ऋषी सुनक UKचे पंतप्रधान झाल्याने भाजपचं आनंदी होणं किती योग्य?

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर भारतातील राजकीय नेत्यांसोबतच सोशल मीडियावरील सर्वसामान्य नागरीकही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हा भारतासाठी गर्वाचा आणि आनंदाचा प्रसंग असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये एक अल्पसंख्याक हिंदू व्यक्तीला पंतप्रधान बनण्याची संधी ज्याप्रकारे देण्यात आली, ते पाहता जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून भारताने धडा घ्यावा, असं म्हटलं जात आहे.

सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याच्या बातमीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षालाही विशेष आनंद झाल्याचं दिसून येतं.

ऋषी सुनक यांच्या हिंदू धर्माचा उल्लेख करत भाजप नेते सोशल मीडियावर अभिमान व्यक्त करत आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ऋषी सुनक यांचं अभिनंदन करताना ट्विटरवर लिहिलं, "तुम्हाला आपल्या हिंदू धर्माबाबत अभिमान आहे. त्याचप्रकारे आम्हाला तुमच्या या कामगिरीचा अभिमान आहे."

भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही ऋषी सुनक यांना शुभेच्छा देताना म्हटलं, "दिवाळीच्या दिवशी धर्मपरायण हिंदू व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान बनला."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऋषि सुनक यांना शुभेच्छा देताना दिवाळीचा उल्लेख केला.

42 वर्षीय ऋषि सुनक हे बोरीस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यावेळी अर्थ मंत्रालयाच्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच 11, डाऊनिंग स्ट्रीटवर दिवाळीच्या दिवशी दिव्यांची उजळण दिसायची.

अमेरिकेच्या CNN न्यूज वेबसाईटने आपल्या एका बातमीत लिहिलं आहे की सुनक यांनी 2015 मध्ये बिझनेस स्टँडर्डला एक मुलाखत दिली होती.

यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, "ब्रिटिश भारतीय लोकसंख्येला एक कॅटेगरीत टाकलं जातं. पण मी पूर्णपणे ब्रिटिश आहे. हेच माझं घर आणि देश आहे. पण माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी हिंदू आहे आणि त्यामध्ये लपवण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही."

यामुळेच ऋषी सुनक हे पंतप्रधान बनल्यानंतर केवळ भाजपच नव्हे तर सर्वसामान्य हिंदू व्यक्तीही त्याचा आनंद व्यक्त करत आहेत.

काही भारतीयांनी लिहिलं, "यंदाच्या वर्षी ऋषि सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याला महत्त्व आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच भारताने आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षं पूर्ण केली आहेत."

सुषमा स्वराज यांचा सोनिया विरोध

140 कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताचे लोक इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी केलेल्या कामगिरीबाबत नेहमीच अभिमान व्यक्त करताना दिसतात.

कमला हॅरीस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवड असो की सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे CEO बनणं किंवा सुंदर पिचाई यांनी अल्फाबेटच्या CEO पदी जाणं, या गोष्टीचं भारतात प्रचंड कौतुक होतं.

पण अनेक भारतीय या आनंदावर आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. 2004 साली काँग्रेसने सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत प्राप्त केलं होतं. इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी या त्यावेळी पंतप्रधान होतील, अशी चर्चा सुरू होती. पण मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्याचा जोरदार विरोध केला होता.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी तर धमकी दिली होती की सोनिया गांधी जर पंतप्रधान बनल्या तर मी डोक्याचं मुंडण करेन आणि पांढरी वस्त्रं परिधान करेन.

सोनिया गांधी यांनी 1999 साली लोकसभा निवडणुकीत सुषमा स्वराज यांना कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघात हरवलं होतं.

त्यावेळी भाजपने बेल्लारीची निवडणुकीत 'देश की बेटी विरुद्ध विदेशी सून' या मुद्द्यावर लढवण्याचा प्रयत्न केला होता. पण हे डावपेच यशस्वी ठरले नाहीत.

सुषमा स्वराज यांचा सोनिया गांधींना विरोध इथूनच सुरू झाल्याचं म्हटलं जातं.

सुषमा स्वराज यांनी आपली भूमिका योग्य असल्याचा पुनरूच्चार पुन्हा 2013 मध्ये NDTV वृत्तवाहिनीवर केला होता. त्या म्हणाल्या, "सोनिया गांधी यांच्याशी माझं एकाच मुद्यावर भांडण आहे. मी त्यांना देशाचे पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नाही. माझ्या देशाने अनेक यातना आणि बलिदानानंतर गुलामीतून सुटका मिळवली. आज स्वतंत्र भारतात भारतमातेच्या लेकरांमध्ये खूप क्षमता आहे. असे लोक काँग्रेसमध्येही आहेत. पण काँग्रेस सोनिया गांधी यांना पंतप्रधान म्हणून पुढे करत असल्यास माझा विरोध असेल आणि कायम राहील."

