मोरबी पुलाचा इतिहास - कसा आणि कधी बनवला गेला हा झुलता पूल?

फोटो स्रोत, GUJARATTOURISM

- जवळपास दीडशे वर्षांपूर्वी मोरबीचे राजे सर वाघजी ठाकोर यांनी मोरबी जिल्ह्यातील हा सस्पेन्शन ब्रिज बांधला.
- त्यावेळी याला कलात्मकतेचा आणि तंत्रज्ञानाचा चमत्कार मानलं गेलं.
- या पुलाचं उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केलं होतं.
- पुलाच्या बांधणीसाठी आवश्यक साहित्य इंग्लंडहून आणण्यात आलं होतं आणि पूल बांधण्यासाठी त्यावेळी 3 लाख 50 रूपये इतका खर्च आला होता.

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात रविवारी (30 ऑक्टोबर) मच्छू नदीवरील झुलता पूल तुटला आणि शेकडो लोक नदीत पडले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 141 वर गेलीय.
नदीत पडलेले अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. तसंच, मृतांची संख्या वाढण्याची भीतीही आहे.
मोरबीचे राजे सर वाघजी ठाकोर यांनी जवळपास दीडशे वर्षांपूर्वी आधुनिक युरोपियन तंत्रज्ञानाच्या मदतीने या पुलाची निर्मिती केली होती.
कलात्मकतेचा आणि तंत्रज्ञानाचा चमत्कार
मोरबीमधील सस्पेन्शन ब्रिजचं उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केलं होतं. पुलाच्या बांधणीसाठी आवश्यक साहित्य इंग्लंडहून आणण्यात आलं होतं. या पुलाच्या बांधकामासाठी त्यावेळी 3 लाख 50 हजारांचा खर्च आला होता.
सस्पेन्शन ब्रिजमुळे मोरबी शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत आणि त्यावेळी या पुलाकडे कलात्मकतेचा आणि तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणून पाहिलं गेलं.
सस्पेन्शन ब्रिज 1.25 मीटर रुंद आणि 233 मीटर लांब होतं. हे ब्रिज दरबारगड पॅलेस आणि नजरबाग पॅलेसलाही जोडत होतं.
2001 साली गुजरातमध्ये झालेल्या भूकंपामुळेही या पुलाला धक्का बसला होता.
या पुलाच्या निर्मितीत सर वाघजी ठाकोर यांच्या काळातील स्थापत्यकलेचा प्रभाव होता. वाघजी ठाकोर हे मोरबी शहराच्या विकासात वेग आणण्यासाठी काम करत असत.

सर वाघजी ठाकोर यांनी 1922 पर्यंत मोरबीवर राज्य केलं. राजेशाहीच्या काळात मोरबी शहराच्या नियोजनात युरोपियन शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
शहराच्या मुख्य चौकाला 'ग्रीन चौक' म्हणून ओळखलं जातं. इथं तीन वेगवेगळ्या दरवाज्यांमधून पोहोचता येतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या तिन्ही दरवाज्यांच्या निर्मितीत राजपूत आणि इटालियन शैलीचा मिलाफ सहज दिसून येतो.
मोरबी जिल्ह्याच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, सस्पेन्शन ब्रिज मोरबी रॉयल्टीचं पुरोगामी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवून देतं.
या पुलाचा मालक कोण?
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रातील माहितीनुसार, या पुलाचा मालकी हक्क सध्या मोरबी नगरपालिकेकडे आहे.
नगरपालिकेनं नुकतेच हा झुलता पूल ओरेवा ग्रुपकडे करारपत्र (MoU) करून 15 वर्षांसाठी या पुलाच्या देखभालीसाठी आणि चालवण्यासाठी सोपवलं होतं.
ओरेवा ग्रुपच्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "अनेक लोकांनी पुलाला हलवण्याचा प्रयत्न केला आणि प्राथमिकदृष्ट्या हेच दिसून येतंय की, याच कारणामुळे पूल कोसळला असावा."
नुकतेच पुलाची दुरुस्ती करून 26 ऑक्टोबरला पुन्हा सगळ्यांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, नगरपालिकेचं म्हणणं आहे की, पूल खुला करत असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती.

फोटो स्रोत, GUJARATTOURISM
मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदिप सिंह झाला यांनी सांगितलं की, "हा पूल मोरबी नगरपालिकेची संपत्ती आहे. मात्र, आम्ही काही महिन्यांपूर्वीच 15 वर्षांपासून ओरेवा कंपनीला देखभाली आणि व्यवस्थापनासाठी सोपवलं होतं. मात्र, या खासगी फर्मने आम्हाला काहीही न कळवताच लोकांसाठी खुला केला होता. त्यामुळे आम्ही या पुलाचं सुरक्षा ऑडिट करू शकलो नाहीत."
सस्पेन्शन ब्रिजसाठी तिकिटांची विक्री ओरेवा ग्रुपच करत होती. 12 वर्षांहून कमी मुलांसाठी 12 रुपये आणि वयस्करांसाठी 17 रुपये तिकीट ठेवण्यात आलं होतं.
ओरेवा ग्रुप घड्याळांपासून ई-बाईकपर्यंत अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट बनवते. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची घड्याळ निर्माती कंपनी आहे.
मृतांची संख्या 141 वर
गुजरातच्या मोरबी शहरात माच्छू नदीवर बनलेला झुलता पूल कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 141लोकांचा मृत्यू झाला आहे.
पूल व्यवस्थापन समितीविरोधात आयपीसी कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुरुस्तीसाठी सहा महिने बंद असलेला हा पूल 28 ऑक्टोबरलाच पुन्हा खुला झाला होता. सणाच्या सुट्या आणि रविवार यांमुळे पुलावर प्रचंड गर्दी होती.
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








