अब्दुल सत्तार : ‘कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येईन’ म्हणणाऱ्या नेत्याचा प्रवास

अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Abdul Sattar/facebook

फोटो कॅप्शन, अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आधी शिवी दिली आणि नंतर मी असं म्हणालोच नाही असं म्हणत घूमजाव केलं. आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतल्या त्यांच्या पावनखिंड या सरकारी बंगल्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडसुद्धा केली आहे.

मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार झाला. भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.

"मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी परवानगी दिली पाहीजे. आओ देखे जरा किसमे कितना है दम" असं म्हणत थेट आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तार यांनी शिवसनेतल्या बंडानंतर आव्हान दिलं होतं.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरतायेत. ते प्रत्येक दौर्‍यात शिंदे गटातील आमदारांना 'गद्दार' म्हणत हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणूकीच्या मैदानात उतरा असं आव्हान देताना दिसतायेत. हेच आव्हान अब्दुल सत्तार यांनी स्वीकारत ते म्हणतात,

"मुख्यमंत्री औरंगाबादला आल्यानंतर मी राजीनामा देईन आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी आहे. तेव्हा दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे. त्यावेळी कोण गद्दार आहे हे लोकांना कळेल."

पण याआधीही ते अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी माध्यमांमध्ये चर्चेत असतात. यानिमित्ताने कोण आहेत अब्दुल सत्तार याचा आढावा.

अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे त्यांचे पूर्ण नाव आहे.

1 जानेवारी 1965 साली सत्तार यांचा जन्म औरंगाबादच्या सिल्लोड गावातल्या एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी सिल्लोडमधून बीएपर्यंतचे त्यांचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयापासून राजकारणाची आवड असलेल्या सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला 1984 पासून सुरूवात झाली.

घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 1984 साली ग्रामपंचायतची निवडणुक लढवून ते जिंकून आले. 1990 साली सिल्लोड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाले. नगरपरिषदेवर प्रशासक असतानाही त्यांनी खुबीने गावातील लोकांची कामं करून जनाधार गोळा केला.

अब्दुल सत्तार

फोटो स्रोत, Abdul Sattar/facebook

फोटो कॅप्शन, अब्दुल सत्तार

2001 साली अब्दुल सत्तार हे विधानपरिषदेवर निवडून गेले. 2004 साली अब्दुल सत्तार हे अतिशय कमी फरकाने विधानसभा निवडणूक हरले. 2009 साली ते पहिल्यांदा सिल्लोडमधून विधानसभा निवडणूक जिंकून आले. 2014 साली (विधानसभा निवडणूकांआधी) कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात ते काही महीने कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर विधीमंडळात विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना ते चर्चेत राहीले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल, ग्रामविकास या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केलं.

उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह बंड केलं. त्यात ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. शिंदे-फडणवीसांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यासाठी अब्दुल सत्तार हे प्रयत्नशील आहेत.

अब्दुल सत्तारांचं हिंदूत्व कोणतं?

एकनाथ शिंदेसह 50 आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केल्यानंतर आम्ही हिंदुत्वाच्या मुद्यावरून सरकारमधून बाहेर पडत असल्याचा दावा केला.

या 50 आमदारांमध्ये शिंदे गटातील अब्दुल सत्तार हे मुस्लीम आहेत. मग त्यांचं हिंदुत्व कोणतं? हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उपस्थित केला गेला.

अब्दुल सत्तार

फोटो स्रोत, Abdul sattar/facebook

फोटो कॅप्शन, अब्दुल सत्तार

याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारलं असता ते म्हणाले होते, "2019 ची निवडणूक ही मी एमआयएम पक्षाकडून लढवली नव्हती तर शिवसेना भाजप युतीसोबत लढवली होती. त्या पक्षाचा विचार हा हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे आपण ज्या पक्षात जातो तो विचार स्विकारावा लागतोच. जो मी स्विकारला होता."

तेव्हा कॉंग्रेस कार्यकर्त्याला लाथ मारली होती...

2008 - 2009 पासून अब्दुल सत्तार यांना मराठवाड्यात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळखलं जात होतं. औरंगाबादमध्ये कॉंग्रेसचा दबदबा निर्माण करण्यात सत्तार यांचा वाटा होता. अब्दुल सत्तार हे कॉंग्रेस पक्षात जरी असले तरी ते एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते.

जानेवारी 2010 साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री होते. त्यावेळी औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. हा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडल्यानंतर एका कार्यकर्त्यांशी बोलत असताना सत्तार यांची बाचाबाची झाली आणि त्यांनी त्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांला शिविगाळ करून लाथ मारली होती. काही प्रसारमाध्यमांशी ती दृश्य दाखवली होती. ते प्रकरण अब्दुल सत्तार यांना भोवलं होतं. या प्रकरणानंतर अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

2019 च्या निवडणूकीनंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. त्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरू केलं होतं. त्याचबरोबर मंत्रिपद मिळालं नाही तर त्यांची नाराजी उघड होती. पण उद्धव ठाकरेंनी महसूल राज्यमंत्री पद दिलं. आता शिंदे गटात आल्यानंतर मंत्रिपदासाठी थेट दिल्लीपर्यंत लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. अब्दुल सत्तार दोन दिवस हे दिल्लीत ठाण मांडून होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)