपूरचे उमेदवार दिल्लीतून जाहीर का गेले नाहीत? ही सगळी स्क्रिप्ट केवळ बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेंना बदनाम करण्यासाठी आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत मी एचके पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी मी बाळासाहेब थोरातांशी बोललो. तेव्हा त्यांनी म्हटलं की, आपण काँग्रेसकडून लढायचं आहे. मी त्यांना म्हटलं की, मी काँग्रेसचाच उमेदवार आहे, पण एबी फॉर्मची तांत्रिक गडबड झाली आहे.
काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचे षड्यंत्र
त्यानंतर एचके पाटील यांच्याशी बोलल्यावर मी त्यांना हे सगळं सांगितलं आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला गेला असला तरी महाविकास आघाडीचा पाठिंबा मला जाहीर करा. याबद्दल मी महाविकास आघाडीतल्या नेत्यांशीही बोललो. मी संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो.
पण मला जाहीर माफीचं लेखी पत्र मागण्यात आलं. मी त्यालाही तयार झालो. मी दिल्लीच्या संपर्कात होतो, पण दुसरीकडे प्रदेशाध्याक्ष माझ्याविरोधात बोलत होते. सत्यजित तांबेंनी फसवलं म्हणत होते. आणि त्यानंतर महाविकास आघाडीने दुसरा उमेदवारच जाहीर केला.
एका व्यक्तीच्या आमच्या परिवाराप्रति असलेल्या द्वेषापोटी हे सगळं केलं गेलं. पण मी आता त्याबद्दल बोलणार नाही. मला आता पुढचं काम करायचं आहे.
माझ्या वडिलांवर एका क्षणात निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाची कारवाई करण्याआधी कारणे दाखवा नोटीस दाखवावी लागली. तेही केलं गेलं नाही.
मला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं षड्यंत्र सुरू आहे. त्याविरोधात मी लढलो आणि लढत राहणार.
काँग्रेस पक्षाने काय म्हटलं?
सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष व काँग्रेस प्रदेशाध्यांवर केलेल्या आरोपाचा अतुल लोंढे यांनी समाचार घेतला.
अतुल लोंढे यांनी म्हटलं की, नाशिक पदवीधर मतदारसंघातून कोणी निवडणूक लढायची याचा निर्णय तांबे कुटुंबाने घ्यावा अशीच भूमिका पक्षाने घेतली होती, कौटुंबिक पातळीवरचा निर्णय त्यांनी का घेतला नाही? वेळेवर जाऊन फॉर्म का भरला नाही? शेवटपर्यत ते कोणाची वाट पहात थांबले होते? सुधीर तांबे यांनी फॉर्म का भरला नाही? कोरे एबी फॉर्म असताना सत्यजित तांबे यांनी आपल्या अर्जासोबत एबी फॉर्म का जोडला नाही? अर्ज भरताना कार्यकर्ते का बरोबर घेतले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारा पक्षाचा एबी फॉर्म हा कोरा व योग्य तोच पाठवला होता, त्यात कोणतीही चूक नव्हती. बाळासाहेब थोरात यांचे OSD सचिन गुंजाळ यांच्याकडे कोरे एबी फॉर्म पाठवले होते व त्यांनी ओके असे उत्तर दिले होते, याचे पुरावेही लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
लोंढे यांनी म्हटलं, की एबी फॉर्म मध्ये काही चुकीचे होते अशी त्यांची तक्रार होती तर ते एबी फॉर्म सत्यजित तांबे यांनी बदलून का घेतले नाहीत? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला होता पण फोन लागला नाही हा त्यांचा आरोपही चुकीचा आहे. नाना पटोले १० जानेवारी रोजी कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नागपूरमध्ये होते त्यांनतर दुसऱ्या दिवशी अमरावतीला काँग्रेस उमेदवाराचा फॉर्म भरण्यास ते गेले होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी यांच्या फोनवरून सुधीर तांबे यांच्याशी व आमदार वजाहत मिर्झा यांच्या फोनवरून सत्यजित तांबे यांच्याशी नाना पटोले यांची चर्चा झाली होती.
सचिन गुंजाळ यांनी काय म्हटलं?
काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी सत्यजीत तांबे यांच्या एबी फॉर्मबद्दल स्पष्टीकरण देताना सचिन गुंजाळ यांचा संदर्भ दिला होता.
मात्र, सचिन गुंजाळ यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून या सगळ्या घटनाक्रमातली आपली भूमिका स्पष्ट केली आणि सत्यजीत तांबेंना कोरे एबी फॉर्म मिळाले नसल्याचंही स्पष्ट केलं.
सचिन गुंजाळ यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे, "अतुलजी मी बाळासाहेब थोरातांचा ओएसडी नाही, तर काँग्रेसचा सचिव आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या काळात मी लुधियाना इथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील सभेच्या तयारीत होतो. 11 आणि 12 जानेवारीला मी नाशिकमध्ये नव्हतो, पंजाबमध्ये होतो."
"11 जानेवारीला मला सत्यजित तांबे यांचा चुकीचा एबी फॉर्म मिळाला म्हणून फोन आला. त्यानंतर मी संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांना फोन केला आणि त्याबद्दल विचारलं. त्यांनी मला दुसरा फॉर्म पाठवतो असं सांगितलं. मी त्यांना फॉर्मचा फोटो पाठवा असं म्हटलं. त्यांनी कोऱ्या एबी फॉर्मचा फोटो पाठवला आणि त्यावर ओके हा रिप्लाय दिला."
हा अकरा जानेवारीचा घटनाक्रम असल्याचं गुंजाळ यांनी म्हटलंय. प्रत्यक्षात सत्यजीत यांना 12 जानेवारीला जो फॉर्म मिळाला, तो सीलबंद पाकिटात असंही त्यांनी म्हटलं आहे.
गुंजाळ यांनी पुढे लिहिलं आहे, "12 तारखेला सत्यजीत यांचा मला फोन आला. त्यांनी माझ्यावर संताप व्यक्त केला. एबी फॉर्म डॉ. सुधीर तांबे यांचं नाव टाकून आल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या रकान्यात पर्यायी उमेदवाराचं नाव टाकतात तिथे NIL लिहिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)