भारताचं संविधान सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनण्याची परवानगी देत असतानाही सुषमा स्वराज यांची भूमिका ही होती.

भारतात अल्पसंख्याक उपेक्षित?

ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर एकीकडे भाजपचा आनंद गगनात मावत नसताना सोनिया गांधींची आठवण सांगत लोक त्यांच्यावर टीकाही करत आहेत.

ख्रिश्चन बहुल आणि गौरवर्णीय बहुसंख्य असलेल्या ब्रिटनच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने गौरवर्णीय नसलेल्या एका हिंदू अल्पसंख्य व्यक्तीला पंतप्रधान बनवलं, लोकशाही अशा प्रकारे सर्वसमावेशक असली पाहिजे, असंही म्हटलं जात आहे.

दुसरीकडे भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असल्याचा दावा करतो. पण विद्यमान सरकारमध्ये एकही मुस्लीम मंत्री नाही. इतकंच नव्हे तर भाजपमध्ये एकही मुस्लीम खासदार नाही. भारतात मुस्लिमांची संख्या 20 टक्क्यांच्या आसपास असूनही ही स्थिती आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत ऋषी सुनक यांनी पोहोचणं हे असामान्य आहे. ब्रिटनने जे केलं ते अपवादापेक्षा कमी नाही. ब्रिटनच्या कॉन्झर्व्हेटिव पक्षाच्या खासदारांनी एका सावळ्या, हिंदू धर्मीय आणि आशियाई अल्पसंख्याक व्यक्तीची निवड केली. ब्रिटनमध्ये त्यांची लोकसंख्या जेमतेम 7.5 टक्के आहे."

ऋषी सुनक यांनी अर्थमंत्रिपदाची शपथ गीतेवर हात ठेवून घेतली होती. यावर्षी आपल्या प्रचारादरम्यान त्यांनी कृष्णजन्माष्टमीच्या मुहूर्तावर पूजा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

ऋषी सुनक पंतप्रधान बनणार असल्याची बातमी सोशल मीडियावर आली तेव्हा शशी थरूर यांनी म्हटलं, "हे भारतात शक्य आहे का? 2004 साली काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने सोनिया गांधींसमोर पंतप्रधान बनण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा झालेला गदारोळ आपण विसरता कामा नये. सोनिया गांधी यांना विदेशी म्हटलं गेलं. एका मोठ्या नेत्याने डोक्याचं मुंडण करून संसदेबाहेर उपोषणाला बसण्याची धमकी दिली होती."

शशि थरूर यांनी लिहिलं, "सोनिया गांधींनी पंतप्रधान बनण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. मनमोहन सिंह अल्पसंख्याक समाजातीलच आहेत, हे मान्य आहे. पण बहुतांश हिंदू शीखांना आपल्यापेक्षा वेगळे मानत नाहीत. बहुसंख्याकवादाच्या राजकारणात एखादा बिगर-हिंदू, जैन किंवा बौद्ध देशाचा पंतप्रधान बनण्याची कल्पना आपण करू शकतो का? असं घडल्यास भारत खरंच एक परिपक्व लोकशाही देश म्हणून पुढे येईल."

शीख हिंदू धर्मापेक्षा वेगळा का मानला जात नाही?

केवळ शशी थरूरच नव्हे तर इतर पक्षांचे नेतेही हा मुद्दा उपस्थित करताना दिसत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख महबूबा मुफ्ती म्हणाल्या, "ब्रिटन अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तीला पंतप्रधान बनवत आहे. दुसरीकडे भारत NRC आणि CAA विभाजनवादी आणि पक्षपातीपणाचा कायदा बनवण्यात मग्न आहे."

भाजपने विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपच्या माहिती आणि तांत्रिक विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करून म्हटलं, "भारताचे तीन मुस्लीम आणि एक शीख राष्ट्रपती झाले आहेत. एक शीख व्यक्ती 10 वर्षांपर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी राहिले, अल्पसंख्याक भारताच्या न्यायपालिकेत सर्वोच्च स्थानी राहिले आहेत. इतकंच नव्हे तर लष्कराची कमानही त्यांच्याकडे होती. आपल्याला विविधता आणि सर्वसमावेशकता इतर देशांकडून शिकण्याची गरज नाही."

भारतात राष्ट्रपतिपद हे केवळ औपचारिक मानलं जातं. राष्ट्रपतींकडे फारसे अधिकार नसतात. त्यामुळे त्यांना रबर-स्टँप असंही संबोधलं जातं.

