You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंधेरी-पूर्व पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या विजयावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'मशाल भडकली'
संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 65 हजार 618 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील मते नन ऑफ द अबव्ह (NOTA) ला मिळाली. एकूण 12 हजार 721 मते NOTA ला मिळाली.
ऋतुजा लटके यांच्याखालोखाल मतदारांनी 'नोटा'ला मतं दिली आहेत. त्यामुळे ऋतुजा यांची लढत ही अपक्षांपेक्षाही नोटाविरुद्ध असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
विजयानंतर काय म्हणाल्या ऋतुजा लटके?
'हा आपले पती रमेश लटके यांचा विजय आहे. त्यांनी अंधेरीत जी विकासकामं केली, त्याचा हा विजय आहे,' असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं.
ऋतुजा लटके यांनी विजयानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच अनिल परब आणि अन्य शिवसेना नेत्यांचे आभार मानले.
मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना भेटून मी त्यांचेही आभार मानेन असंही त्यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ऋतुजा लटके यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "कपट कारस्थानानंतर पहिली ही निवडणूक आहे. चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं तरी शिवसेनेची मशाल भडकली आणि भगवा फडकला."
"काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आणि कम्युनिस्ट यांचे धन्यवाद. पुढच्या निवडणुका आम्ही एकत्र जिंकू. निवडणूक चिन्ह महत्त्वाचे आहे. विजयामुळे शिवसैनिकांमध्येही उत्साह संचारला आहे," असं ते म्हणाले.
"निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केंद्र सरकार मोठ्या घोषणा करत आहे. आता महाराष्ट्राबाबत प्रेम व्यक्त होऊ लागलंय. येणारे प्रकल्प गुजरातला ओरबाडून नेण्यात आले आहेत. प्रकल्पांच्या भ्रमाचा भोपाळ फुटणार आहे," असं ठाकरे यांनी म्हटलं.
"भारत जोडो यात्रेत मी जाईन की नाही माहित नाही. पण नेते नक्की जातील," असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयाचा अर्थ जाणून घेण्यासाठी पाहा-
'नोटा'ला मिळालेल्या मतांबद्दल बोलताना ऋतुजा लटकेंनी म्हटलं की, नोटा हा लोकशाहीनं दिलेला पर्याय आहे. मतदारांनी आपण हे मतदान का केलं याचा विचार करावा.
दरम्यान, नोटाला मिळालेली मतं ही भाजपची खेळी असल्याचा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला. माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, शिवसेनेचं यश कलंकित करण्यासाठी नोटाचा वापर केला गेला आहे, बाकी काही नाही.
फुटीनंतरची पहिली निवडणूक
या निवडणुकीमुळे राज्याचं संपूर्ण राजकारणच ढवळून निघालेलं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान झालं होतं.
या निवडणुकीच्या काही महिने आधीच शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिवसेनेवरच दावा केला. हे प्रकरण कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेलं.
शिवसेनेत झालेल्या या फुटीचे पडसाद या निवडणुकीवर पाहायला मिळाले. ही निवडणूक कोणत्या चिन्हावर होईल याचा प्रश्न निर्माण झाला. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर दोन्ही गटांनी दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह गोठवलं.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे देण्यात आले आणि त्यांना ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले. तर उद्धव ठाकरेंच्या गटाचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे देण्यात आले. त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले.
फुटीनंतर मशाल या निवडणूक चिन्हावर उद्धव ठाकरे गट लढवत असलेली ही पहिली निवडणूक आहे.
चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गटात लढत होईल असे वाटत असताना शिंदे गटाने ही जागा भाजपसाठी सोडल्याचे म्हटले.
भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज देखील भरला होता. पण नंतर दिवंगत नेत्याच्या निधनानंतर जर कुटुंबातील कुणी उभे राहत असेल तर त्या विरोधात उमेदवार न देण्याची संस्कृती आहे असं कारण देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरजी पटेल यांना उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले.
त्यानंतर या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्या मतदानाचा आज निकाल आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)