सुप्रिया सुळे: मंत्र्यांनी अशी वक्तव्यं करणं ही आपली परंपरा नाही

व्हीडिओ कॅप्शन, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्यावरून वाद, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

"मंत्र्यांची वक्तव्यं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अशी वक्तव्यं अपेक्षित नसतात", असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांनी आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटल्या होत्या.

यासंदर्भात पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. सुप्रिया सुळे यांनी लिहिलं, "महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात".

"परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे".

"मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया".

"याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र" !

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून अजित पवार , सुप्रिया सुळे विरोधात 2 हजार 500 कोटीचा अब्रुनुकसनीचा दावा दाखल करणार असल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे. 40 आमदारांच्या वतीने हा दावा दाखल केला जाणार असून उद्या नोटीस पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. सुप्रिया सुळेंच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे म्हणाले, "अजित दादा पहाटे शपथ घ्यायला गेले होते तेव्हा त्यांना किती खोके मिळाले होते , सुप्रिया सुळेंनी उत्तर द्यावं."

दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आधी शिवी दिली आणि नंतर मी असं म्हणालोच नाही असं म्हणत घूमजाव केलं. आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतल्या त्यांच्या पावनखिंड या सरकारी बंगल्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडसुद्धा केली आहे. तर दीपक केसरकर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

सत्तार यांच्या औरंगाबादमधल्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.

एका चॅनेलच्या पत्रकाराने सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी 50 खोक्यांबाबत केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सत्तार यांनी ऑन कॅमेरा सुप्रिया सुळेंना अश्लिल शिवी दिली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्तार यांच्या बोलण्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

औरंगाबादमध्ये लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली.

दरम्यान सत्तार यांना शिवीबाबत विचारलं असता ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांना दिलेल्या शिवीबद्दल मला वावगं वाटत नाही, असं अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

अब्जुल सत्तार
BBC
जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल मी बोललो. सुप्रिया सुळे आणि महिलांची मनं दुखावली जातील असं मी बोललो नाही.
अब्दुल सत्तार, कृषी मंत्री

"माझा कोणताही कोणीही निषेध केला तरी मी त्यांना घाबरत नाही. जे आम्हाला खोक्यांची भाषा वापरतात त्यांची डोकी तपासी लागणार आहेत. हे XXXX लोकांना खोक्यांची सवय लागली आहे. या XXXX लोकांसारखी सवय नाही. मी आताही बोलतो. नंतरही बोलणार आणि सभेतही बोलणार," असं पुन्हा एकदा त्यांनी म्हटलं आहे.

ज्या भाषेत माझ्यावर टीका होईल त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईल, असं सत्तार म्हणाले आहेत.

अब्दुल सत्तार यांचं घुमजाव

"मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल अपशब्द बोललेलो नाही. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल मी बोललो. सुप्रिया सुळे आणि महिलांची मनं दुखावली जातील असं मी बोललो नाही. कोणत्याही महिला भगिनीला वाटत असेल तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही," असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत.

अब्दुल सत्तार यांच्या पन्हाळगड या सरकारी निवसस्थानाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर तिथं सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, BBC/ShardulKadam

फोटो कॅप्शन, अब्दुल सत्तार यांच्या पन्हाळगड या सरकारी निवसस्थानाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर तिथं सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, "त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. महिलांबद्दल मी एक शब्दही बोललो नाही. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमचे सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही उचकवण्याचा काम करू नका, आमच्यात भांडणं लावू नका. मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल बोललो नाही. कुठल्याही महिलेचं मन दुखावलं गेलं असेल तर खेद व्यक्त करतो."

राष्ट्रवादी काँग्रेसचं अल्टिमेटम

यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्तार यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

"सत्तेचा माज आला आहे. मीही त्यांना चॅनेलच्या माध्यमातून एकेरी आणि अपशब्द वापरू शकतो, पण ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून जो शब्द वापरला त्यातून वाह्यातपणा दिसतो. अब्दुल सत्तारांना आमचा अल्टीमेटम आहे. 24 तासात त्यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी. अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असं मिटकरी म्हणाले आहेत.

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू आहेत.

फोटो स्रोत, BBC/ShardulKadam

फोटो कॅप्शन, राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू आहेत.

"सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना वापरलेला शब्द समस्त महिला जातीचा अपमान आहे. सत्तारांना सत्तेचा उन्माद आला आहे. ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तार यांना समज द्यावी. अन्यथा हे अधोगतीकडे जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण तापवू नये. एखाद्या स्त्रीबद्दल, संसदरत्न पुरस्काराने सन्मानित खासदारांप्रति असे शब्द वापरता कामा नये. त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ", असं मिटकरी पुढे म्हणाले आहेत.

"स्त्रियांचा अवमान करणे, महिलांप्रति आक्षेपार्ह शब्द उच्चारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुठल्याही नेत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. 50 खोक्यांवरून जशी राळ उठवली गेली, अपमानित करण्यात आलं. त्याचं ते प्रत्युत्तर आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी महिलांप्रति आक्षेपार्ह उद्गार काढू नयेत", असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितलंय.

पंकजा मुंडे
BBC
कोणत्याही नेत्याने-कार्यकत्याने महिलांबाबत असं बोलू नये. आदरयुक्त भाषेत टीका करायला हवी. राजकारणाची पातळी घसरणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
पंकजा मुंडे, नेत्या भाजप

तर "मी हे वक्तव्य पाहिलेलं नाही. कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही नेत्याने-कार्यकत्याने महिलांबाबत असं बोलू नये. आदरयुक्त भाषेत टीका करायला हवी. राजकारणाची पातळी घसरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पातळी घसरत असेल तर ते चुकीचं आहे", असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांनी या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.

हे शिवसैनिक असूच शकत नाहीत. खरा शिवसैनिक महिलांचा आदर करणारा असतो. आता भाजपमधल्या सोकॉल्ड महिला नेत्या दातखिळ लावून गप्प बसल्या आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

मी दिलगिरी व्यक्त करतो - केसरकर

"सुप्रियाताई या आदरणीय नेत्या आहेत. पवार साहेबांचा वारसा त्या समर्थपणे चालवत आहे. अनेक वर्षं खासदार म्हणून जबादारी सांभाळत आहेत. आम्ही सर्वचजण त्यांचा मान ठेवतो. अब्दुल सत्तारांकडून चुकून जर असं वक्तव्य झालं असेल तर मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो", असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्राची एक परंपरा आहे. एखादी व्यक्ती चुकली आणि दिलगिरी व्यक्त केली तर माफ केलं जातं. मी स्वत: अब्दुल सत्तारांशी बोलेन. त्यांचं वक्तव्य तपासलं जाईल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व प्रवक्त्यांची बैठक होत आहे. सर्वांना वक्तव्य करताना काळजी घेण्याची आवश्यक आहे", असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)