भारताच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये केंद्र सरकारच्या मर्जीनेच राष्ट्रपती निर्णय घेतात. अब्दुल कलाम यांनाही भाजपनेच राष्ट्रपती बनवलं होतं.

याशिवाय, झाकीर हुसैन आणि फकरुद्दीन अली अहमद भारताचे राष्ट्रपती झाले. ज्ञानी झैलसिंह शीख होते. तेसुद्धा भारताचे राष्ट्रपती बनले. शीख व्यक्ती लष्करप्रमुखपदावर गेले आहेत. पण मुस्लीम व्यक्ती या पदावर गेली नाही. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी मुस्लीम व्यक्ती जरूर गेली आहे.

शीख, बौद्ध आणि जैन यांना भारतातील हिंदुत्ववादी हिंदू धर्माचाच भाग मानतात. सावरकर यांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारधारेचंच भाजप अनुसरण करते. तेसुद्धा शीख, बौद्ध आणि जैन यांना इस्लामप्रमाणे वेगळा धर्म मानत नाहीत.

सावरकर पुण्यभूमी आणि पितृभूमी असा मुद्दा मांडत. म्हणजे ज्या धर्माचा उदय भारतात झाला, ती मानणाऱ्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी भारतच आहे. सावरकरांच्या तर्कानुसार, इस्लामचा उदय भारताबाहेर झाला. त्यामुळे तो धर्म मानणाऱ्या लोकांची पितृभूमी भारत आहे. मात्र पुण्यभूमी परदेशात आहे.

अशा स्थितीत त्यांचं प्रेम पुण्यभूमी आणि पितृभूमी यांच्यात विभागलं जाईल, असं सावरकर मानत. याच आधारावर हिंदुत्वाच्या राजकारणात शीख, बौद्ध आणि जैन यांना मुस्लिमांपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं.

भाजप आनंदी का?

ऋषी सुनक पंतप्रधान बनल्यानंतर भाजपने आनंदी होणं कितपत योग्य आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना भाजप समर्थक पत्रकार प्रदीप सिंह म्हणतात, "जगभरात भारतीय वंशाचे नागरीक वास्तव्याला आहेत. पण महत्त्वाच्या पदांवर असलेल्या बहुतांश लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. पण ऋषी सुनक याबाबतीत वेगळे ठरतात. ते आपलं हिंदू असणं लपवत नाहीत, तर मोकळेपणाने सांगतात. सार्वजनिकरित्या ते हिंदू पूजाही करतात. त्यामुळे आनंदी होण्यात काहीच चुकीचं नाही."

सोनिया गांधी यांचा विरोध करणं आणि ऋषि सुनक यांना समर्थन यातून भाजपचा दुटप्पीपणा दिसतो का?

प्रदीप सिंह याविषयी म्हणतात, "ऋषी सुनक यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता. ते जन्माने तिथले नागरीक आहेत. सोनिया गांधी या लग्नानंतर भारतात आल्या. त्यांना भारताची नागरिकताही अनेक वर्षांनंतर मिळाली. सोनिया गांधींना वाटलं असतं तर त्या पंतप्रधान बनू शकल्या असत्या. त्या भाजपमुळे पंतप्रधान बनू शकल्या नाहीत, असं काही नाही. शिवाय ऋषी सुनक यांना तिथल्या लोकांनी पंतप्रधान बनवलं नाही, तर कंझर्व्हेटिव पक्षाच्या खासदारांनी त्यांची निवड केली आहे. लोक त्यांना निवडतात किंवा नाही, याची चाचणी अद्याप बाकी आहे. त्यांची सोनिया गांधी यांच्याशी तुलना योग्य नाही."

अलाहाबाद युनिव्हर्सिटीत इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले हेरंब चतुर्वेदी म्हणतात, "भाजपचं आनंदी होणं म्हणजे 'बेगानी शादी में, अब्दुल्ला दिवाना' प्रमाणे आहे.

जो ब्रिटन युरोपीय महासंघात राहिला नाही, त्या ब्रिटनचा पंतप्रधान हिंदू व्यक्ती बनल्याने लोकांना आनंद होत आहे. ऋषी सुनक यांनी सुलेला यांना गृहमंत्री बनवून एक संदेश दिला आहे. सुलेला यांनी भारतसोबत एका कराराच्या स्वाक्षरीवेळी म्हटलं होतं की भारतीयांचं स्थलांतर वाढेल. त्यांच्या या वक्तव्याचा भारताने निषेधही केला होता. भाजपने स्वतःला बदलायला हवं. त्यांनी ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव पक्षाकडून शिकवण घेण्याची आवश्यकता आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)